अजित पवार बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी का आले नाहीत?

शनिवार, 23 जानेवारी 2021 (19:51 IST)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं मुंबईतील फोर्ट येथे अनावरण झालं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.
 
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील, उदय सामंत, सुभाष देसाई असे मंत्री हजर होते.
 
इतकंच नव्हे, तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे मुंबईतील नेतेही उपस्थित होते.

मात्र, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार हे हजर राहिले नाहीत.
 
अजित पवार यांचे पुण्यात नियोजित कार्यक्रम होते, त्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नसल्याची माहिती अजित पवार यांच्या कार्यालयातून देण्यात आलीय.
 
मात्र, महाविकास आघाडीतील बहुतांश महत्त्वाचे नेते आणि मंत्री उपस्थित असताना, अजित पवार हे का उपस्थित राहू शकले नाहीत? त्यांना आपल्या नियोजित कार्यक्रमांमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या आधीच निमंत्रण देण्यात आलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नसते का, असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय.
 
अजित पवारांना निमंत्रण, पण न येण्याचं कारण माहित नाही - महापौर
अजित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना विचारले असता, ते म्हणाले, "अजित पवार पुण्यात असल्यामुळे येऊ शकले नाहीत."
 
तर शिवसेनेच्या मुंबईतील नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना याबाबत विचारले असता, त्यांनी सांगितलं की, अजित पवार यांना पुतळा अनावरण कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं.
 
महापौर किशोरी पेडणेकर या कार्यक्रमाच्या यजमान होत्या. कारण हा कार्यक्रम मुंबई महापालिकेकडून आयोजित करण्यात आला होता. निमंत्रण देण्यापासून उपस्थितांच्या स्वागतापर्यंतचं काम स्वत: महापौर किशोरी पेडणेकर या करत होत्या.
 
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "अजित पवार यांना आमंत्रण दिलं होतं, पण ते का आले नाहीत, याचं कारण कळू शकलेलं नाही. पण पवार कुटुंबप्रमुख म्हणून शरद पवार स्वत: उपस्थित होते, तो सर्वासाठी आनंदाचा क्षण होता."
 
पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे अजितदादा अनुपस्थित - राष्ट्रवादी
राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत म्हटलं, "बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तिमत्त्व राजकारणाच्या पलिकडचं होतं. त्यामुळे तिथे सर्वपक्षीय नेते उपस्थित राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हजर होते."
 
"अजित पवार हे पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे हजर राहू शकले नाहीत. मात्र, त्यावरून काही इतर काही अर्थ लावणे योग्य नाही," असंही अंकुश काकडे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
 
'अजित पवार मुद्दामहून अनुपस्थित राहिले असं म्हणता येणार नाही'
"अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे ते उपस्थित राहिले असते, तर चांगला संदेश गेला असता," असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात.
 
मात्र, "अजित पवार हे मु्द्दामहून अनुपस्थित राहिले, असं म्हणता येणार नाही. कारण हा कार्यक्रम काही राजकीय स्वरुपाचा नव्हता. शिवाय, शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, भुजबळ हे राष्ट्रवादीकडून हजर होते. किंबहुना, देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर असे दोन्ही विरोधी पक्षनेतेही उपस्थित होते," असंही अभय देशपांडे म्हणतात.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती