निर्माता : चिराग निहलानी दिग्दर्शक : राजेश राम सिंग संगीत : अदनान सामी कलाकार : ऋषी रेहान, अवंतिका, हिमानी शिवपुरी, प्रेम चोप्रा, चंकी पांडे, राज बब्बर आणि शक्ती कपूर प्रेमकथा हा बॉलीवूडपटांचा 'फेवरिट' विषय. चार चित्रपटांची भेसळ केली की झाली नवीन 'लव्हस्टोरी' हा इथला ट्रेंड. 'खुशबू'ची निर्मिती हा देखिल असाच अयशस्वी प्रयोग. राजेश राम सिंग यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेली ही एक शिख तरुणी आणि तमीळ तरुणाच्या आयुष्यातील चढउतारांची ही कथा. अं...हं सुरुवातीला तिची तुलना जर का तुम्ही 'एक दुजे के लिये' सारख्या गाजलेल्या व प्रेक्षणीय चित्रपटाशी करणार असाल तर आधीच सांगतो साफ निराशा पदरी पडेल.
केवळ संगीत आणि प्रोमोच्या बळावर चित्रपट चालत नाही. हे आमच्या निर्माता आणि दिग्दर्शकांना कोण सांगणार कुणास ठाऊक. मात्र तरीही चित्रपट बनताहेत आणि ते पाहून-पाहून दर्शकांची स्थिती अधिकाधिक खराब होतेय. 'खुशबू'ने जी स्थिती केली तीही काही वेगळी नाहीच. ही खुशबू इतकी उग्र आहे की त्यापासून दूर पळणेच प्रेक्षकांना बरे वाटावे.
एका मोठ्या पंजाबी कुटुंबातील तरुणी पिंकी (अवंतिका) व रघू (ऋषी रेहान) यांचे एकमेकांवर प्रेम जडते. दोघे लग्नही करतात. मात्र रघू करिअरला महत्व देणारा तर पिंकी कुटुंबाला. रघु करीअर घडविण्यासाठी न्यूयॉर्कला जाऊ इच्छितो मात्र पिंकी पंजाब सोडून जाण्यापासून नाखुष असते. येथूनच दोघांच्यातील मतभेद सुरू होतात. एखाद़या चुईंगम प्रमाणे मग कथा ताणतच जाते.
ना कुठला स्वाद ना कुठली 'खुशबू'. ऋषी रेहान व अवंतिका दोघांचाही हा पहिलाच चित्रपट. अवंतिकाचा अभिनय त्या तुलनेत चांगला. ऋषीही आपल्या मसल पॉवरच्या बळावर थोडे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला असला तरीही त्याला अजून सुधरणेस भरपूर वाव आहे.
IFM
IFM
प्रेम चोप्रा बऱयाच कालावधीनंतर पडद़यावर दिसले. आणि पसंतीसही उतरले. चंकी पांडे, राज बब्बर आणि शक्ती कपूर यांनी आपापली भुमिका चांगली वठवली आहे. चित्रपटाच्या जमेच्या बाजू म्हणाल तर अदनान सामीचे श्रवणीय संगीत. आणि उत्तर भारताच्या निसर्ग सौंदर्याचे घडलेले दर्शन. 'खुशबू'च्या अपेक्षेने जाल तर मात्र निराशा हाती येईल.