सॅन मरिनो

रविवार, 23 सप्टेंबर 2018 (00:42 IST)
युरोप खंडात सॅन मरिनो हा देश आहे. युरोपातील सर्वात शांत आणि प्रसन्न असा हा देश आहे. पूर्णपणे इटली देशाने वेढलेले असे हे एक विदेशी आंतरराज्य आहे. युरोपमधील तृतीय क्रमांकाचा छोटा देश म्हणून सॅन मरिनो प्रसिद्ध आहे. या देशाच्या इतिहासाला एक वैशिष्ट्यपूर्ण झलक लाभलेली आहे. ती म्हणजे हे जगातील एक प्राचीन सार्वभौम राज्य असून घटनात्मक लोकशाही असणारा हा सर्वात प्राचीन देश आहे. त्याबद्दलचे तत्कालीन शिलालेखांवर उल्लेख सापडले आहे. 3 सप्टेंबर 301 रोजी या देशाची पहिली घटना लिहिली गेली. सध्या हे राज्य 16 व्या शतकात लिहिल्या गेलेल्या घटनेनुसार राज्य  कारभार पाहात आहे. इ.स. 301 पूर्वी हे राज्य रोमन साम्राज्याचा एक भाग होते. परंतु 3 सप्टेंबर 301 रोजी ते रोमन राजवटीपासून स्वतंत्र झाले. या देशाची सध्याची घटना 8 ऑक्टोबर 1600 मध्ये लिहिली गेली. या घटनेची 6 पुस्तके असून आजही ती वापरात आहेत.
 
सिटी ऑफ सॅन मरिनी या शहराला स्थानिक लोक सिट्टा म्हणून ओळखतात. ही या देशाची राजधानी असून ते अ‍ॅड्रियाटिक शहराजवळ आहे. सॅन रिनो देशातील सर्वात उंच पर्वताच्या पश्चिमेकडील उतारावर हे शहर वसलेले आहे. लोकसंख्या 4128 एवढी आहे.
 
या देशातील हे तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. या देशातील हे शहर म्हणजे सर्वात प्राचीन इतिहास आहे. देशाचा सर्व प्राचीन इतिहास याच परिसराशी जोडला गेलेला आहे. इ.स. 301 मध्ये संत मरिनस आणि अन्य अनेक ख्रिस्ती शरणार्थीनी आणि निर्वासितांनी या गावाची स्थापना केली. 
 
रोमन साम्राज्यातून हद्दपार झालेल्या आणि पळून आलेल्या अनेक लोकांनी याच गावात आश्रय घेतला. त्यामुळे नंतर हे युरोपातील सर्वात जुने सार्वभौम प्रजासत्ताक राज्य बनले. या शहराचे संरक्षण तीन उंच मनोरे करतात. गॉइटा हा पहिला मनोरा 11 व्या शतकात बांधला गेला. सेस्टा हा दुसरा मनोरा 13 व्या शतकात बांधण्यास सुरुवात झाली. याबरोबरच र्मोटाले या तिसर्‍या मनोर्‍याचे काम पूर्ण झाले.
 
म.अ. खाडिलकर  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती