नुसरत फतेह अली खान यांच्या मृत्यूनंतर 27 वर्षांनी रिलीज होणार 4 कव्वाली, कसा सापडला हा अल्बम?

मंगळवार, 2 जुलै 2024 (18:14 IST)
काही गाणी आणि गायक कालातीत असतात. त्यांचं गाणं नेहमीच आपल्याला उत्कट आनंद देतं. अशाच महान गायकांमध्ये नुसरत फतेह अली खान यांचं स्थान सर्वात वरचं आहे.आजही जगभरात त्यांच्या गायनाचे चाहते मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या गीतांचा एक जुना मात्र कधीही प्रकाशित न झालेला अल्बम आता लंडनमध्ये रिलीज होतोय.
या अल्बमची आणि नुसरत फतेह अली खान यांच्या पाश्चात्य दुनियेतील स्थानाची ही कहाणी...पाकिस्तान आणि भारतासह संपूर्ण जगभरात नुसरत फतेह अली खान यांचे लाखो चाहते आहेत.
 
एक महान गायक आणि कव्वाल म्हणून ते सर्व जगाला परिचित आहेत. या महान कलावंताचा 90 च्या दशकातील गाण्यांचा एक अल्बम त्यांच्या मृत्यूनंतर 27 वर्षांनी रिलीज केला जातोय.लंडनमधील एका स्टुडिओच्या स्टोअरमध्ये नुसरत फतेह अली खान यांच्या गाण्याचा हा अल्बम 34 वर्षांपूर्वी ठेवण्यात आला होता.
 
याला रिअल वर्ल्ड रेकॉर्ड्सने 'चेन ऑफ लाइट' हे नाव दिलं आहे. कंपनीनुसार या अल्बममध्ये चार कव्वाली आहेत. यातील एक कव्वाली आजपर्यत कधीही अधिकृतपणे रिलीज झाली नव्हती.
हा अल्बम कसा सापडला याची कथा खूपच रंजक आहे.
 
2021 मध्ये रिअल वर्ल्ड स्टुडिओजला आपले जुने रेकॉर्डिंग्स दुसरीकडे न्यायची वेळ आली नसती तर कदाचित हा अल्बम श्रोत्यांपर्यत पोचू शकला नसता.
 
न जाणो कित्येक वर्षे तो असाच स्टुडिओच्या स्टोअर रुममध्ये पडून राहिला असता.
 
मात्र नुसरत फतेह अली खान यांच्या गाण्यांचा जुना अल्बम रिलीज होणार आहे हे बातमी समोर आल्यानंतर त्यांचे चाहते आतुरतेनं या अल्बमची वाट पाहत आहेत.
 
या गोष्टीवरून एक 'शेर' आठवतो आहे,
 
रात यूं दिल में तेरी खोई हुई याद आई
 
जैसे वीराने में चुपके से बहार आ जाए
 
नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजाची जादू जगभरातील रसिकांच्या मनावर आजही गारुड करते आहे.
 
त्यामुळेच 20 सप्टेंबर या तारखेची नोंद त्यांच्या चाहत्यांनी घेतली आहे आणि ही तारीख त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण याच दिवशी नुसरत फतेह अली खान यांचा हा जुना अल्बम रीलीज केला जाणार आहे.
1997 मध्ये वयाच्या 48 व्या वर्षीच नुसरत फतेह अली खान यांचं निधन झालं होतं. त्यांच्या हयातीत त्यांच्या गायनाची जादू जगभरातील त्यांच्या चाहत्यांवर होती. आता या अल्बमच्या माध्यमातून पुन्हा एकदा नुसरत फतेह अली खान तरुण पिढीशी जोडले जाणार आहेत.मात्र यातून एक प्रश्न समोर येतो तो म्हणजे 34 वर्षांपूर्वी जर हे गाणे रेकॉर्ड झाले होते तर इतक्या वर्षांनी ते समोर कसे आले? यासंदर्भात आम्ही रिअल वर्ल्ड स्टुडिओजशी ईमेलच्या माध्यमातून संवाद साधला.
 
'रेकॉर्डिंग मिळाल्यावर आम्हाला खूपच आनंद झाला'
नुसरत फतेह अली खान यांच्या आवाजातील 'आफरीन' ही गजल इतकी अफलातून आहे की तिचं वर्णन शब्दात केलं जाऊ शकत नाही.
 
मात्र तरीदेखील नुसरत फतेह अली खान यांचे चाहते आणि गायनात त्यांची साथ देणारे अमेरिकन गायक जेफ बकली यांनी त्यांच्या गायनाचं कौतुक या शब्दात केलं होतं."त्यांच्या गायनात बुद्ध देखील आहेत, भूत सुद्धा आहे आणि एक वेडा देवदूतसुद्धा...त्यांचं गायनात एकाच वेळी नजाकत आणि धारदारपणा आहे. ते अजोड आहे."
 
हा अल्बम पाश्चात्य लोकांच्या बॅनर किंवा कंपनीकडून रिलीज होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर एक प्रश्न लोक सातत्यानं विचारत आहेत.तो म्हणजे परदेशी खासकरून पाश्चात्य लोक नुसरत फतेह अली खान यांच्या गायनाचे चाहते कधी आणि कसे झाले?
 
रिअल वर्ल्ड रेकॉर्ड्स कडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार पीटर गॅब्रियल आणि रिअल वर्ल्ड रेकॉर्ड्स यांच्याशी नुसरत फतेह अली खान यांचं नातं 1985 पासून गहिरं झालं होतं.
 
1985 मध्ये 'वोमॅड' (WOMAD)महोत्सवात नुसरत फतेह अली खान यांचा एक परफॉर्मन्स होता त्यानंतर हे नातं अधिक घट्ट होत गेलं.
नुसरत फतेह अली खान यांनी पूर्णपणे पाश्चात्य श्रोते किंवा चाहत्यांसमोर सादरीकरण करण्याची ही पहिलीच वेळ होती.या सादरीकरणासाठी त्यांनी आपल्या सोबत नऊ लोकांची एक कव्वाल पार्टी देखील आणली होती. असेक्समधील मेरिसा आयलँड या एका छोट्या भागात हा कार्यक्रम झाला होता.महोत्सवात आलेल्या लोकांनी रात्री उशीरापर्यत चालणारा हा कार्यक्रम पाहिला-ऐकला. ही एक ऐतिहासिक घटना होती.
 
या ऐतिहासिक महोत्सवानंतर लगेचच रिअल वर्ल्ड रेकॉर्ड्सशी त्यांच्याशी करार केला. इथूनच नुसरत फतेह अली खान यांची आंतरराष्ट्रीय ख्याती वाढत गेली. त्यांनी गॅब्रियलसोबत 1989 मध्ये त्यांच्या 'पॅशन' या अल्बममध्ये देखील गायन केलं. हे गाणं 'द लास्ट टेम्पटेशन ऑफ क्राइस्ट' मध्ये दाखवण्यात आलं.
 
पीटर ग्रॅब्रियल म्हणतात, "मी जगभरातील असंख्य संगीतकारांबरोबर काम केलं आहे. मात्र या सर्व गायकांमध्ये बहुधा नुसरत फतेह अली खान हेच माझ्या वेळचे सर्वात महान गायक होते. ते आपल्या गायनातून श्रोत्यांना जो आनंद द्यायचे, गायनाची जी अनुभूती द्यायचे ती अद्वितीय होती."
 
त्यांचं म्हणणं आहे की, "नुसरत फतेह अली खान यांचा आवाज आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात आम्ही भूमिका बजावू शकलो या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा आम्हाला हे रेकॉर्डिंग मिळाले तेव्हा आम्हाला खूपच आनंद झाला. या अल्बममधील गाण्यातून त्यांच्या गायनाची उंची जाणवते."
 
अनेक वर्षे नुसरत फतेह अली खान यांचे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक राहिलेले राशिद अहमद दीन म्हणतात, "1990 हे नुसरत यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचं वर्ष होतं. त्याच वेळेस पाश्चात्य देशांमध्ये त्यांच्या गायनाचा ठसा उमटत होता. जे सगळं जणूकाही आपोआपच होत होतं. त्यांना नेहमीच गायनात प्रयोग करायची इच्छा असायची. एकाच प्रकारच्या संगीतापुरतं मर्यादित राहण्याची त्यांची इच्छा नव्हती. रेकॉर्डिंग्समधून ही गोष्ट ठळकपणे समोर येते."
इलियास हुसैन हे नुसरत फतेह अली खान यांच्या तारुण्यापासून त्यांचे शिष्य होते. ते नुसरत फतेह अली खान यांच्या कव्वाल पार्टीमध्ये प्रॉम्टची सेवा द्यायचे. म्हणजेच नुसरतसाहेबांच्या मागे गाणं गायचे.
 
त्यांनी सप्टेंबर 2020 मध्ये बीबीसीशी बोलताना नुसरत फतेह अली खान यांचे परदेश दौरे आणि पाश्चात्य चाहत्यांबद्दल माहिती दिली होती.इलियास हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, युरोपात ते कुठेही गेले तरी तेथील लोक नुसरत फतेह अली खान यांना 'मिस्टर अल्लाह हू' अशी हाक मारायचे.
 
त्यांनी जपानमधील फोकोहाकोमध्ये संगीत महोत्सवात सादरीकरण केल्यानंतर तर जपानी लोक त्यांच्यावर फिदा झाले. नुसरत फतेह अली खान यांचे सूर आणि गायन यांचा जपानी लोकांवर इतका प्रभाव पडला की त्यांनी त्यांचं वर्णन 'सिंगिंग बुद्धा' असं केलं.
 
इलियास हुसैन यांनी सांगितलं की नुसरत फतेह अली खान जपानमध्ये जेव्हा कोणत्याही शो साठी जायचे तेव्हा सभागृहात ते पोहोचताच सर्व लोक आपल्या आसनांवरून उभे राहायचे आणि शो सुरू होण्याआधी त्यांच्या सन्मानार्थ किमान एक मिनिटांचं मौन धारण करायचे.इलियास हुसैन यांच्यानुसार युरोपात त्यांचे अनेक शिष्य होते.
 
हरवलेला अल्बम कुठून मिळाला?
रिअल वर्ल्ड रेकॉर्ड्सला आम्ही विचारलं की अखेर ही रेकॉर्डिंग्स इतक्या वर्षांनी सापडली तरी कशी.यावर ईमेलद्वारे त्यांनी आम्हाला यासंदर्भातील सर्व माहिती दिली.
 
"90 च्या दशकाच्या सुरूवातीला नुसरत फतेह अली खान यांनी रिअल वर्ल्ड स्टुडिओजमध्ये अनेकवेळा रेकॉर्डिंग केली होती. यामध्ये पारंपारिक कव्वालीबरोबरच मायकल ब्रूक आणि पीटर गॅब्रियल यांच्याबरोबरच्या गायनाचा देखील समावेश आहे."

"यातीलच एका लाईव्ह कार्यक्रमाची रेकॉर्डिंग रिलीज करण्यात आली नव्हती. ती रेकॉर्डिंग रिअल वर्ल्ड स्टुडिओजच्या संग्रहणात सांभाळून ठेवण्यात आली होती. अनेक वर्षे ती तिथेच होती. अलीकडच्या वर्षांमध्ये आम्हाला आमच्या रेकॉर्डिंगचं कलेक्शन दुसरीकडे हलवायचं होतं. त्याच वेळेस आम्हाला एक रेकॉर्डिंग बॉक्स मिळाला ज्यावर लिहिलं होतं की ही नुसरत फतेह अली खान यांची रेकॉर्डिंग आहे. मात्र त्यामध्ये असलेलं गाणं याआधी रीलीज झालं नव्हतं आणि ते पाहताच आम्हाला खूपच आनंद झाला."
 
त्यांनी पुढे सांगितलं, "जुन्या अ‍ॅनालॉग स्वरुपाच्या टेप किंवा रेकॉर्डिंगचा वापर खूपच सांभाळून करावा लागणार होता. मात्र एकदाचं त्याचं रुपांतर डिजिटल फॉरमॅट करण्यात आल्यावर आणि रिअल वर्ल्डच्या स्टुडिओमध्ये त्यावर प्रक्रिया केल्यानंतर आम्हाला याची खात्री झाली की ही रेकॉर्डिंग यापूर्वी कधीही ऐकण्यात आलेली नाही आणि त्याला रीलीज देखील करण्यात आलेलं नाही."
 
