हिवाळी अधिवेशन: टीका नरेंद्र मोदींवर, ट्वीट सुब्रह्मण्यम स्वामींचं, दिलगिरी व्यक्त केली अमोल मिटकरींनी...

मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (18:46 IST)
राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांच्यामुळे आज (27 डिसेंबर) सभागृहात भाजप आमदारांनी गोंधळ घातला. या गोंधळात स्वत: विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना हस्तक्षेप करावा लागला.

आमदार अमोल मिटकरींनी पंढपूर कॉरिडॉरचा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून विधानपरिषदेत मांडला.
 
मिटकरी म्हणाले, “पंढपूर कॉरिडॉरसंदर्भात लक्षवेधी आहे. पण उत्तरात सदर विकास योजनेत कॉरिडॉर असा प्रकल्प अंतर्भूत नाही. 3-11-2022 रोजी माननीय उपमुख्यमंत्री यांनी सदर आराखड्याच्या अनुषंगाने वारकऱ्यांसाठी समर्पित कॉरिडॉर निर्माण करण्याचे निर्देश दिले, असं उत्तर दिलेलं आहे."
 
"या कॉरिडॉरचं स्वरूप काय, त्या अनुषंगाने काय कारवाई केलेली आहे, या आराखड्यात बाधित होणारी पारंपरिक, ऐतिहासिक मंदिरं कोणती आहेत, त्याचे जतन-संवर्धन कशाप्रकारे होणार आहे, याबाबत स्थानिक जनता, संबंधित वारकरी यांना विश्वासात घेऊन निर्णय झाला आहे का?” मिटकरी म्हणाले.
 
“काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी स्वत: पंढरपूरला आले होते. त्यांनीही या कॉरिडॉरला विरोध केला होता. कुणावर टीका म्हणून नव्हे, पण स्वामींनी केलेलं ट्वीट मला सभागृहाला सांगायचं आहे. मी अनुमती असेल तर ट्वीट वाचून दाखवतो,” असं अमोल मिटकरी म्हणाले.
 
त्यानंतर उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाले, ट्वीटचा सारांश सांगा.
 
मग अमोल मिटकरींनी सुब्रह्मण्यम स्वामींनी केलेलं ट्वीट वाचून दाखवलं. त्या ट्वीटमध्ये स्वामींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना रावणाशी केली आहे.
 
स्वामींचे हे ट्वीट वाचून दाखवल्यानंतर विधानपरिषदेत भाजपच्या आमदारांनी गोंधळ घातला.
 
हा गोंधळ पाहून उपसभापती नीलम गोऱ्हे या खुर्चीवरून उठल्या आणि उभ्या राहिल्या. त्यानंतर भाजप आमदारांनी मिटकरींकडे माफीची मागणी केली. त्यानंतर गोऱ्हेंनी सांगितलं की, “माफीची आवश्यकता नाहीये. हे विधान फक्त पटलावरून काढून टाकते.”
 
त्यानंतर गोंधळ वाढल्यानं नीलम गोऱ्हेंनी सभागृह तहकूब केलं.
 
खडसेंकडून मिटकरींची पाठराखण
सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, "अमोल मिटकरींनी एक ट्वीट वाचून दाखवलं. त्यामुळे सभागृहाच्या भावना दुखावल्या आहेत. हे सर्व होत असताना, मी विनंती करतो की, पटलावरून ते काढून टाकावं आणि हा विषय संपवावा."
 
नंतर एकनाथ खडसे बोलण्यासाठी उभे राहिले आणि म्हणाले, "एका सदस्यानं ट्वीट वाचून दाखवलं, मग त्यावर आक्षेप घेतला गेला. मग त्यांनी ते विधान मागे घेतलं. मग विषय संपला पाहिजे ना त्या ठिकाणी. ते काही त्यांचं मत नाही. सुब्रह्मण्यम स्वामींचं मत आहे. स्वामी हे भाजपचे खासदार आहेत. जेवढं इकडे सांगतायेत, ते स्वामींना जाऊन सांगा मग."
 
मोदी देशाचं नाव रोशन करतात, त्याचं तुम्हाला वाईट वाटतं का? - मुख्यमंत्री
मग स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलण्यासाठी उभे राहिले आणि म्हणाले की, "या सभागृहाचं पावित्र्य राखण्याचं काम सगळ्यांनी करायचं असतं. यात पंढरपूरची लक्षवेधी होती. अमोल मिटकरींची भावना चांगली होती.
 
"तिथल्या वारकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन, तिथला विकास झाला पाहिजे. कुणावरही अन्याय होऊ नये, ही भावना सरकारची आहे. मला वाटलं त्यांची (मिटकरी) भावना चांगली आहे. पण त्यांनी मोदींबाबत अशाप्रकारचं वक्तव्य करणं, हा सभागृहाचा अवमान आहे," शिंदे म्हणाले.
 
"तसंच, मोदी या सभागृहाचे सदस्य नसताना, अशा प्रकारचे वक्तव्य कुणी करता कामा नये. आपली कुवत बघायला पाहिजे, त्यांची कुवत बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे, मोदीसाहेब देशाचे पंतप्रधान आहेत. आपल्या देशाचं नाव जगभरात त्यांनी रोशन केलं. आपल्याला अभिमान असायला पाहिजे की, जी-20 मध्ये संपूर्ण जगाचं नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळालीय.
 
"आपल्या देशाचं नेतृत्व, देशाचं गौरव करण्याचं काम मोदीसाहेब करतात, याचं तुम्हाला वाईट वाटतं का? त्यामुळे अमोल मिटकरींचं वर्तन चुकीचं आहे. कुणाच्याही भावना दुखावता कामा नये. सभागृहाचं पावित्र्य सगळ्यांनी जपलं पाहिजे. हे वक्तव्य निंदाजनक आहे."
 
अमोल मिटकरींकडून दिलगिरी व्यक्त
यानंतर शेवटी नीलम गोऱ्हे म्हणाले की, "अमोल मिटकरींचं वक्तव्य सभागृहाच्या पटलावरून काढून टाकलं आहे. माफीचा निर्देश मी देऊ शकत नाही."
 
यानंतर आमदार अमोल मिटकरींनी दिलगिरी व्यक्त केली.
 
“सन्मानीय मुख्यमंत्र्यांनी मला समज दिलीय. माझ्या तोंडून अनावधनानं काही निघालं असेल, तर दिलगिरी व्यक्त करतो,” असं अमोल मिटकरी म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती