दक्षिण मुंबईतील एका ४२ वर्षीय पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, या अभिनेत्याने महिलेसोबत आधी मैत्री केली. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटू लागले. या भेटीदरम्यान त्याने गुपचूप त्या महिलेचे इंटिमेट फोटो काढले. पुढे त्या फोटोंचा वापर करुन अमितने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.
त्यानंतर अमितने फोटोंचा गैरवापर करण्यासोबत महिलेकडून ६.५ लाख रुपये उकळले. तसेच आणखी १८ लाखांची त्याने मागणी केली होती. अमितने त्या महिलेच्या मुलाचा जीवे मारण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केल्याने पीडित महिला घाबरली होती. पण अमितने १८ लाखांची मागणी केल्यानंतर तिने पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. मलबार हिल येथील पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (अ) (लैंगिक छळ), ३८४ (खंडणी), ४१७ (फसवणूक), ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान), आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) या कलमांनुसार अमित विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमितने पीडित महिलेकडून आधी ९५ हजार रुपये घेतले होते. त्यानंतर ५.५ लाख रुपये घेतले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
कोण आहे हा अमित अंतिल
अमित अंतिल हा हरियाणा येथील एक कलाकार आहे. छोट्या पडद्यावरील अनेक कार्यक्रमांत तो झळकला आहे. काही मालिकांसह सिनेमांतही त्याने काम केले आहे. गुन्ह्यांवर आधारित मालिकांमध्ये त्याने सर्वाधिक काम केले आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार मलबार हिल पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक शोषण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप अमितने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. महिलेने अभिनेत्यावर केलेले आरोप कितपत खरे आहेत हे लवकरच समोर येईल.