"अल्बम मिळाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. मात्र आता जेव्हा आम्ही मागे वळून पाहतो तेव्हा ही रेकॉर्डिंग आमच्याकडे होती या गोष्टीचं आम्हाला आता खूप आश्चर्य वाटत नाही. 90 च्या दशकात आम्ही नुसरत फतेह अली खान यांचे अल्बम रिलीज करण्याबाबत खूपच सजग होतो. कारण आमच्याकडे त्यांचं संगीत पुढे आणण्यासाठी वेळ देखील होता आणि जागादेखील होती."त्यांनी सांगितलं की, त्या वेळेस आम्ही फक्त सीडी आणि एलपीच्या माध्यमातून त्यांची रेकॉर्डिंग्स रिलीज करू शकायचो. कारण त्या काळात डिजिटल व्यासपीठ उलब्ध नव्हतं.
 
"त्यामुळेच आम्हाला आमचं रिलीजचं वेळापत्रक खूप जास्त व्यस्त देखील करायचं नव्हतं. एकाच वेळी आमचे सर्व अल्बम रीलीज करायची आमची इच्छा नव्हती. त्यामुळेच काही गाणी नंतर रीलीज करण्यासाठी बाजूला ठेवली जाणं ही गोष्ट नवी नव्हती."
 
"मात्र काळ जसा पुढे सरकत गेला तसं त्या रेकॉर्डिंग्सचं आम्हाला विस्मरण झालं. आता अनेक वर्षानंतर त्या आमच्या हाती लागल्या आहेत."
 
रेकॉर्डिंग रिलीज करायला इतका उशीर का?
कंपनीला या रेकॉर्डिंग 2021 मध्ये सापडल्या. मात्र त्यांना रिलीज करण्यासाठी कंपनीनं इतका वेळ का लावला? याचं उत्तर देताना रिअल वर्ल्डनं सांगितलं की, "आम्हाला या रेकॉर्डिंगला योग्य स्थितीत आणण्यासाठी, मायकल ब्रूकशी सल्लामसलत करून मिक्स बनवण्यासाठी आणि त्यांना पुन्हा एकदा कलाकृतीचं स्वरुप देण्यासाठी हा वेळ लागला."
"हा अत्यंत खास असा अल्बम अतिशय छान पद्धतीनं रिलीज झाला पाहिजे, यासाठीची खातरजमा आम्हाला करून घ्यायची होती."
 
कंपनीचं म्हणणं आहे की या अल्बममध्ये चार कव्वाली आहेत आणि त्यांचा एकूण कालावधी 42 मिनिटांचा आहे. यात सर्व सेशन रिलीज करण्यात येणार आहेत.
 
रिअल वर्ल्ड रेकॉर्ड्सचं म्हणणं आहे की, "या अल्बमच्या रिलीजसंदर्भात आम्ही नुसरत यांच्या कुटुंबाच्या सातत्यानं संपर्कात आहोत. आम्ही नेहमीच त्यांच्या संपर्कात राहिलो आहोत. भूतकाळातसुद्धा रिअल वर्ल्ड रेकॉर्ड्सकडे नुसरत यांचे अनेक अल्बम होते आणि आम्ही त्यांना रिलीज करण्यासंदर्भात काम करत आलो आहोत. त्यामुळे असा कोणताही काळ नव्हता जेव्हा आम्ही नुसरत फतेह अली खान यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात नव्हतो."
 
"आम्हाला एक अफलातून रेकॉर्डिंग मिळाली आहे, हे जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं तो क्षण आमच्यासाठी खूपच समाधानाचा आणि आनंदाचा होता."
 
त्यांचं म्हणणं होतं की "आम्हाला आशा आहे की इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा या अल्बमबद्दल आणि त्याच्या रिलीजसंदर्भात असणारी उत्सुकताच नुसरत फतेह अली खान यांचा वारसा जिवंत ठेवेल."
 
"त्यांचं संगीत प्रत्येक काळात जिवंत राहिल आणि त्यांचं गाणं लोकांना आपल्याकडे खेचून घेत राहील. नुसरत फतेह अली खान आजदेखील खूप महत्त्वाचे आहेत ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे."

Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती