महाराष्ट्राच्या नकाशावरील अगदी पूर्वेकडच्या कोपऱ्यात असणारा भंडारा जिल्हा 11 लाखांच्यावर लोकसंख्या असलेला आणि नैसर्गिक सौंदर्यासोबतच नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असा हा जिल्हा आहे. एवढ्या छोट्याशा जिल्हातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 1/3 क्षेत्र जंगलाने व्यापलेले आहे. या जिल्ह्यात न्यु नागझिरा, उमरेड कऱ्हांडला आणि कोका अशी तीन अभयारण्ये नव्याने घोषित झाली आहेत.
भंडारा – गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या न्यु नागझिरा व नागझिरा अभयारण्याला लागुनच असलेले 10,013 हेक्टर वनक्षेत्र शसनाने 2013 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याला ‘कोका अभयारण्य’ असे नाव देण्यात आले. ब्रिटीश काळात ‘ओल्ड रिझर्व्ह फॉरेस्ट’ म्हणून जे जंगल ओळखले जात होते त्याच भागाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे.
अभयारण्यातील प्राणी : हे अभयारण्य वन्यजीवांसाठी उत्कृष्ट अधिवास असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच या जंगलाला वन्यप्राण्यांसाठी ‘संरक्षित’ केले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात वाघ, बिबट, गवा, अस्वल, काळविट, नीलगाय, सांबर, रानकुत्रे, चितळ, रानडुकर इत्यादी प्राणी आहेत. त्याचबरोबर अनेक पक्षांच्या अधिवासाने व जैवविविधतेने जंगल श्रीमंत झाले आहे.
या अभयारण्याचा विकास डिसेंबर 2013 पासून सुरु झाला असुन 25 नैसर्गिक पाणवठे आहेत. ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी विंधन विहिरी बांधण्यात आल्या असून पाणी पिण्यासाठी सिमेंट टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. टाकीत सतत पाणी रहावे म्हणून सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले आहेत. या अभयारण्यात जाण्यासाठी चंद्रपूर या गावी प्रवेशद्वार करण्यात आले आहे. पर्यटकांना जंगल सफारीसाठी 5-7 गाड्या सोडण्यात येत असून गावातीलच 12 वी पास मुलांना गाईडचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अभयारण्यातील जंगल सफारीचा मार्ग 46.5 कि.मी. चा आहे. या अभयारण्यात वन्यप्राण्यांचे दर्शन सातत्याने होत असल्यामुळेच पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे वळला आहे.