मराठीतून इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्याने नोकरीच्या संधीवर परिणाम होईल का?

शुक्रवार, 30 जुलै 2021 (14:53 IST)
- दीपाली जगताप
इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आता मराठीतून शिकता येणार आहे. आठ राज्यातील 14 इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये मातृभाषेतून शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. यात मराठी, हिंदी, तेलगू, तमिळ आणि बांगला या भाषांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात घोषणा केली.
 
मातृभाषेत इंजिनिअरिंगचे शिक्षण द्यावे, असे निर्देश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदने (AICTE) नुकतेच दिले आणि त्यानुसार मुंबई विद्यापाठातही लवकरच मराठी भाषेत इंजिनिअरिंगचे धडे दिले जाणार आहेत.
 
इंजिनिअरिंग शिक्षणाच्या क्षेत्रात हा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे. पण या निर्णयाच्या दोन बाजू असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
 
पहिली बाजू म्हणजे, इंजिनिअरिंगसारखा तांत्रिक विषय मातृभाषेतून शिकता येणार आहे. इंग्रजी भाषेला पर्याय मिळाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. अनेक देशांमध्ये हा अभ्यासक्रम मातृभाषेतून शिकवला जातो.
 
परंतु याची दुसरी बाजू म्हणजे, हा निर्णय व्यवहार्य ठरू शकतो का? इंजिनिअरिंगच्या तांत्रिक अभ्यासक्रमाचे भाषांतर मराठीत करून ती व्यवहारात कशापद्धतीने आणली जाणार? यामुळे नोकरी मिळणं अधिक कठीण होऊन बसेल का? इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाचे दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध आहे का? तशी पूर्व तयारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केली आहे का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात.
 
निर्णय नेमका काय आहे?
देशातील सर्व इंजिनिअरिंग महाविद्यालयांसाठीची केंद्रीय आस्थापना म्हणजेच AICTE ने मातृभाषेत अभ्यासक्रम सुरू करा अशी शिफारस केली होती. त्यानुसार महाराष्ट्रात आता मराठीतून हा अभ्यासक्रम शिकवण्यास मान्यता मिळाली आहे.
 
सुरुवातीला मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील महाविद्यालयांमध्ये मरीठातून इंजिनीअरिंग सुरू केलं जाणार असल्याचं समजतं. इतर महाविद्यालयांनी यासाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
 
केवळ इंग्रजी भाषेच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगकडे पाठ फिरवू नये आणि मातृभाषेतून विद्यार्थ्यांचे आकलन अधिक चांगले होते या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
 
याविषयी बोलताना मुंबई विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उकरंडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "कोणत्याही विद्यार्थ्याला आपल्या मातृभाषेतून दिलेल्या शिक्षणाने अधिक चांगल समजतं, संकल्पना अधिक स्पष्ट होतात. त्यामुळे विद्यार्थी अधिक सक्षम बनतो. हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असावा. आपण जर्मनी, स्पेन, चीन अशा अनेक देशांची उदाहरणं घेऊ शकतो. याठिकाणी संपूर्ण शिक्षण स्थानिक भाषेतून दिलं जातं."
 
इंजिनिअरिंग अभ्यासक्राचे साहित्य मराठी भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी काम सुरू झाल्याचंही ते सांगतात. AICTE ने याची तयारी आधीच सुरू केली आहे असं ते म्हणाले.
 
राज्यातील इंजिनिअरिंग महाविद्यालयात दरवर्षी 60-70 हजार प्रवेशाच्या जागा रिक्त राहतात. यंदा अनेक महाविद्यालयांनी प्रतिसाद न मिळाल्याने अभ्यासक्रम बंद केल्याचंही समोर आलं. पण मराठीतून इंजिनिअरिंगचे प्रत्यक्षात शिक्षण कितपत शक्य आहे? याविषयी ते सांगतात, "केवळ साहित्य तयार करून उपयोग नाही. त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या संकल्पना मराठी भाषेतून शिकवण्यासाठी त्यानुसार नव्याने फॅकल्टी उभी करावी लागणार. हे आव्हानात्मक आहे, पण कोणत्याही नवीन अभ्यासक्रमाला लोकमान्यता मिळण्यासाठी किंवा यश मिळण्यासाठी वेळ द्यावाच लागतो."
 
मुंबई विद्यापीठाने इंजिनिअरिंग महाविद्यालयांना प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन केले आहे. प्रस्ताव आल्यानंतर ते AICTE कडे मंजुरीकरीता पाठवण्यात येणार आहे.. त्यांनंतर तंत्रशिक्षण संचालनालय (DTE) त्याला मान्यता देईल आणि मग मुंबई विद्यापीठाच्या अॅफिलिएशनने कोर्स सुरू केला जाईल.
 
ते पुढे म्हणाले, "मराठीतून अभ्यासक्रम म्हणजे इंग्रजीचा वापर होणारच नाही असे नाही. आम्हाला मिळालेल्या सूचनांनुसार, विद्यार्थ्यांना मातृभाषेत शिकवत असताना त्यांना औद्योगिक क्षेत्रात सक्षम बनवण्यासाठी सुद्धा तयार करायचे आहे. त्यामुळे दोन्ही भाषांचा समतोल राखावा लागेल."
 
'इंजिनिअरिंगमध्ये इंग्रजीकडे दुर्लक्ष करता येणार नाही'
पिलाय कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रशांत लोखंडे सांगतात, "मराठीतून इंजिनिअरिंग शिकता आल्याने विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे कल अधिक वाढेल. कारण इंग्रजीच्या भीतीमुळे विद्यार्थी अभ्यासक्रमापलिकडे विचार करत नाही असं आढळून येतं."
 
इंजिनिअरिंग हा तांत्रिक विषय असल्याने अनेक प्रचलित व्याख्या, शब्द हे इंग्रजी भाषेचे आहेत. त्याचे भाषांतर करुन चालणार नाही असंही ते सांगतात.
 
"प्रचलित शब्द हे इंग्रजीच वापरावे लागतील हे स्पष्ट आहे. उदाहरणार्थ, इंजिन, ब्लॉक, रिसिव्हर, टीव्ही, केबल असे अनेक इंग्रजी शब्द आपण मराठीमधून संवाद साधतानाही वापरतो. अशा तांत्रिक संकल्पना शिकवताना शब्दश: भाषांतर करता येणार नाही. तसे केले तर विद्यार्थ्यांमध्ये आणखी गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे मराठीतून शिकवायचे असल्यास इंजिनीअरिंगच्य़ा प्रचलित भाषेकडे दुर्लक्ष करता येणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
मातृभाषेत अभ्यासक्रम उपलब्ध झाल्यास विशेषत: ग्रामीण विद्यार्थ्यांची संख्या वाढेल. त्यांच्या संधी वाढू शकतील. सुरुवातीला परकीय भाषेचा न्यूनगंड असतो त्याची भीती कमी होईल असंही काही प्राध्यापकांचं म्हणणं आहे.
 
व्हीजेटीआयमधून पदवी आणि आयआयटी मुंबईमधून नुकतेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेला अभय गायकवाड आता एका खासगी इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करतो. तो सांगतो, "इंग्रजीमुळे अनेक विद्यार्थ्यांना सुरुवातीला शिक्षण खूप जड जातं. भाषा समजण्यासाठीच खूप मेहनत घ्यावी लागते. संकल्पना समजल्या तरी त्या इंग्रजीमधून मांडताना विद्यार्थ्यांचा कस लागतो. याचा परिणाम निकालावर होतो आणि आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर इंग्रजी भाषा सुधारण्याचा प्रयत्न करावा लागतो."
 
मराठीतून अभ्यासक्रम सुरू होणार याची घोषणा तर केंद्र सरकारने केली. परंतु पूर्ण तयारी न करता अभ्यासक्रम सुरू केला तर विद्यार्थ्यांना त्याचा भूर्दंड सोसावा लागण्याची भीती मुंबईतील इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक वैभव नरावडे यांनी व्यक्त केली.
 
ते सांगतात, "भारतीय भाषांमधून शिक्षणाला सुरुवात होते हे स्वागतार्ह आहे पण त्यासाठी पूर्वतयारी असणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर धड मराठी नाही आणि इंग्रजीही नाही अशी मुलांची अवस्था होईल. याची काळजी अभ्यासक्रमाचे साहित्य तयार करतानाच घ्यायला हवी."
 
नोकरी मिळवताना अडचण येईल?
देशातील बहुतांश इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्लेसमेंट विभाग कार्यरत आहे. म्हणजेच औद्योगिक कंपन्या महाविद्यालयाच्या आवारात येऊन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतात. आयआयटी संस्थांमध्ये तर मोठ्या संख्येने देश-विदेशातील कंपन्यांकडून प्लेसमेंट केली जाते.
 
पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या साधारण शेवटच्या वर्षी कंपन्या विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया महाविद्यालयात करतात.
 
इंजिनिअरिंग प्लेसमेंटसाठी 20 वर्षांपासून कार्यरत असलेले प्रशांत लोखंडे सांगतात,"ज्यावेळी कंपन्या आमच्याकडे रिक्रूटमेंटसाठी येतात तेव्हा तीन गोष्टी प्राधान्याने पाहिल्या जातात. अॅटिट्यूट, अॅप्टीट्यूड आणि अॅकेडमिक या तिन्हीचे उमेदवाराला किती ज्ञान आहे यावरून त्याची निवड केली जाते."
 
"स्थानिक कंपन्या जुजबी इंग्रजी असले तरी निवड करतात. पण मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये संधी मिळण्यासाठी इंग्रजी भाषा हा प्लस पॉईंट ठरतो," असं आपल्या निदर्शनास आल्याचं त्यांनी सांगितलं.
 
साधारण दीड वर्षांपूर्वी या प्रक्रियेला सामोरं गेलेला अभय सांगतो, "प्लेसमेंटसाठी कंपन्या जेव्हा महाविद्यालयात येतात तेव्हा इंजिनीअरिंगच्या संबंधित विषयाची जाण आणि इंग्रजी भाषा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. अपेक्षित इंग्रजी भाषा येत नसल्याने संधी दिली नाही असाही फिडबॅक कंपन्यांकडून दिला जातो."
 
प्लेसमेंटसाठी स्पर्धाही प्रचंड असते. कारण कंपन्या संबंधित महाविद्यालयातील सर्वोत्तम कौशल्य आपल्याकडे येईल यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे स्पर्धेत विद्यार्थी सक्षम राहतील याकडेही लक्ष द्या असं जाणकार सांगतात.
 
प्राध्यापक वैभव नरावडे सांगतात, "बहुतांश कंपन्या विद्यार्थ्याचे कौशल्य पाहून त्याची निवड करतात. अनेक कंपन्या स्वतंत्र प्रशिक्षण सुद्धा देतात. पण आपण स्पर्धेचाही विचार करावा. कौशल्य आणि व्यवहारात वापरली जाणारी इंग्रजी भाषा या दोन्ही गोष्टी ज्या विद्यार्थ्याकडे आहे त्याची निवड प्राधान्याने होणार. हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे."
 
"परदेशात जाण्यासाठी सुद्धा इंग्रजी भाषेची चाचणी घेतली जाते. त्यामुळे या निर्णयाविषयी अजूनही साशंकता आहे. मराठीतून इंजिनिअरिंगची पदवी तर दिली पण पुढे काय? याचेही नियोजन तंत्र शिक्षण विभागाने केले पाहिजे," अशीही मागणी त्यांनी केली.
 
हा निर्णय व्यवहार्य आहे का?
आयआयटी मुंबईत मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक मिलिंद अत्रे सांगतात, "प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना इंग्रजीतून शिकणं कठीण जातं. कारण विद्यार्थी वेगवेगळ्या भागातून आलेले असतात. त्यामुऴे किमान पहिल्या वर्षी मराठीतून शिकवायला हरकत नाही. पण दुसऱ्या वर्षापर्यंत विद्यार्थ्यांमध्ये बरीच सुधारणा झालेली असते. त्यामुळे इंग्रजी आणि मराठीचा समतोल राखायला हवा. विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात, एकमेकांमध्ये मिसळतात त्यामुळे इंग्रजी भाषेचा सराव होतो. फारशी अडचण नंतर येत नाही असे दिसून येते."
 
इंग्रजी भाषा आणि शिक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इंग्रजी भाषा शिकता येते त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही असंही ते सांगतात.
 
"प्लेसमेंटमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांच्या संकल्पना किती स्पष्ट आहेत, आकडेवारीतून कसं सादरीकरण करू शकतात, अशा अनेक तांत्रिक बाबींना भाषेपेक्षा अधिक प्राधान्य दिलं जातं. परदेशी कंपनीसाठी निवड होत असतना इंग्रजी संवाद महत्त्वाचा ठरतो आणि विद्यार्थ्यांना विषयाचे सखोल ज्ञान असेल तर इंग्रजी भाषा नंतर शिकता येते."
 
अभय सांगतो, मराठीतून इंजिनीअरिंगची पदवी घेण्यास हरकत नाही पण प्रत्यक्षात जेव्हा काम सुरू होईल तेव्हा काही गोष्टींची तयारी करावी लागेल.
 
"माझा अनुभव असा आहे की आयटी, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल अशा सर्व शाखांच्या कंपन्यांमध्ये देश-विदेशातून उमेदवारांची निवड झालेली असते. त्यामुळे संवादासाठी इंग्रजी भाषेचाच वापर अधिक आहे. हे वास्तव नाकारता येणार नाही. तुम्ही क्लायंट सांभाळत असाल तर संवाद आणि समन्वय महत्त्वाचा असतो. तेव्हा इथेही जी भाषा सर्वांमध्ये समान्य आहे त्या भाषेला प्राधान्य द्यावं लागतं. क्लायंट परदेशातील अधिक असल्यास भाषेचा अडथळा उद्भवू शकतो. इंग्रजीचा व्यवहारात अधिक वापर केला जातो. त्यामुळे दोन्ही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल,"
 
केंद्र सरकारने नुकताच हा निर्णय जाहीर केला आहे. प्रत्यक्षात महाविद्यालयात या शैक्षणिक वर्षापासून मराठी इंजिनिअरिंग अभ्यासक्रम सुरू होणार का? हे अद्याप अस्पष्ट आहे. पण विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये यासाठी वरील सर्व बाबींची अभ्यासपूर्ण तयारी असणं अपेक्षित आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती