स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार? शरद पवार म्हणाले….

मंगळवार, 10 मे 2022 (14:59 IST)
राज्यात लवकरच होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे की नाही याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच भाष्य केले आहे. ते आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या २ आठवड्यात जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे यासंदर्भात पवार यांना प्रश्न विचारण्यात आला.
 
शरद पवार म्हणाले की, आगामी निवडणुका एकत्रित लढविण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. काहींचे मत आहे की आपण स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी. तर काहींचे मत आहे की सध्या आपण एकत्रितपणे सरकार चालवतोय तर आपण सोबतच निवडणूक लढवावी. आपण स्वतंत्र लढावे आणि नंतर एकत्र यावं असंही काहींना वाटतं. त्यामुळे यासंदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. तो घ्यायचा असेल तर तिन्ही पक्षांना एकत्रितपणे ठरवावे लागेल. अद्याप तशी पूर्ण चर्चा झालेली नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सद्यस्थितीत आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे स्पष्ट होत आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबतही पवार म्हणाले की, या निकालाबाबत अनेकांचा गैरसमज झाल्याचे वाटते. १५ दिवसात निवडणुका घ्या असं न्यायालयानं सांगितलेलं नाही तर १५ दिवसात निवडणुकांच्या तयारीला सुरुवात करा, असे न्यायालयाने सांगितल्याचं मला वाटतं असे पवार म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती