नवाब मलिक वारंवार समीर वानखेडे 'मुस्लीम' असल्याचं सांगण्याचा प्रयत्न का करतायेत?
सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (19:50 IST)
दीपाली जगताप
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हिंदू नसून मुस्लीम आहेत, हे सातत्याने सिद्ध करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक करताना दिसतात, तर समीर वानखेडे हिंदूच आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्याकडून वारंवार केला जातो आहे.
नवाब मलिक यांनी आता समीर वानखेडे यांच्या निकाहनामाचा एक फोटो ट्वीटरवर पोस्ट केला आहे. या फोटोत समीर वानखेडे निकाहनामावरती स्वाक्षरी करताना दिसतात. तसंच त्यांची मुलगी सना मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नांची निमंत्रण पत्रिकाही सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यात समीर यांच्या वडिलांचा दाऊद वानखेडे असाच उल्लेख दिसून येतो.
तर दुसरीकडे क्रांती रेडकर यांनी समीर वानखेडे यांच्यासोबत आपल्या लग्नाचे फोटो, पूजेचे आणि इतर कार्यक्रमांचे पोस्ट करत समीर वानखेडे हिंदू परंपरांचं पालन करतात हे सांगत आहेत.
या सर्व प्रकरणावर मुंबई हायकोर्टातही सुनावणी सुरू आहे. मग प्रकरण कोर्टात असलं तरी नवाब मलिक आणि क्रांती रेडकर ट्विटरवर पुरावे का सादर करतात? समीर वानखेडे मुस्लीम आहेत, असा दावा वारंवार नवाब मलिक का करत आहेत? यातून मलिकांना नेमकं काय साध्य करायचं आहे? समीर वानखेडे मुस्लीम आहेत, असं सिद्ध झाल्यास काय परिणाम होतील? या प्रश्नांचा आढावा आपण घेणार आहोत.
राजकीय रणनीती?
25 ऑक्टोबर 2021 रोजी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्मदाखला पोस्ट करत 'इथूनच घोटाळा सुरू झाला' असा आरोप केला. यानंतर जवळपास दररोज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदा घेत समीर वानखेडे यांच्याविरोधात आरोप केले.
धर्मांतर करून समीर वानखेडे यांनी शिक्षण आणि सरकारी नोकरीत दुहेरी लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. याला आधार म्हणून नवाब मलिक यांनी आतापर्यंत अनेक कागदपत्र सोशल मीडियावर पोस्ट केली आहेत. नवाब मलिक यांना यातून नेमकं काय साध्य करायचं आहे? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे असं सांगतात, "नवाब मलिक विरुद्ध समीर वानखेडे ही लढाई दोन पातळ्यांवर सुरू आहे. एक म्हणजे मलिकांसाठी हे वैयक्तिक प्रकरण सुद्धा आहे आणि दुसरं म्हणजे केंद्र सरकार तपास यंत्रणाचा वापर महाराष्ट्रात कशा पद्धतीने करतं हे दाखवून देण्याचा हा प्रयत्न आहे."
राजकारणात किंवा सार्वजनिक आयुष्यात लोकांच्या मनात तुमची प्रतिमा कशी आहे, तुमच्या विषयीचा दृष्टीकोन काय आहे या बाबी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. अनेक बड्या नेत्यांवर, अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले जातात. मात्र त्याचं पुढे काय होतं? हा प्रश्न बहुतांश वेळेला अनुत्तरीत राहतो.
अभय देशपांडे सांगतात, "भाजपची जी रणनीती असते तीच आता राष्ट्रवादी काँग्रेसची आहे असं दिसतं. किरीट सोमय्या जे करतात तेच नवाब मलिक करत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी खंडणी घेतात, महाराष्ट्रातील कलाकारांवर आरोप करतात, कट रचले जातात हा संदेश जनतेपर्यंत पोहचला पाहिजे यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या जातात आणि सोशल मीडियाचा वापर केला जातो."
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एनसीबीनेही तेच केलं अशीही आठवण ते करून देतात. ते म्हणाले, "सुशांतसिंह प्रकरणात एनसीबीने अनेक अभिनेत्रींना चौकशीसाठी बोलवलं. पण एकीवरही गुन्हा दाखल केला नाही. हा सुद्धा मीडिया ट्रायलचाच एक भाग होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. हे का केलं जात होतं? हे ही सांगण्याचा प्रयत्न नवाब मलिक करत आहेत."
यापूर्वीची काही उदाहरणं आपण पाहिली तर लक्षात येतं, भाजपने अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले. हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आहे, असाही गंभीर आरोप करण्यात आला. मग सत्तेत असताना भाजपने किती चौकशी केली? किती पुरावे समोर आणले? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडी सरकार सुद्धा जलयुक्त शिवारप्रकरणी आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहे. मग चौकशी का करत नाही? त्यामुळे ही प्रकरणं अनेकदा तर्कशुद्ध समाप्तीपर्यंत पोहोचत नाही असंच दिसून येतं. परंतु तोपर्यंत मीडिया ट्रायल झालेली असते, प्रतिमेला धक्का पोहचलेला असतो, लोकांपर्यंत एक नकारात्मक संदेश जातो आणि याचा संबंधितांना राजकीय फटका बसू शकतो आणि काहींना राजकीय फायदा मिळतो. समीर वानखेडे आणि मलिक यांचं प्रकरणही याला अपवाद नाही," असंही अभय देशपांडे सांगतात.
या वादात सुरुवातीला भाजपनेही उडी घेतली. भाजप नेत्यांनी समीर वानखेडे यांचं समर्थन केलं. शेवटी नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांनी असं म्हटलं की, एकमेकांच्या पक्षांविरुद्धची लढाई नाही.
संजय राऊत यांनीही, ही चिखलफेक थांबली पाहिजे, असं म्हणत उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी यात हस्तक्षेप करावा असं म्हटलं.
सूडबुद्धीने आरोप केले जात आहेत का?
नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी अटक केली होती. सेशन्स कोर्टाने आता त्यांना जामीन मंजूर केला आहे. परंतु जवळपास आठ महिने समीर खान यांना तुरुंगात घालवावे लागले. त्यामुळे हे प्रकरण नवाब मलिक यांच्यासाठी वैयक्तिक आहे असंही मत अनेकजण व्यक्त करतात. पण खरंच तसं आहे का?
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 9 जानेवारी 2021 रोजी मुंबईतील वांद्रे भागातून गांजा जप्त केल्याचं सांगितलं होतं. समीर वानखेडेंच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकामध्ये "मुंबईतील वांद्रे भागातून गांजा जप्त केल्याचा दावा करण्यात आला होता." या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली होती. यात नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचंही नाव समोर आलं. एनसीबीने कोर्टात दावा केला होता की, "समीर खान आणि सजलानी हर्बल प्रॉडक्टच्या नावाखाली गांजा विकण्याचा विचार करत होते."
एनसीबीचे हे दावे कोर्टात सिद्ध झाले नाहीत आणि समीर खान यांना 14 ऑक्टोबर रोजी सेशन्स कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. यावेळीही नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईवर शंका उपस्थित केली. ते म्हणाले, "एनसीबीने 200 किलो गांजा जप्त केल्याचा दावा केला. केमिकल अॅनालिसिस रिपोर्टमध्ये मात्र हा गांजा नसल्याचं स्पष्ट झालं. जप्त करण्यात आलेला हर्बल टोबॅको होता. एनसीबीला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळू नये?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ही पार्श्वभूमी पाहता नवाब मलिक समीर वानखेडे यांच्यावर सूडबुद्धीने आरोप करत आहेत? की समीर वानखेडे यांची कारवाई संशयास्पद आहे? असे प्रश्न विचारले जात आहेत.
पत्रकार श्रुती गणपत्ये सांगतात, "नवाब मलिक यांच्या जावयाला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. चौकशीत त्यांच्याजवळ काहीच आक्षेपार्ह नाही असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे मला वाटत नाही नवाब मलिक सूडबुद्धीने समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. याउलट अनेक प्रकरणं पाहता समीर वानखेडे यांच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतो."
ज्येष्ठ पत्रकार संजीव शिवडेकर हे सुद्धा या मताशी सहमत आहेत. ते म्हणाले, "सूडबुद्धीने आरोप केले जातात असं आपण म्हणू शकतो का? सूडबुद्धीने काही केलं त्याला पुरावा नसतो. त्यांच्या जावयाला अटक केल्यानंतर अनेक महिने उलटले. मग त्यांनी आरोप करायला सुरुवात केली. त्यामुळे मला वाटतं इथे 'बेनिफिट ऑफ डाऊट'साठी जागा आहे. शिवाय, हे आरोप हवेत केले जात नाहीत. तर पुरावे सुद्धा सादर केले जात आहेत. त्यांनी संयम राखला आणि पुरावे गोळा केले मग त्यांनी पत्रकर परिषदा घेतल्या."
ते पुढे म्हणाले, " आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की मलिक एक लोकप्रतिनिधी आहेत. सरकारचे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे जर एका अधिकाऱ्याविषयी अशी संशयास्पद माहिती असेल तर त्यांनी ती जनतेसमोर आणणं अपेक्षितच आहे. कोर्टात केस सुरू असली तरी ती त्यांनी दाखल केलेली नाही. ते एक राजकीय नेते आहेत. कोर्टाला पुरावे देऊन मी मदतच करत आहे असंच ते म्हणणार. समीर वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबाला याबाबत आक्षेप असेल तर ते न्यायालयात दाद मागू शकतात. यापूर्वी अनेक प्रकरणात न्यायालयाने 'इन कॅमेरा' सुनावणी केली आहे किंवा निर्बंध लागू केले आहेत. न्यायालयाला या प्रकरणात आक्षेपार्ह काही वाटत असेल तर ते तशा सूचना देतील."
समीर वानखेडे यांच्यावर आतापर्यंत करण्यात आलेले आरोप -
1. समीर वानखेडे जन्माने मुस्लीम आहेत. त्यांच्या वडिलांनी मुस्लीम महिलेसोबत लग्न करण्यासाठी धर्मांतर केलं आणि पुन्हा हिंदू धर्मात परतले.
2. समीर वानखेडे यांच्या जन्मदाखल्यावर समीर दाऊद वानखेडे असं नाव असल्याचा दावा
3. समीर वानखेडे जन्माने मुस्लीम असूनही त्यांनी आपण एससी असल्याचे दाखवले आणि कागदपत्रांत फेरफार करून नोकरी मिळवली.
4. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा निकाहनामा जाहीर करत यातही त्यांच्या नावाचा उल्लेख समीर दाऊद वानखेडे असल्याचं म्हटलं आहे.
5. तर त्यांची मुलगी सना मलिक यांनीही समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाची निमंत्रण पत्रिका पोस्ट केली असून त्यातही समीर यांच्या वडिलांचं नाव दाऊद वानेखेडे असं लिहिण्यात आलं आहे.
6. आर्यन खानला अटक करून अभिनेते शाहरूख खान यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्याचा वानखेडे यांचा डाव होता असाही आरोप मलिक यांनी केला आहे.
7. समीर वानखेडे यांचा सद्गुरु नावाचा एक बार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
8. खंडणीसाठीच समीर वानखेडे बॉलीवूड स्टार्स आणि कलाकारांवर असे आळ घेतले जातात असाही नवाब मलिक यांचा आरोप आहे.
समीर वानखेडे यांचं स्पष्टीकरण
नवाब मलिक यांच्या आरोपांच्या नंतर समीर वानखेडे यांनी देखील प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलं. तसंच अशा आरोपांच्या माध्यमातून मानसिक दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
"माझे वडील ज्ञानदेव कचरूजी वानखेडे 30 जून 2007 रोजी अबकारी विभागातून निवृत्त झाले. माझे वडील हिंदू असून माझी आई मुस्लीम होती," असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.
खऱ्या भारतीय परंपरेचं पालन करणाऱ्या एका बहुधार्मिक आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील मी सदस्य असून, मला त्याचा अभिमान आहे, असंही वानखेडे यांनी सांगितलं.
वानखेडे यांनी या पत्रातून त्यांच्या पहिल्या विवाह आणि घटस्फोटाबाबतही माहिती दिली. तसंच घटस्फोटानंतर अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्याशी दुसरा विवाह केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मात्र, अशा प्रकारे खासगी दस्तऐवज पोस्ट करणं अपमानजनक आहे. माझ्या कुटुंबाच्या खासगी जीवनावर विनाकारण हल्ला करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप वानखेडे यांनी मलिकांवर केला.
या संपूर्ण प्रकरणामुळं मी आणि माझ्या कुटुंबाला प्रचंड मानसिक दबावात ढकललं आहे. अशा प्रकारे होणाऱ्या वैयक्तिक आणि अपमानास्पद आरोप आणि हल्ल्यामुळं दुःखी असल्याचंही वानखेडे यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय.