Namdar Gopal Krishna Gokhale Jayanti 2023 : गोपाळ कृष्ण गोखले यांचा परिचय

मंगळवार, 9 मे 2023 (08:36 IST)
गोपाळ कृष्ण गोखले ह्यांचा जन्म 9 मे, 1866 रोजी महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात कोतळूक येथे झाला.ह्यांच्या वडिलांचे नाव कृष्ण महादेव गोखले आणि आईचे नाव सत्यभामाबाई कृष्ण गोखले होते. त्यांचे वडील शेतकरी होते. ह्यांचे बालपण कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे गेले. इथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण देखील झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वडिलबंधूं गोविंदराव ह्यांनी स्वतःचे शिक्षण सोडून पत्नीचे दागिने विकून गोपाळ कृष्ण गोखले ह्यांना उच्चशिक्षणास कोल्हापुरातील राजाराम कॉलेज आणि मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजात पाठविले. 1884 मध्ये गणित विषयात बीए ची पदवी मिळवून जानेवारी 1885 मध्ये पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षकाची नौकरी स्वीकारली.नंतर पुण्यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्यत्व,फर्ग्युसन कॉलेजात अध्यापन, 1895 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या सिनेटवर फेलो म्हणून नियुक्त झाले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या सार्वजनिक सभेचे सचिव बनले .ह्यांनी शेतकऱ्यांचे कर्ज, दुष्काळ या त्रासांचा सखोल अभ्यास करून सरकार कडे निवेदन पाठविले .1905 साली त्यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली.गोखले पुण्यात न्यायमूर्तीरानडे ह्यांच्या संपर्कात आले. ते रानडे ह्यांच्या आर्थिक आणि राजकीय विचारांशी खूप प्रभावित झाले.न्यायमूर्ती रानडे एक महान देशभक्तआणि समाज सुधारक होते. गोपाळ गणेश आगरकर ह्यांनी सुरू केलेल्या 'सुधारक' च्या इंग्रजी आवृत्तीची जबाबदारी नामदार गोखले ह्यांनी सांभाळली. सार्वजनिक सभा,वृत्तपत्रातून ते लिखाणाद्वारे समाज सुधारणांचा पाठपुरवठा सतत करायचे. 1902 साली मध्यवर्तीय कायदे मंडळावर निवड झाल्यावर ते नामदार झाले. त्यांच्यातील क्षमतेला बघून व्हाईसरॉय लॉर्ड मिंटो ह्यांनी गोखले ह्यांना मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याचा मसुदा तयार करण्यास सांगितले.त्या दरम्यान त्यांनी पार्लियामेंटच्या सदस्यांना भेटून भारतातील समस्या आणि त्याचे प्रश्न त्यांच्या कानी घातले.ते भारतातील पहिल्या श्रेणीचे अर्थतज्ज्ञ होते. हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्य विरोधात स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणारे राजकीय आणि सामाजिक नेता होते. आपला साधा स्वभाव, बौद्धिक क्षमता आणि देशासाठी दीर्घकाळ निःस्वार्थ सेवा करण्यासाठी त्यांना नेहमी स्मरले जाईल. ते इंडिया पब्लिक सर्व्हिस सोसायटीचे संस्थापक आणि अध्यक्ष होते. ते उदारमतवादी विचारसरणीचे अग्रगण्य घटक होते.ते 1905 मध्ये स्वातंत्र्याच्या पक्षात लाला लाजपतराय ह्यांचा सह इंग्लंडला गेले आणि अतिशय प्रभावी पणे देशाच्या स्वतंत्रते बद्दल बोलले.ते एक महान स्वातंत्र्यसैनिक तसेच एक आदरणीय राजकारणी होते. महात्मा गांधींनी त्यांच्याकडून राजकारणाबद्दल बरेच काही शिकले आणि म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता चे राजकीय गुरू म्हटले गेले.
इतिहासकार एच.एन. कुमार म्हणतात की बहुतेक लोक गोखले यांना महात्मा गांधींचे राजकीय गुरू म्हणूनच ओळखतात परंतु ते केवळ राष्ट्रपिताचे गुरु नव्हते तर मोहम्मद अली जिन्ना यांचे देखील राजकीय गुरू होते.त्यांचे म्हणणे आहे की स्वातंत्र्याच्या वेळी गोखले जिवंत असते  तर देशाच्या फाळणीबद्दल बोलण्याची हिंमत जिन्ना यांना मिळाली नसती,
इतिहासाचे प्राध्यापक के.के. सिंह म्हणतात की गोखले यांच्या कडूनच गांधीजींनाअहिंसेच्या माध्यमाने स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा मिळाली. त्यांच्या प्रेरणे ने गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाच्या विरोधात आंदोलन केले. ते म्हणाले की, गांधीजींच्या निमंत्रणावरून गोखले स्वतः 1912 मध्ये दक्षिण आफ्रिका गेले आणि तिथे वर्णभेदाचा निषेध केला आणि त्याविरूद्धच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. 
जननेते म्हणून ओळखले जाणारे गोखले हे सौम्य सुधारवादी होते. स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देण्याबरोबरच त्यांनी देशात जातीयवाद आणि अस्पृश्यतेच्या विरोधातही लढा दिला. त्यांनी आयुष्यभर हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी काम केले आणि मोहम्मद अली जिन्ना यांनीही त्यांना आपला राजकीय गुरू मानले. ही वेगळी बाब आहे की जिन्ना नंतर देशाच्या विभागणी ला कारणीभूत ठरले आणि गोखले यांनी दिलेल्या शिक्षणाचे पालन नाही केले. 
 गुलामगिरीपासून भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी जन्मलेल्या या वीर पुत्राचे 19 फेब्रुवारी 1915 रोजी निधन झाले.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती