उद्धव ठाकरे हे जगन मोहन रेड्डींसारखा विरोधकांना धोबीपछाड देतील का?
गुरूवार, 13 ऑक्टोबर 2022 (19:11 IST)
तुषार कुलकर्णी
'मी फक्त त्यांच्या रक्ताचाच वारसदार नाही तर त्यांच्या स्वभावाचा देखील वारसदार आहे. माझ्या वडिलांनी कधीच दिलेला शब्द मोडला नाही आणि मी देखील कधी ते करणार नाही.'
'जे नाव माझ्या आजोबांनी दिलं, जे नाव माझ्या वडिलांनी रुजवलं, ते तुम्ही घ्यायला निघाला आहात?'
ही दोन्ही वाक्यं वाचली तर काय लक्षात येतं? एखादा राजकीय नेता आपल्या वडिलांच्या वारशाबद्दल बोलत आहे, हाच बोध या वाक्यांतून होतो. पण ही दोन्ही वाक्यं एकाच नेत्याची नाहीत. ती दोन वेगवेगळ्या नेत्यांची आहेत.
पहिलं वाक्य आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचं आणि दुसरं वाक्य आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं.
आता साहजिकच असा प्रश्न मनात येऊ शकतो की उद्धव ठाकरे आणि जगन मोहन रेड्डी यांचा संबंध काय? दोघांची राज्यं वेगळी, दोघांचे मतदार वेगळे मग त्यांच्यात साम्य तरी काय?
त्यांच्या दोघातील एक ठळक साम्य म्हणजे जगन यांचे वडील YSR राजशेखर रेड्डी आणि उद्धव यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे अत्यंत मोठा जनाधार होता.
वायएसआर रेड्डी यांच्या मृत्यूनंतर जगन राजकीयदृष्ट्या सारंकाही गमावून बसले होते तर बाळासाहेबांच्या मृत्यूच्या काही वर्षांनी झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचे मोठे राजकीय नुकसान झाले आहे, हे कुणीही नाकारणार नाही.
पण एक गोष्ट सहजच मनात येते की जसं, जगन मोहन रेड्डींची देखील राजकीय कोंडी झाली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा जोमाने उसळी मारली आणि आपली सत्ता आणली तशी उद्धव ठाकरे आणू शकतील का?
सोशल मीडियावर जर चर्चा पाहिली तर उद्धव ठाकरेंच्या बाजूने आणि विरोधात अशा दोन्ही प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळतील.
अनेक जणांना वाटतं की ते 'कमबॅक' करतील. अनेकांनी तसा कमबॅक केला आहे त्यांची उदाहरणे दिली जातात.
तर सोशल मीडियावर अनेक जणांना असं वाटतं की अशा प्रकारचा कमबॅक अशक्यच आहे.
राजकीयदृष्ट्या सर्वकाही गमावल्यानंतर आंध्रप्रदेशात सत्ता स्थापन्याची किमया जगन मोहन रेड्डींनी साधली होती. उद्धव ठाकरे ती साधू शकतील का? अनेकांना अशक्य वाटणारी गोष्ट जगन मोहन यांनी नेमकी केली तरी कशी.
वडिलांच्या वारशामुळे राजकारणात आलेल्या जगन मोहन यांच्यावर आपलाच पक्ष सोडण्याची वेळ आली होती. अनेक महिने तुरुंगात काढावी लागली.
पुन्हा शुन्यापासून सुरुवात करून त्यांनी आपली सत्ता आणली आणि ते दुसऱ्यांदा निवडून आले. म्हणजे राजकीयदृष्ट्या सारंकाही गमावण्याची वेळ त्यांच्यावर आलेली असताना त्यांनी मुसंडी कशी मारली हे पाहणं रोचक ठरतं.
रेड्डी कुटुंब राजकारणात कसं आलं?
जगन मोहन यांचा राजकीय प्रवास आणि संघर्ष कसा आहे हे पाहण्याआधी आपण त्यांचा राजकीय वारसा पाहू.
जगन मोहन रेड्डींचे आजोबा राजा रेड्डी हे कडप्पा जिल्ह्यातील जमीनदार कुटुंबातील होते.
बीबीसी तेलुगुचे प्रतिनिधी शंकर वडिशेट्टी सांगतात की "राजा रेड्डी हे कधीच संसदीय राजकारणात नव्हते पण कडप्पा जिल्ह्यातील खाणींशी संबंधित कंत्राट घ्यायचे."
शंकर सांगतात, " खाण कर्मचारी, मजूरांचे जे विविध गट तट असत त्यापैकी एका गटाचे राजा रेड्डी नेते होते. त्या माध्यमातूनच त्यांनी त्यांचा दबदबा पुलिवेंडुला या भागात निर्माण केला आणि त्यांनी घातलेल्या पायावरच पुढे दोन पिढ्यांची राजकीर्द बहरली."
राजा रेड्डींचे पुत्र वायएस राजशेखर रेड्डी हे 1978 साली पहिल्यांदा जेव्हा पुलिवेंदुलामधून विधानसभेवर निवडून गेले तेव्हापासून हा मतदारसंघ त्यांच्याच कुटुंबाकडे आहे.
'1 रुपयावाला डॉक्टर'
राजा रेड्डी हे थेट राजकारणात आले नाही पण त्यांचे पुत्र वायएस राजशेखर रेड्डी मात्र राजकारणात आले.
वायएस रेड्डी राजकारणात येण्यापूर्वी ते गुलबर्ग्याला एमबीबीएससाठी गेले. त्या ठिकाणीच त्यांचा विद्यार्थी संघटनांशी संबंध आला आणि ते विद्यार्थी नेते बनले.
तिथून परत आल्यावर त्यांनी पुलिवेंदुला येथेच 70 खाटांचे हॉस्पिटल सुरू केले.
केवळ एक रुपया फी घेऊन ते आपल्या रुग्णांची तपासणी करत त्यामुळे त्या भागात त्यांची ओळख 1 रुपयावाले डॉक्टर अशी बनली होती असं शंकर सांगतात.
आपले क्लिनिक सांभाळता सांभाळताच त्यांचा जनसंपर्क वाढला आणि युथ काँग्रेसमध्ये ते सक्रिय बनले. 1978 ला त्यांनी काँग्रेसची तिकिटांवर त्यांनी पुलिवेंदुलातून निवडणूक लढवली आणि ते आंध्रप्रदेश विधानसभेवर गेले. दोनच वर्षांत ते मंत्रीदेखील बनले.
इंदिरा गांधीच्या निधनानंतर भारतीय काँग्रेसची सूत्रं राजीव गांधींच्या हाती आली आणि युथ काँग्रेसच्या नेत्यांचे महत्त्व अधिकच वाढले.
1983 मध्ये आंध्रप्रदेशात काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा पराभव झाला पण वायएसरेड्डी यांनी आपली जागा राखली. त्यांच्या या कामगिरीने राजीव गांधींचे लक्ष वेधले आणि पुढील दोन वर्षांत ते आंध्रप्रदेश काँग्रेसचे प्रमुख बनले.
अंतर्गत गटबाजी, हेवेदावे, हायकमांडची खपामर्जी होणं अशा अनेक संकटांचा सामना करत करत ते आपली राजकीय वाटचाल करत होते.
हे चालू असतानाच रेड्डींना यांना एक मोठा धक्का बसला. ते म्हणजे 1998 मध्ये वायएसआर रेड्डींचे वडील राजा रेड्डी यांच्यावर बॉम्बने हल्ला करण्यात आला आणि त्यात त्यांचे निधन झाले.
एका बाजूला राज्याच्या काँग्रेसमध्ये रेड्डींची पकड मजबूत होत होती तर दुसऱ्या बाजूला तेलुगु देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांची राजकीय कारकीर्द बहरू लागली होती.
1995 साली ते एनटीआर यांच्यानंतर मुख्यमंत्री बनले आणि पुढील नऊ वर्षं त्यांनी आंध्रप्रदेशची सत्ता सांभाळली.
पदयात्रा- सत्तेचा राजमार्ग?
हैदराबादचा चेहरामोहरा बदलणारे, शहरात आयटी उद्योग आणणारे नेते अशी त्यांची ओळख बनली.
त्यांना हरवणं हे विरोधकांसाठी एक मोठं आव्हान बनलं होतं. माझ्याविरोधात मत म्हणजे विकासाविरोधात मत असाच प्रचार ते त्या काळात करत.
कधी उपोषण तर धरणे आंदोलन असं सुरू ठेवत विरोधी नेता म्हणून आपलं स्थान बळकट करत गेले.
2003 मध्ये रेड्डी यांनी पदयात्रा केली. सात महिन्यांमध्ये 1500 किमी चालले. त्या पदयात्रेदरम्यान हजारो लोकांशी त्यांचा संपर्क आला आणि 2004 मध्ये ते मुख्यमंत्री बनले.
2004 ला मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी सर्वाधिक प्राधान्य लोककल्याणाच्या योजनांना दिले. त्यातील दोन प्रमुख योजनांचा उल्लेख शंकर करतात.
ते सांगतात की "त्या काळात त्यांनी अनेक योजना अंमलात आणल्या पण त्यातील दोन योजनांच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त लोकांशी जोडले गेले. एक म्हणजे आरोग्य श्री योजना आणि दुसरी म्हणजे फी माफीची योजना."
"दारिद्र्य रेषेखाली असलेल्या मुलांसाठी त्यांनी शैक्षणिक फी माफीची योजना सुरू केली होती. या योजनेचे वैशिष्ट्य असे होते की खासगी कॉलेजमध्ये जरी तुम्ही प्रवेश घेतला आणि फी भरली तर योग्य कागदपत्रे दाखवल्यावर फी ची रक्कम परत मिळत असे.
"या योजनेमुळे अनेक विद्यार्थ्यांना इंजिनिअर आणि व्यवस्थापनाची फी परवडली. या योजनेतील अनेक लाभार्थी पुढे जगन मोहन यांच्यासोबत जोडले गेले. आजही या योजनेतील अनेक लाभार्थी हे YSR काँग्रेसमध्ये असल्याचे दिसेल," असं शंकर सांगतात.
YSR रेड्डींचे निधन आणि जगन मोहन यांच्या कारकीर्दीची सुरुवात
2009 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये रेड्डी पुन्हा बहुमत घेऊन आले आणि राज्याचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. पण केवळ तीन महिन्यातच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आणि त्यात त्यांचे निधन झाले.
त्यांच्या निधनाआधीच जगन मोहन रेड्डी हे सक्रिय राजकारणात आले होते. 2009 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते कडप्पा मतदारसंघातून लोकसभेवर गेले होते पण खऱ्या अर्थाने त्यांचा राजकीय प्रवास हा त्यांच्या वडिलांच्या निधनानंतरच सुरू झाला.
वायएसआर रेड्डी यांच्या समर्थकांनी जगन मोहन रेड्डी हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले.
अनेक आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. त्या वेळी जगन मोहन यांनी 'वेट अॅंड वॉच'ची भूमिका घेतली. सोनिया गांधी वेळ घेतील पण कदाचित आपल्याच बाजूने कौल देतील असा अंदाज जगन मोहन यांना होता पण तो फोल ठरला.
त्यांच्याऐवजी के. रोसय्या यांची निवड मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली.
पुढील वाट खडतर असल्याची जाणीव त्यांना याच वेळी झाली असावी कारण त्यांनी सोनिया गांधी यांना कळवले की आपल्या वडिलांच्या निधनानंतर राज्यातील 600 हून अधिक लोकांचे निधन झाले आहे. यातील काही जणांचे हृदयविकाराने तर काही जणांनी नैराश्यातून आत्महत्या केली. या साडेसहाशे कुटुंबीयांना मला भेटायचे आहे.
सोनिया गांधी यांनी यात्रेला परवानगी दिली नाही. या यात्रेमुळे जगन मोहन यांच्या बाजूने सहानुभूतीचे प्रचंड लाट निर्माण होईल आणि ते पुन्हा मुख्यमंत्रिपदावर दावा करतील याचा अंदाज त्यांना बहुधा आला असावा.
लेखाच्या सुरुवातीला वापरण्यात आलेले वाक्य हे 'ओडारपू यात्रा' म्हणजेच सांत्वन यात्रेसंदर्भातच आहे. या यात्रेवेळीच ते म्हणाले होते की मी या लोकांना भेटायचं वचन दिलं आहे.
'त्यांना दिलेलं वचन मी मोडू शकत नाही', असं म्हणत सोनिया गांधी यांच्या मर्जीविरोधात त्यांनी सांत्वन यात्रा सुरूच ठेवली.
या यात्रेचं स्वरूप म्हणायला केवळ भावनिक होतं असं नाही तर या यात्रा राजकीय होत्या असं शंकर सांगतात. त्यांनी या यात्रांचे वृत्तांकन देखील केले आहे.
शंकर सांगतात की "ज्या ठिकाणी जगन मोहन जात त्या ठिकाणी अनेकांना ते भेटत. वायएसआर यांच्या पुतळ्याचे अनावरण करत. तुम्ही देखील माझ्या कुटुंबाचाच भाग आहात असं लोकांना सांगितलं जाई. या यात्रांना मोठा प्रतिसाद मिळत असे. अक्षरशः वीस-वीस तास जगन मोहन यांना मी काम करताना पाहिलं आहे. आपल्याला किती प्रतिसाद मिळतो याची देखील चाचपणी त्यांनी या काळात केली."
जगन मोहन यांच्या यात्रांचे फोटो आणि व्हिडिओ सातत्याने त्यांच्याच मालकीच्या 'साक्षी' वर्तमानपत्रात आणि 'साक्षी टीव्ही'वर दिसायचे. माध्यमांचा वापर देखील त्यांनी खुबीने केल्याचं आपल्याला दिसतं.
शिव कुमार नावाच्या वायएसआर च्या चाहत्याने YSR काँग्रेस नावाने पक्षाची नोंदणी केली होती. हेच नाव जगन यांनी त्यांच्याकडून घेतलं आणि 2011 मध्ये या पक्षाची सूत्रं हाती घेतली.
तेव्हापासून त्यांच्या कारकीर्दीचा नवा टप्पा सुरू होतो.
जगन मोहन यांच्यावर झालेले आरोप आणि तुरुंगवास
जगन मोहन रेड्डी यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप झाले.
2009 साली जगन मोहन रेड्डी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात त्यांची संपत्ती 77 कोटी इतकी होती.
2019 साली म्हणजेच दहा वर्षांनी त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात त्यांची संपत्ती 375 कोटी रुपये इतकी जाहीर केली आहे.
2012 मध्ये जगन मोहन यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सीबीआयकडून अटक झाली आणि या प्रकरणात त्यांना चंचलगुडा तुरुंगात 16 महिने काढावे लागले. 2013 मध्ये ते तुरुंगातून जामिनावर बाहेर पडले.
जगन मोहन यांनी त्यांच्यावरील आरोप नेहमीच फेटाळले आहेत. आपण सोनिया गांधी यांच्याविरोधात जाऊन सांत्वना यात्रा केली यामुळेच आपल्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे ते सांगत. या कारवाईमुळे त्यांना जनतेची उलट सहानुभूतीच मिळाल्याचं जाणकार सांगतात.
ज्या वेळी जगन मोहन तुरुंगात होते त्यावेळी त्यांची बहिण शर्मिला रेड्डी यांनी पदयात्रा काढली. या यात्रेत त्यांनी 3112 किमीचा पायी प्रवास केला.
या यात्रेत त्यांनी हे देखील म्हटले होते की "9 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी पदयात्रा काढून राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन केले होते. खरं तर जगन हे आज तुमच्यासोबत हवे होते पण त्यांच्यावर खोटे आरोप करुन त्यांना डांबून ठेवण्यात आलं आहे."
म्हणून मी तुमच्यापर्यंत आली आहे. या यात्रेमुळे सहानुभूतीची लाट निर्माण होत गेली असं शंकर सांगतात.
तुरुंगाबाहेर आल्यावर ते 2014 च्या निवडणुकीच्या तयारीला लागले. तेव्हा आंध्र प्रदेशमधून तेलंगण वेगळे झाले होते. त्यांनी आंध्र प्रदेशावरच लक्ष केंद्रित केलं. त्याच ठिकाणी त्यांची ताकद होती.
या निवडणुकीत ते बहुमताने निवडून येतील आणि नव्याने तयार झालेल्या आंध्र प्रदेशचे ते मुख्यमंत्री होतील अशी अनेकांना आशा होती पण या निवडणुकीत त्यांना 175 पैकी 67 जागा आल्या आणि ते विरोधी पक्षनेते बनले.
जगन मोहन यांची 'प्रजा संकल्प यात्रा'
आधी वडील, नंतर बहीण यांनी पदयात्रा काढल्या होत्या. वडिलांच्या पदयात्रेमुळे त्यांचे सरकार आले होते. बहिणीच्या पदयात्रेमुळे जनसंपर्क वाढला होता. आणि जगन मोहन यांच्या यात्रेमुळे सरकारच आले.
जगनमोहन यांनी 2017 मध्ये प्रजा संकल्प यात्रा सुरू केली.
14 महिन्यांच्या काळात जगन मोहन रेड्डींनी 3648 किमीचा पायी प्रवास पूर्ण केला. या काळात 5000 हुन छोट्या-मोठ्या सभा घेतल्या. हजारो लोकांना भेटले. आणि वायएसआर यांच्या काळात लाभलेले सोनेरी दिवस पुन्हा येतील याचं आश्वासन दिलं.
"त्यांच्या या पदयात्रेचा योग्य तो परिणाम झाला आणि 2019 च्या निवडणुकीत त्यांनी 151 विधानसभेच्या जागा जिंकल्या. 2014 मध्ये जेव्हा त्यांनी 67 जागा जिंकल्या होत्या तेव्हा 23 जण त्यांना सोडून तेलुगु देसम पक्षात गेले होते. त्याच तेलुगु देसम पक्षाच्या केवळ 23 जागा 2019 मध्ये आल्या हा एक विचित्र योगायोगच म्हणावा लागेल," असं शंकर सांगतात.
जगन मुख्यमंत्री बनले
"वायएसआर रेड्डी यांचा भर 'वेलफेअर स्कीम' म्हणजेच लोककल्याणकारी योजनांवरच होता. जेव्हाही जगन समर्थकांना किंवा लोकांना भेटत असत तेव्हा ते मुख्यमंत्री नसताना देखील त्यांची शान एखाद्या मुख्यमंत्र्याप्रमाणेच होती.
"ते लोकांमध्ये मिसळत आणि वडिलांच्या काळात ज्याप्रमाणे कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत असे तो तुम्हाला मिळेल याचं आश्वासन देत. यामुळे त्यांचे सरकार आले," असं शंकर सांगतात.
2019 मध्ये आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री बनले. 2009 मध्ये काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रिपद नाकारले होते त्यानंतर दहा वर्षांत ते मुख्यमंत्री बनले.
आंध्रपद्रेशात काँग्रेसने 174 जागा लढवल्या होत्या त्या ठिकाणी एकही आमदार निवडून आला नाही.
"संयुक्त आंध्रप्रदेश असताना जो महसुलाचा ओघ होता तो तेलंगानाच्या निर्मितीनंतर कमी झाला आहे. आंध्रप्रदेशची अर्थव्यवस्था ठीक करण्याचे, नवीन संधी निर्माण करण्याचे, रोजगार निर्माण करण्याचे आव्हान जगन मोहन यांच्यासमोर आहे," असं शंकर सांगतात.
राजकीय दृष्ट्या नामोनिशाण मिटवण्याचे प्रयत्न झाल्यानंतर जगन मोहन रेड्डींनी आपल्या विरोधकांना धोबीपछाड दिला आणि ते पुन्हा सत्तेत आले.
शिवसेनेचे चिन्ह गोठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे देखील म्हणाले की एकदाचा लवकरात लवकर निर्णय घ्या आणि आम्हाला नवे चिन्ह द्या म्हणजे आम्ही जनतेत जाऊ शकू आणि त्यांच्याकडून कौल घेऊ.
जगन मोहन रेड्डी आणि उद्धव ठाकरे यांच्या परिस्थितीबाबतची तुलना करताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात, "वडिलांच्या निधनानंतर जगन मोहन यांनी काँग्रेस सोडली. स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि संपूर्ण राज्यभर दौरे केले. त्या काळात त्यांना अटक झाली.
"चौकशी देखील झाली पण सहानुभूती त्यांच्या बाजूने होती. आता राज्यातली परिस्थिती पाहिली की असं दिसतं की उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती आहे. आदित्य ठाकरे दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांना प्रतिसाद होता आणि उद्धव ठाकरेंच्या सभेला देखील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसला.
"ठाकरेंच्या गटाला शिंदेंचा गट हा काही पर्याय वाटत नाही. कारण एकनाथ शिंदे सोडले तर इतर कुणी स्वतःच्या ताकदीवर निवडून येईल असा नेता त्यांच्याकडे नाही. त्यामुळे भविष्यात त्यांना पुन्हा मुसंडी मारता येणारच नाही असे म्हणण्याचे काही कारण नाही," असं देसाई सांगतात.
उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी देखील आपण जनतेमध्ये जाऊन पुन्हा आपले राज्य आणू असा विश्वास व्यक्त केला आहे.
दक्षिणेतील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात खूप फरक आहे. त्यामुळे तिकडे जशी किमया जगन मोहन यांनी साधली तशी इथे साधता येणं अनेकांना अशक्य वाटतं पण politics is art of impossible असं म्हटलं जातं.
तेव्हा जनता हा कौल ठाकरेंना देईल का हे येणाऱ्या काळच ठरवेल असं आता तरी वाटतं.