पावसाळ्यात या ठिकाणांना द्या आवर्जून भेट!

मंगळवार, 24 जुलै 2018 (14:57 IST)
पावसाला सुरुवात झाली की, फिरण्याची आवड असणारे लोक हे वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत असतात. अनेकांना या दिवसात राज्याबाहेर जाऊन नैसर्गिक वातावरणाचा आनंदघ्यायचा असतो. जर तुम्हीही अशाच काही खास ठिकाणांच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही खास पर्याय सांगत आहोत. 
 
कोडायकनाल
तमिळनाडूमधील दिनदीगुल डोंगरांच्या मधोमध कोडायकनाल हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. इथे चारही बाजूंनी केवळ हिरवळ बघायला मिळते. पावसाळ्यात तर या ठिकाणी फारच सुंदर नजारा असतो. 
 
देवरियाताल
मस्तुरा आणि सारी गावांजवळ हे ठिकाण आहे. पावसाळ्यात येथून दिसणारा नजारा बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. या पावसाळ्यात आवर्जून भेट द्यायला हवी. 
 
मुन्नार
केरळमधील पावसाळा किती सुंदर आणि आकर्षक असतो हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. केरळमधील मुन्नारला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक पावसाळ्याची वाट पाहतात. कारण पावसाळ्यात इथे येऊन तुम्ही तुमच्या ताणतणावापासून मुक्ती मिळवू शकता. 
 
बिष्णुपूर
पश्चिम बंगालच्या बंकुरा जिल्ह्यात हे ठिकाण असून पावसाळ्यात येथील नजारा मनमोहक असतो. येथील मंदिरे आणि डोंगर तुम्हाला कधीही न अनुभवलेला अनुभव देतील. 
 
जीरो
अरुणाचल प्रदेशातील जीरो या ठिकाणाचा समावेश वर्ल्ड हेरिटेजमध्ये आहे. अरुणाचल प्रदेशातील सर्वात सुंदर गावांमध्येही या गावाचा समावेश आहे. येथील निसर्गांचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यापेक्षा चांगला कोणताच ऋतू असू शकत नाही. 
 
उदयपूर
उदयपूर हे राजस्थानमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. या शहराला तलावांचं शहर असंही म्हटलं जातं. इथे पावसाळ्यात फारच मनमोहक वातावरण असतं. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती