डास काही व्यक्तींनाच जास्त का चावतात?

गुरूवार, 21 जुलै 2022 (12:11 IST)
- राउल रिवास गोन्झालेझ
इतिहासात घडलेल्या सर्व युद्धांपेक्षा जास्त मृत्यू हे डास आणि त्यामुळे पसरणाऱ्या रोगांमुळे झाले आहेत.
 
इतकंच नाही तर कुठल्याही हिंस्त्र प्राण्यापेक्षा डास मानवासाठी सर्वांत धोकादायक प्राणी असल्याचं आजवरच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं.
 
2018 साली डासांमुळे जगभरात तब्बल 7 लाख 25 हजार जणांचा मृत्यू झाला. तर मानवी मृत्यूसाठी जबाबदार घटकांमध्ये दुसऱ्या क्रमांक माणसाचाच होता. त्यावर्षी माणसांमुळे जवळपास 4 लाख 37 हजार जणांचा मृत्यू झाला होता.
 
त्यानंतर नंबर लागतो साप, कुत्रे, विषारी गोगलगाय, मगर, पाणघोडे, हत्ती, सिंह, लांडगे आणि शार्कच्या हल्ल्यांचा.
 
डासांमुळे होणाऱ्या मृत्यूची ही गंभीर आकडेवारी बघता जागतिक आरोग्य संघटनेने 2017 साली 'ग्लोबल व्हेक्टर कंट्रोल रिस्पॉन्स 2017-2030' (GVCR) मंजूर केला.
 
GVCR हा आजार पसरवणाऱ्या कीटकांच्या नियंत्रणासाठी धोरणात्मक मार्गदर्शन करण्यासाठीचा कृती कार्यक्रम आहे. आजाराचा प्रादुर्भाव रोखणे आणि संसर्गजन्य आजारांच्या उद्रेकाला वेळीच तोंड देण्यासाठी या कार्यक्रमाची मदत होते.
 
डासांपासून पसरणाऱ्या आजारांची यादी बरीच मोठी आहे. वेस्ट नाईल ताप, झिका, डेंग्यू, पिवळा ताप, चिकुनगुनिया, मलेरिया, सेंट लुईस अॅन्सेफलायटीस, लिम्फॅटिक फिलेरियासिस, ला क्रॉस इन्सेफलायटीस, पोगोस्टा आजार, ओरोपाउचे ताप, तायना विषाणू आजार, रिफ्ट व्हॅली, सेमलिकी फॉरेस्ट विषाणू संसर्ग, संदबीस ताप, जापानी अॅन्सेफलायटीस, रॉस रिव्हर ताप असे अनेक आजार डासांपासून पसरतात.
 
डासांमुळे होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांमुळे 2020 साली तब्बल 6 लाख 27 हजार मृत्यू झाले होते.
 
काही जणांना इतरांच्या तुलनेत डास अधिक चावतात. डासांनी होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी बघता काहींना डास जास्त का चावतात, हे जाणून घेणं रंजक आहे.
 
कार्बन डायऑक्साईड आणि शरीराचा गंध
नर आणि मादी असे दोन्ही डास इतर प्राण्यांना (माणसासह) न चावताही जगू शकतात. मात्र, मादी डासांना प्रजनन चक्र पूर्ण करण्यासाठी रक्ताची गरज असते.
 
जवळपास शतकभरापूर्वी असं मानलं गेलं की कार्बन डायऑक्साईड (CO2) डासांना आकर्षित करतो.
 
डासांच्या अंड्यांना पोषक तत्त्व मिळतात रक्तातून. त्यामुळे अंड्यांना आवश्यक पोषक तत्त्व मिळवण्यासाठी रक्ताच्या शोधात असणाऱ्या मादी डासांना पकडण्यासाठी या वायूचा वापर केला जातो.
 
मात्र, एखाद्या व्यक्तीकडे डास अधिक आकर्षित होण्यामागे कार्बन डायऑक्साईडच कारणीभूत आहे, याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाही.
 
डास एका व्यक्तीपेक्षा दुसऱ्याला प्राधान्य का देतात हे कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनाच्या पातळीवरून स्पष्ट होत नाही.
 
मग डास कशाने आकर्षित होतात?
काही लोकांना डास जास्त चावतात यामागे इतरही काही भौतिक आणि रासायनिक कारणं आहेत.
 
विशेषतः उष्णता, पाण्याची वाफ, आर्द्रता, दृश्य संकेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्वचेतून येणारा वास.
 
कोणते वास डासांना सर्वाधिक आकर्षित करतात, हे अद्याप नीट समजलेलं नसलं तरी इंडोल, नॉनॅनॉल, ऑक्टेनॉल आणि लॅक्टिक अॅसिड यासारखे रेणू (मॉलिक्युल) डासांना अधिक आकर्षित करतात, असा अंदाज अनेक अभ्यासातून बांधला गेला आहे.
 
अमेरिकेतील फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीतील मॅथ्यू डिगेनारो यांच्या नेतृत्त्वाखालील संशोधकांच्या पथकाने आयनोट्रॉपिक रिसेप्टर 8a (IR8a) या नावाने ओळखलं जाणारं एक गंध असणारं रिसेप्टर शोधलं आहे.
 
हे रिसेप्टर एडिस इजिप्ती डासांना लॅक्टिक अॅसिड शोधण्यात मदत करतं.
 
एडिस इजिप्ती डासामुळे डेंग्यू, चिकुनगुनिया आणि झिका सारखे आजार पसरतात.
 
जेव्हा शास्त्रज्ञांनी डासांच्या अॅन्टिनावर आढळणाऱ्या IR8a या रिसेप्टरमध्ये बदल केले तेव्हा त्या डासांना लॅक्टिक अॅसिड आणि मानवाद्वारे उत्सर्जित होणारे इतर आम्लीय गंध (अॅसिडिक ओडर) ओळखता येत नसल्याचं लक्षात आलं.
 
डासांना आकर्षित करणारं 'परफ्युम'
तर अलिकडेच करण्यात आलेल्या एका संशोधनावरून असं लक्षात आलं आहे की डेंग्यू आणि झिका विषाणू उंदीर आणि मानवी वासाला बदलतात आणि त्यामुळे ते डासांना अधिक आकर्षित करतात.
 
ही एक रंजक स्ट्रॅटेजी म्हणावी लागेल. कारण यात डास विषाणूचे वाहक असणाऱ्या प्राण्याला चावून त्याचं संक्रमित रक्त घेऊन नंतर माणसाला चावतात.
 
ते डासांना आकर्षित करणाऱ्या सुगंधी किटोन आणि अॅसिटोफेनच्या उत्सर्जनात बदल करून हे साध्य करतात.
 
मानव आणि उंदीर प्रजातीच्या प्राण्यांची त्वचा अॅन्टिमायक्रोबियल पेप्टाईड तयार करते जे जीवाणूंची संख्या मर्यादित ठेवण्यास मदत करते.
 
मात्र, डेंग्यू किंवा झिका विषाणूची बाधा झालेल्या उंदरांमध्ये या पेप्टाईडचं प्रमाण कमी होतं. परिणामी बॅसिलस जीवाणू वाढतात आणि या वाढीमुळे अॅसिटोफेनोन तयार होतं.
 
माणसामध्येही असंच काहीसं घडतं. डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांच्या काखेतून गोळा केलेल्या वासाच्या नमुन्यांमध्ये निरोगी व्यक्तींपेक्षा अॅसिटोफेनोनच प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं आहे.
 
सकारात्मक बाब म्हणजे हे दुरुस्त करता येतं. त्यासाठी एक संशोधन करण्यात आलं. ज्यात डेंग्यूची लागण झालेल्या उंदरांवर आयसोट्रेटिनॉइनने उपचार करण्यात आले. या उंदरांमध्ये अॅसिटोफेनॉनचं उत्सर्जन कमी झालं आणि त्यामुळे डासांचं आकर्षणही कमी झालं.
 
वास बदलणारे सूक्ष्मजीव
ही एकमेव केस नाही जिथे सूक्ष्मजीव प्रसारासाठी डास आणि मानवी शरीराचा वापर करतात. उदाहरणार्थ मलेरियासाठी कारणीभूत असणाऱ्या प्लाझमोडियम फॅल्सीपेरम या परजीवीची लागण झालेली व्यक्ती या रोगाचा वाहक असणाऱ्या अॅनोफिलीस गॅम्बिया डासांना निरोगी व्यक्तींपेक्षा जास्त आकर्षित करते.
 
यामागचं कारण अजूनही अज्ञात असलं तरी ते प्लाझमोडियम फॅल्सीपेरमशी संबंधित असू शकेल.
 
प्लाझमोडियम फॅल्सीपेरम आयसोप्रिनॉइड प्रिकर्सर तयार करतात, ज्याला HMBPP म्हणतात. हे डासांच्या रक्ताच्या आहाराच्या वर्तनावर तसेच संसर्गाच्या संवेदनक्षमतेवर परिणाम करतात.
 
HMBPP विशेषतः माणसाच्या शरीरातील लाल रक्तपेशी सक्रीय करतात ज्यामुळे कार्बन डायऑक्साईड, अल्डिहाइड्स आणि मोनोटेरपिन्सच्या उत्सर्जनाचं प्रमाण वाढतं आणि यामुळे डास अशा व्यक्तींकडे अधिक आकर्षित होतात.
 
रक्ताच्या नमुन्यांमध्ये HMBPP टाकल्यामुळे अॅनोफिलीस कोलुझी, इडिस इजिप्ती यासारख्या डासांच्या इतर अनेक प्रजातीही मोठ्या प्रमाणावर अशा रक्ताकडे आकर्षित झाल्याचं आढळून आलं आहे.
 
एखाद्या व्यक्तीला इतरांच्या तुलनेत डास जास्त का चावतात, त्यासाठी कुठले घटक कारणीभूत असतात, हे समजून घेतल्यास संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यात निश्चितच मदत होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती