धार : राघोबादादा पेशव्यांनी आश्रय घेतलेला आणि जिथे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला तो किल्ला
सोमवार, 4 डिसेंबर 2023 (19:06 IST)
social media
ऑगस्ट 1773 ला पुण्यात नारायणराव पेशव्यांची हत्या झाल्यानंतर सत्ताकारण वेगानं पुढे सरकत होतं. बारभाईंनी राघोबादादांना आव्हान देणं. त्यांचं पदच्युत होणं आणि पुढे कालांतराने दुसऱ्या बाजीरावाने पेशवा होऊन राघोबादादांचं स्वप्न पूर्ण करणं. या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी होता तो धारचा किल्ला.
मध्य प्रदेशातल्या धारचा हा किल्ला शेकडो वर्षांची साक्ष देणारा आहे. काळाच्या ओघात जीर्ण झालेल्या या किल्ल्याला आता पुरातत्व खात्याने पुन्हा एकदा नवी झळाळी आणली आहे. धारच्या या किल्ल्याची गोष्ट राजा भोज आणि परमार घराण्यापासून सुरू होते आणि इंग्रजांपर्यंत येऊन थांबते.
हा किल्ला महाराष्ट्रापासून जरी दूर असला तरी मराठा आणि पेशवा इतिहासात मात्र या किल्ल्याला मोठं महत्त्व आहे. त्याचं कारण आहे 10 जानेवारी 1774ला दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा इथं झालेला जन्म आणि त्याकाळचं पुण्यातलं राजकारण...
त्यावेळी नेमकं काय घडलं होतं याची माहिती देताना पेशव्यांच्या इतिहासाचे अभ्यासक यशोधन जोशी सांगतात,
“ऑगस्ट 1773 ला नाराणराव पेशव्यांचा पुण्यातील शनिवारवाड्यात खून झाला. त्यावेळी राघेबादादांनी स्वतःला पेशवे म्हणून घोषित केलं.
पण त्यावेळी नारायणराव पेशव्यांची पत्नी गंगाबाई गरोदर होत्या. त्यामुळे मग सुरक्षेच्या कारणास्तव गंगबाईंना पुरंदरच्या किल्ल्यावर ठेवण्यात आलं. तसंच त्यांना मुलगा झाला तर तो पुढचा पेशवा हेईल हे जाहीर करण्यात आलं होतं."
पण, अशा प्रकारे खूनाचा प्रकार मराठेशाहीत पहिल्यांदाच घडला होता. सत्तेसाठी पहिल्यांदाच कुणाचातरी खून झाला होता.
त्यामुळे मग मराठेशाहीतले सर्व मुत्सद्दी एकत्र आले. त्यात शिंदे, होळकरांसह सखारामबाबू, नाना फडणवीस, पटवर्धन अशा सर्वांनी मग राघोबादादांच्याविरोधात आघाडी उघडली. त्यालाच 'बारभाईंचं कारस्थान' असं म्हणतात.
त्याच दरम्यान एप्रिल 1774 मध्ये गंगाबाईंना मुलगा झाला. त्याचं नाव सवाई माधवराव ठेवण्यात आलंय. त्यानंतर 40 दिवसांमध्ये त्यांना पेशवाईची वस्त्र देण्यात आली. परिणामी राघोबादादा पदच्युत झाले.
त्यातून मराठ्यांमध्ये एक संघर्ष निर्माण झाला. त्यात बारभाईंच्या सर्व फौजाविरुद्ध राघोबादादा अशी स्थिती निर्माण झाली.
त्यातून पंढरपूरजवळच्या कासेगावाजवळ एक लढाई झाली. त्यात त्र्यंबकरावमामा पेठेंनी राघोबादादांचा पराभव केला. त्यामुळे त्यांना पळून जावं लागलं.
पण ते इकडेतिकडे कुठेही न पळता उत्तरेकडे पळाले. त्यावेळी धारमध्ये त्यांनी काहीकाळ आश्रय घेतला.
धारचे पवार हे पूर्वीपासून पेशव्यांचे सरदार होते. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी त्यांना राज्याची वाटणी करून दिली होती.
त्याच काळात आनंदीबाई गरोदर होत्या. त्यांना पुढे फार प्रवास करणं सोपं नव्हतं. त्यामुळे मग राघोबादादांना आनंदीबाईंना तिथं ठेवावं लागलं. मग राघोबादादा तिथून पळून पुढे सुरतेला गेले.”
पेशवे घराण्याती स्त्री म्हणून धारमध्ये आनंदिबाईंना चांगली वागणूक मिळाली. धार किल्ल्यातल्या खरबुजा महलात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे पहिले काही दिवस गेले.
पुढे सवाई माधवराव पेशव्यांनंतर दुसरे बाजीराव पेशवे गादीवर आले.
पण ज्या खरबुजा महलमध्ये आनंदीबाई आणि त्यांनी आश्रय घेतला होता. त्याला नवी झळळी प्रप्त करून देण्यात आली आहे.
अजूनही मजबूत किल्ला
महाराष्ट्रातल्या जुन्या किल्ल्यांची तटबंदी ढासळत असल्याचं चित्र असताना धारचा हा किल्ला मात्र चारही बाजूंनी मजबुतीनं उभा आहे. या किल्ल्याच्या चारही भिंती अजूनही भक्कम, अभेद्य आणि सुस्थितीत आहेत.
शिवाय पुरातत्व खात्यानं किल्ल्याच्या संवर्धनासाठी हाती घेतलेल्या मोहिमेमुळे या किल्ल्याचं सौदर्य आणखी खुलून आलं आहे.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर हनुमानाचं मंदिर आणि दर्गा आहे, तर आतल्या विस्तीर्ण परिसरात इंग्रजांनी कैद्यांसाठी बांधलेलं कारागृह आहे. ज्याचं रुपांतर आता म्युझियममध्ये करण्यात आलंय.
त्याशिवाय खरबुजा महल, आरसे महल आणि विस्तीर्ण अशी बावडी या किल्ल्यात आहे. जिचा तळ काही केल्या सापडत नाही.
या किल्ल्यात एकूण सहा दर्गा आहेत, जे किल्ल्याच्या वेगवेगळ्या दिशेला आहेत. शिवाय इथं काही छत्र्यादेखील आहेत.
धार किल्ल्याचा इतिहास
सन 1010 ते 1055 दरम्यान राजा भोज परमारने हा किल्ला बांधल्याचा अनेकांचा दावा आहे. त्यावेळी त्याचं नाव धारा गिरी लिलोध्यान होतं.
पुरातत्व खात्याच्या लोकांना देखील तसंच वाटतं. त्यावेळी हा मातीच्या बुरुजांचा कच्चा किल्ला होता, असं धारचे करणसिंह पवार सांगतात.
पण राजा भोज परमारनेच हा किल्ला बांधल्याचे ठोस पुरावे मात्र हाती लागत नाहीत.
किल्ल्याचं सध्या दिसणारं मजबूत स्वरूप मात्र 1344 मध्ये बांधण्यात आलं आणि ते मोहम्मद तुघलकानं बांधलं यावर अनेक इतिहासकारांचं एकमत आहे. काही इतिहासकार मात्र तुघलकाला या किल्ल्याचा जीर्णोद्धारकर्ता मानतात.
दक्षिणेच्या मोहीमेवर जाताना मोहम्मद तुघलकाला इथं एका किल्ल्याची गरज भासली. कारण तोपर्यंत तुघलकाने माळवा भागावर आपलं वर्चस्व प्रस्तापित केलं होतं.
माळवा परिसर तेव्हासुद्धा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध होता आणि शेतीच्या उत्पन्नात अग्रेसर होता. त्यामुळे या भागाची सुरक्षा आणि देखरेख करण्यासाठी त्याला एका किल्ल्याची गरज होती. त्यातूनच त्याने हा किल्ला बांधला.
तुघलकाने हा किल्ला बांधल्याचं आणखी एक कारण धारचे करणसिंह पवार सांगतात, “मुघल आणि बाहेरून आलेल्या इतर शासकांचं सैन्य हे पगारी सैन्य होतं. त्यामुळे या सैन्याला ठेवण्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या किल्ल्याची गरज होती. भारतीय राजांकडे मात्र त्याकाळी पूर्णवेळ सैन्य नसायचं.”
मुघल सम्राट जहांगीरनं त्यांची आत्मकथा 'जहांगीरनामा'मध्ये या किल्ल्याचं वर्णन केलं आहे. त्यात त्याने राजा भोज आणि तुघलकाच्या वास्तूरचनेच्या ज्ञानाची स्तुती केली आहे.
शिवाय मुघल सम्राट शहाजहानचा मोठा मुलगा दारा शुकोह मुघल दरबारातल्या सत्तासंघर्षात याच किल्ल्यात काही काळासाठी आश्रय घेतला होता.
किल्ल्याची रचना
आयताकार डोंगरावर हा किल्ला बांधण्यात आला आहे. ज्याच्या चारही तटबंदी साधारण अडीच किलोमीटरपर्यंत पसरल्या आहेत.
या किल्ल्याच्या रचनेत हिंदू, इस्लामी आणि अफगाणी वास्तूकलेची छाप दिसून येते.
या किल्ल्याला तीन दरवाजे आहेत. त्यांना मजबुती देण्याचं काम औरंगजेबाच्या काळात झालं आहे.
किल्ल्याच्या बांधकामासाठी काळा आणि लाल दगड तसंच मुरुम वापरण्यात आला आहे.
दिल्लीच्या तख्तावर अल्लाउद्दीन खिलजी आल्यानंतर माळवा परिसरात इस्लाम धर्माचा प्रभाव वाढला जो या किल्ल्याच्या स्थापत्यकलेवरही दिसून येतो.
किल्ल्यात दिसणारी इस्लाम-अफगाण बांधकाम शैली त्याच काळात आकाराला आली आहे.
या किल्ल्याला एकूण 14 बुरुज आहेत. त्यातल्या काही बुरुजांवर छत्र्या आहेत. तर काही बुरुजांवर दरगाह आहेत. या किल्ल्याभोवती पूर्वी खंदक होता. आता मात्र ते दिसून येत नाही. किल्ल्याच्या अवतीभोवती सध्या मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालं आहे. छोट्या छोट्या वस्त्यादेखील उभ्या राहिल्या आहेत.
खरबुजा महल
या किल्ल्यातली अत्यंत महत्त्वाची आणि सर्वांत जास्त ऐतिसाहिक घटनांची साक्षीदार असलेली वास्तू म्हणून खरबुजा महलाकडे पाहिलं जातं.
हा महाल एका कस्तुरी खरबुजाच्या आकाराच्या बुरुजावर बांधण्यात आला आहे. त्यामुळे त्याला खरबुजा महल असं नाव पडलं.
प्रत्यक्षात हा महल पाहाताना आपल्याला खरबुजाचा आकार लक्षात येत नाही. पण, ज्यावेळी आपण त्याचा एरियल व्ह्यू म्हणजेच आकाशातून या महलाकडे पाहातो तेव्हा मात्र हा खरबुजाचा आकार लक्षात येतो. काहीअंशी या महलाच्या पायथ्याशी उभं राहिल्यावरही हा आकार लक्षात येतो.
किल्ल्याच्या वायव्येला असलेल्या या दोन मजली वास्तूला आता पुरातत्व खात्याने नवी झळाळी दिली आहे. त्यामुळे या वास्तूत प्रवेश करताच उत्तम निगा राखण्यात आलेल्या एखाद्या राजस्थानच्या राजवाड्यात घुसत असल्याचा भास होतो.
या महलाच्या तळ मजल्यावर छोट्या छोट्या खोल्या आहेत. ज्यांच्यात उजेड आणि हवा येण्यासाठी खास कवडसे वजा गवाक्ष आहेत.
या महलाच्या खालच्या मजल्यावर सात आणि वरच्या मजल्यावर चार खोल्या आहेत.
त्यातल्या खालच्या खोल्यांमध्येच दुसऱ्या बाजीराव पेशवे यांचा जन्म झाला. ते 2 वर्षांचे होईपर्यंत याच महलात त्यांची आई आनंदीबाईंसोबत राहिले होते.
या महालाची निर्मिती 16व्या शतकात मुघलांनी राहण्यासाठी केली होती. वेगवेगळ्या मुघल राजांनी या महलात मोहिमांच्या काळाता वास्तव्य केलं होतं.
1732 पवारांचं राज्य धारमध्ये स्थापन झाल्यानंतर पवार राजघराण्याचंदेखील याच महलात काहीकाळ वास्तव्य होतं.
या महलातून संपूर्ण धार शहर एका दृष्टीत पाहाता येतं. त्यामुळेसुद्धा हा महल त्याकाळी महत्त्वाचा मानला गेला.
याच महालाच्या शेजारून आपात्कालिन स्थितीत थेट गडाच्या पायथ्याशी जाणारा गुप्त दरवाजा असल्याचं सांगण्यात येतं.
पण आता मात्र महलाच्या खालचे सर्व गुप्त दरवाजे आणि खोल्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्याचं पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
शीश महल
मनोरंजनासाठी या महालाची निर्मिती करण्यात आली होती. ज्याला रंगशाळा म्हणूनसुद्धा ओळखलं जातं.
हीसुद्धा 2 मजल्यांची इमारत आहे. जिच्यासमोर भव्य चौथरा आहे.
लाल वाळूंच्या दगडाने बांधण्यात आलेली ही वास्तू अत्यंत भव्य आहे.
दौलताबादवरून दिल्लीला परत जाताना मोहम्मद तुघलकाने ही वास्तू बांधली होती. पुढे जहांगिरच्या काळात या महलाचं आणखी बांधकाम झाल्याच्या नोंदी आढळतात.
1857चा लढा आणि धार किल्ला
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या किल्ल्याचं महत्त्वाचं योगदान आहे. 1857च्या लढ्यात हा किल्ला काही महिने रोहिल्ल्याच्या ताब्यात होता.
त्यावेळी ब्रिटिश जनरल स्टिवर्डने तोफा लावून त्यांना नेस्तनाभूत करण्याचे आदेश दिले. सहा दिवस सतत किल्ल्यावर तोफांचा मारा करण्यात आला.
शेवटी 30 ऑक्टोबर 1857ला ब्रिटिश फौजा किल्ल्यात घुसल्या, पण त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. करण तोपर्यंत रोहिल्ले गुप्तमार्गानं तिथून निघून गेले होते. त्यानंतर मात्र हा किल्ला भारत स्वतंत्र होईपर्यंत ब्रिटिशांच्या ताब्यात राहीला.
ब्रिटिशांनी या किल्ल्यावर मारा करण्यासाठी वापरलेल्या तोफा आजही या किल्ल्याच्या म्यजिअममध्ये ठेवलेल्या दिसून येतात.
इंग्रजानी त्यांच्या गरजेनुसार या किल्ल्यात बदल घडवून आणला. महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळी कारगृह त्यांनी तिथं बांधली. तसंच काही कॉर्टर्स देखील इथं बांधण्यात आले. शिवाय इंग्रज अधिकाऱ्यांच्या निवासासाठी खरबुजा महलाच्या डाव्या बाजूला एक छोटेखानी वास्तू बांधली. जी आजही तिथं उभी आहे.
ASIने दिली नवी झळाळी
भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर मात्र हा किल्ला अनेक वर्षं जीर्णावस्थेत पडून होता. स्थानिक जिल्हा प्रशसनाकडे त्याची जबाबदारी होती.
इंग्रजांनी बांधलेल्या जेलचं रुपांतर त्या काळात एका म्युझिअममध्ये करण्यात आलं. धार जिल्ह्यातल्या उत्खननात सापडलेल्या वेगवेगळ्या पुरातन मुर्ती, शिलालेख, फोटो आणि इतर वस्तूंचं प्रदर्शन त्यात मांडण्यात आलं.
पण संपूर्ण किल्ल्यात मात्र तण माजलं होतं. खरबुजा आणि शीश महल डबघाईला आले होते. असामाजिक तत्वांचा किल्ल्यात वावर वाढला होता.
2017 मध्ये मात्र हा किल्ला ASI म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या ताब्यात आला. तिथून मग या किल्ल्याच्या पुनरुज्जीवनाचं काम सुरू झालं.
2018 मध्ये जेव्हा मी हा किल्ला पाहिला होता तेव्हा आणि आता 2023 मध्ये हा किल्ला पाहिला तेव्हा त्यात जमीनआस्मानचा फरक दिसून आला.
या किल्ल्याला त्याचे सोनेरी दिवस परत प्राप्त होत असल्याचा भाव आता इथं प्रतित होतो.
तण माजलेल्या बावडीला आता साफ करण्यात आलं आहे. तिच्या पायऱ्या पुन्हा बांधण्यात आल्या आहेत. खरबुजा आणि शिश महलाला त्यांचं गतवैभव परत प्राप्त करून देण्यात आलं आहे.
अजूनही इथं पुर्ननिर्माणाचं काम सुरू आहे. जे येत्या 2 वर्षांत पूर्ण होईल असं या किल्ल्याचे प्रभारी दिनेश मंडलोई यांनी सांगितलं.
या किल्ल्याला पर्यटकांच्या दृष्टीने विकसित करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यासाठी किल्ल्यात एक खोटेखानी खानावळ आणि विक्री केंद्र उभारण्यात येणार आहे.
तसंच किल्ल्याचा काही भाग खासगी कंपन्यांना लग्नकार्यासाठी भाड्याने देण्याचा सध्या विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. जेणेकरून किल्ल्यातून येणाऱ्या उत्पन्नाचा त्याच्याच संवर्धनासाठी विनियोग करता येईल.