जागतिक ज्योतिषशास्त्र दिन: तुमचं आजचं राशिभविष्य काय आहे? ते कितपत खरं आहे?

शनिवार, 20 मार्च 2021 (18:13 IST)
गुलशनकुमार वनकर
कन्या - "वैवाहिक जीवनात संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील."
मीन - "आरोग्यास जपा, संध्याकाळी डॉक्टरांची भेट घ्यावी लागेल."
कुंभ - "प्रवासाचा योग येईल."
दररोज सकाळी दारात पेपर आला की पहिलं पान, मुख्य बातम्या, क्रीडा-अर्थचक्राचं पान वगैरे पाहिल्यावर अनेकांच्या नजरा मधल्या एका पानावर, एका कोपऱ्यात कुठेतरी असलेल्या राशीभविष्याच्या कॉलमकडे वळतात.
आजही लक्षावधी वाचकांचा दिवस कसा असेल, याचा अंदाज त्यांच्याआधी कुण्या एखाद्या गुरुजींना आदल्या दिवशीच असतो, किंवा तसा अंदाज असल्याचा ते किमान दावा तरी करतात.
पण खरंच राशीभविष्य पाहून आपला दिवस काही बदलतो का? एकूणच ज्योतिषशास्त्र किती भरवशाचं मानावं? कारण जगाच्या पाठीवर इतकी वेगवेगळी आयुष्यं जगणारी माणसं फक्त बारा राशींमध्ये सरसकट कशी मोडणं शक्य आहे? अर्थात त्यातही मतभेद असतातच, म्हणजे कुणाची जन्मरास कुंभ असते, पण त्याची इंग्रजी कॅलेंडरमधील तारखेनुसार त्याचं 'sunsign' मेष असू शकतं. अशात कोणतं भविष्य खरं मानायचं - कुंभचं, ज्याच्याकडे पैसा येणार आहे की मेषचं, ज्याच्यापुढे "आज काही अत्यावश्यक खर्च समोर हात जोडून उभे असतील" असं लिहिलंय?
 
राशिभविष्य किती भरवशाचं?
बीबीसी मराठीतले अनेक पत्रकार यापूर्वी अनेक प्रतिष्ठेच्या वृत्तपत्रांमध्ये, वाहिन्यांमध्ये कुणी वार्ताहर म्हणून तर कुणी डेस्कवर उपसंपादक आणि पेज डिझाईन विभागात कार्यरत होते. त्यांच्यापैकीच काहींचे अनुभव पाहू या...
"मी 'त्या' संस्थेत असताना गोव्यात एक गुरुजी होते ते भविष्य मेलद्वारे पाठवायचे रात्री साडेअकराच्या बेतात. गुरुजीचं वय फार नव्हतं, पण त्यांची तब्येत नरमगरम असायची. बरे असले की ठरलेल्या वेळी मेल यायचा. पण त्यांना बरं नसलं की साडेनऊच्या सुमारास फोन यायचा आणि म्हणायचे, 'तुम्ही सांभाळून घ्या'.
"मग मी कामाला लागायचो. काकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी सगळी जुनी भविष्यं उकरायचो. वेगवेगळी परम्युटेशन वापरून वेगवेगळ्या राशींपुढे लिहायचो. समजा १६ मार्च असेल तर मग मी १६ मार्चचं आधीच्या वर्षांचं भविष्य काढायचो. एखादा माणूस विश्वासाने आणि श्रद्धेने वाचत असतो, याची जाणीव होती. पण तसंही भविष्य घडवण्याची गोष्ट आहे. तसं म्हणशील तर मग मी अनेकांचं भविष्य घडवलं आहे, वर्तवलं आहे."
तर आणखी एकाने सांगितलं की ते ज्या वृत्तपत्रात कामाला होते तिथे "एक गुरूजी महिन्याभराचं भविष्य एका झटक्यात पाठवून द्यायचे. त्यांच्यासोबत काम करता करता हे लक्षात आलं की काही राशींसाठी ग्रहांची स्थिती काही काळाने इतर राशींसाठीही लागू व्हायची. त्यामुळे अनेकदा गोष्टी रिपीट होणं साहजिक असायचं. म्हणजे पैशाचे व्यवहार करू नका, नवीन नोकरीची संधी, प्रवासाचा योग येईल अशा गोष्टी वाचकांपैकी अनेकांना आलटूनपालटून लागू व्हायच्या. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला अनेकदा खोट्या वाटतात, त्यामागे काही ना काही शास्त्र असावं."
(अर्थात, या कामाची नैतिक जबाबदारी तसंच त्या-त्या वृत्तसंस्थांची प्रतिष्ठा कायम राखून तसंच लोकांच्या भावना न दुखावण्यासाठी त्यांची नावं इथे टाळलेली बरी.)
 
राशिभविष्य - किती लॉजिक? किती मॅजिक?
अनेकदा तुम्ही मंदिरात किंवा जत्रेत गेलात की एखादी व्यक्ती असतेच जी तुमचा हातावरील रेषा पाहून भविष्य सांगण्याचा दावा करते. त्यापैकी काही निव्वळ पोकळ अंदाज असू शकतात तर काही शास्त्रावर आधारित, पार्श्वभूमीची माहिती घेऊन, पुढच्या व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक स्थिती पाहून वर्तवलेले ढोबळ अंदाज. यात काही खरे ठरू शकतात तर काही नाही.
'दिव्य मराठी' या मराठी वृत्त वेबसाईटवरील जीवन मंत्र सेक्शनमधलं 'आजचे राशिभविष्य' हे पान दररोज सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या पानांपैकी एक असतं, असं पत्रकार निलेश जोशी सांगतात. "एक गुरुजी आम्हाला दररोज 12 राशींची माहिती पाठवत असतात. हे सगळे ढोबळ अंदाज असतात."
सणांभोवती किंवा राजकीय व्यक्तिमत्त्वांच्या राशींभवती केलेल्या बातम्यासुद्धा सर्रास साईटवर हिट ठरतात, असंही निरीक्षणही ते नोंदवतात. म्हणजे 'आजकाल कुठे लोक कुंडली, राशी वगैरे बघतात?' असा विचार करणाऱ्यांना कदाचित यातून हेही लक्षात येईल की ज्योतिषशास्त्रात लोकांचा रस कधीच कमी झालेला नव्हता. उलट, जेव्हा संकटं येतात किंवा कुठल्याही गोष्टीबाबत अनिश्चितता असते, अस्वस्थता वाढते, तेव्हा लोक राशिभविष्यावर अधिक अवलंबून असतात. तुम्ही स्वतः किंवा तुमच्या अवतीभवतीचे लोकसुद्धा वृत्तपत्रांमध्ये किंवा वाहिन्यांवर सकाळी 7-8 वाजता आपला आजचा दिवस कसा जाणार, हे पाहून दिवस आखत असतील.
हा प्रत्येकाचा श्रद्धेचा विषय असतो, आणि त्यातूनच अनेकांना जीवन जगण्याची आशा मिळत असते, असं मत 'कालनिर्णय' दिनदर्शिकेचे संपादक जयराज साळगावकर नोंदवतात. ते सांगतात की राशिभविष्य हे लोकांच्या करमणुकीसाठी महत्त्वाचं आहे, कारण त्यात तथ्य अनेकदा नसलं तरी काही ना काही शास्त्र नक्की आहे, ज्या आधारे लोक त्यांच्या आजोबांकडे, वडिलांकडे त्यांच्या समस्या घेऊन यायचे. "आणि या फक्त 'आजचा दिवस कसा जाईल' किंवा 'मुलांचा विवाहयोग कधी', अशा समस्या नसतात... या काहीही असू शकतात," साळगावकर सांगतात.
"आमच्या ओळखीची एक उच्चभ्रू व्यक्ती आहे, त्यांची इटली, गोवा, मुंबई अशी अनेक ठिकाणी मोठमोठी घरं आहेत. त्यांचा एक मौल्यवान हिऱ्यांचा हार अनेक दिवसांपासून सापडत नव्हता, कोणत्या घरात, कोणत्या खोलीत, कोणत्या कपाटात ठेवलाय, त्यांना कळेना. अखेर त्यांनी आमच्या बाबांना या समस्येचं समाधान विचारलं, तेव्हा बाबांनी जरा विचार करून त्यांना सांगितलं की अमुक शहरातील त्या घरात तमुक दिशेला एक कपाट आहे, त्यात मागच्या बाजूला तो हार सापडेल.
"आणि तो खरोखरंच सापडला! मला विश्वास बसला नाही, पण असं खरंच झालं! यात काही ज्योतिषशास्त्र नव्हतं, पण त्याला आणखी कुठलंच शास्त्रीय तर्क लावता येणार नाही," असं ते सांगतात. "याच लहानशा मानसिक आधारासाठीच लोक ज्योतिषांकडे जातात किंवा राशिभविष्य वाचत असतात. प्रत्येकाला भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता असते," असं साळगावकर सांगतात.
 
भविष्याचा वेध - पोपट ते अॅप्स
पण मग बदलत्या काळात ज्योतिष शास्त्राचं रूप बदलतंय का? नक्कीच!
आजही अनेक गावांमध्ये, बहुदा शहरांमध्येसुद्धा रस्त्याच्या कडेला पोपटाचा पिंजरा घेऊन बसलेली व्यक्ती लोकांचं भविष्य सांगण्याचा दावा करते. तुमच्याही शहरांत कोणतं एक मठ आणि धार्मिक स्थळ असेल जिथले महाराज किंवा बाबा लोकांना त्यांना जे ऐकायचंय, ते सांगून धीर देण्याचा प्रयत्न करत असतील किंवा एखाद्या संभाव्य धोक्याची पूर्वसूचना देत असतील.
तरुणाईला टॅरो कार्ड नावाचा प्रकार माहीत असेल. आणि आता सगळ्यांच्या हातातल्या रेषा मोबाईलच्या कॅमेऱ्याने स्कॅन केल्या तर दररोजचं नवं भविष्य सांगणारे अनेक अॅप्स गुगल प्लेस्टोर आणि अॅपलच्या अॅप स्टोरवर उपलब्ध असतात.
यातही काही फ्री-वर्जन असतात, ज्यांद्वारे लोक काही मूलभूत माहिती मिळवू शकतात, जी सर्वांसाठी एकसारखी असू शकते, जसं की दैनंदिन राशिभविष्य. मात्र याचे काही 'पेड वर्जन' असतात, ज्यांद्वारे काही पैसे भरल्यावर आपण आपल्यासाठी खास अंदाज मागवू शकतो. आणि गरज भासल्यास, 'तज्ज्ञ' गुरुजींसोबत थेट सल्लामसलतही करू शकतो.
इथेही यशाची शाश्वती नसतेच - वेगवेगळ्या अॅप्सच्या रिव्ह्यूमध्ये तुम्हाला आभार मानणारे आणि बरंवाईट लिहिणारे असे दोन्ही प्रकारचे युजर्स आढळून येतात.
गेल्या काही वर्षांमध्ये, विशेषतः मोबाईल आणि इंटरनेटच्या उद्रेकामुळे ज्योतिषशास्त्राला नवसंजीवनी मिळाली आहे. जगातली स्पर्धा वाढतच आहे, शिक्षणा-कामाच्या संधी, घरच्यांपासून दूर राहण्यामुळे येणारं एकटेपण, सोशल मीडिया आणि या सगळ्यांमुळे येणारी अस्वस्थता किंवा anxiety, यामुळे लोक या अॅस्ट्रोलॉजी अॅप्सचा आधार घेताना दिसत आहेत.
त्यात कोरोनासारख्या साथींमुळे अनिश्चितता वाढली आहे, त्यामुळे लॉकडाऊनच्या आणि आयसोलेशनच्या काळात लोक अशा ऑनलाईन पर्यायांकडे अधिक वळताना दिसले. त्याला आणखी एक कारण म्हणजे काही राशीविशेष पेजेस आणि अकाउंट्ससुद्धा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहेत, ज्याद्वारे लोक आपल्या मिळत्याजुळत्या विचारांच्या लोकांशी थोड्याबहुत प्रमाणावर जोडले गेले आहेत.
खरंतर ज्योतिषशास्त्र किंवा भविष्य सांगण्याची कला आणि त्यामागचं शास्त्र कुणीच पूर्णपणे सिद्ध करू शकणार नाही. हजारो मैल दूरवरच्या चंद्र-ताऱ्यांमुळे, ग्रहांच्या स्थितीमुळे आपल्याबरोबर काय होणार, हे कुणाला सांगता येईल नक्की? पण कॅनेडियन अॅस्ट्रोलॉजर चार्म ट़ॉरेस यांच्या मते, "जेव्हा नैराश्य येतं, आपल्यापुढे आणखी कुठलाही पर्याय दिसत नाही, तेव्हा आपल्यासाठी भविष्यात काहीतरी मोठं नक्की वाढून ठेवलंय, हे सांगणारं कुणीतरी लागतं, म्हणून लोक हॉरोस्कोप आणि अॅस्ट्रोलॉजीकडे वळतात."
आणि या आशेच्या शोधात असलेल्यांमुळेच हजारो वर्षांपासून हे क्षेत्र आजही तितकंच लोकप्रिय आहे, जितकं खरंखुरं आणि सिद्ध विज्ञान.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती