कोण आहे गॅंगस्टर रवी पुजारी, तो अफ्रिकेत कोठे लपला होता?
शुक्रवार, 5 मार्च 2021 (17:30 IST)
मयांक भागवत
गेली 25 वर्षं तो मुंबई पोलिसांच्या 'मोस्ट वॉन्टेड' लिस्टमध्ये होता. त्याला पकडण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. पण, तो हाती लागत नव्हता.
ऑस्ट्रेलिया, मलेशिया, नेपाळ, सेनेगल यांसारख्या देशातून तो गॅंग चालवत होता. मुंबईतील बिल्डर्स, बॉलीवूड स्टार्स, दिग्दर्शक यांच्यावर त्याची दहशत होती. मुंबई पोलिसांसह देशभरातील तपास यंत्रणांना चकवण्यात तो यशस्वी ठरत होता.
भारताकडून देण्यात आलेल्या सबळ पुराव्यानंतर, पश्चिम अफ्रिकेतील सेनेगलमध्ये गॅंगस्टर रवी पुजारीला अटक करण्यात आली.
मुंबईचा हा 'मोस्ट वॉन्टेड' गॅंगस्टर आता मुंबई क्राइमब्रांचच्या कोठडीत आहे. रवी पुजारीवर 78 गुन्हे दाखल आहेत.
रवी पुजारीचं प्रत्यर्पण
कर्नाटक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सेनेगल सरकारने जानेवारी 2019 मध्ये रवी पुजारीला अटक केली होती.
"पोलीस सांगतायत, तो गॅंगस्टर मी नाही," असं रवी पुजारीने कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. पण, कोर्टाने रवी पुजारीला भारतात प्रत्यार्पित करण्याचा आदेश दिला.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात रवी पुजारीला सेनेगलमधून कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतलं.
रवी पुजारीच्या अटकेचा पहिला ब्रेक-थ्रू?
अंडरवर्ल्डचा 'मोस्ट वॉन्टेड' गॅंगस्टर रवी पुजारी पश्चिम अफ्रिकेतील सेनेगलमध्ये असल्याची माहिती पहिल्यांदा 2018 साली कर्नाटक पोलिसांना मिळाली.
रवी पुजारी ओळख बदलून 'अॅन्टोनी फर्नाडिस' नावाने सेनेगलची राजधानी 'डाकार' मध्ये लपला असल्याची माहिती होती. कर्नाटक पोलिसांच्या माहितीनुसार, पश्चिम अफ्रिकेच्या देशांमध्ये 'नमस्ते इंडिया' नावाने रेस्टॉरंटची चेन तो चालवत होता.
रवी पुजारीच्या हॉटेल चेनकडून दांडियाचा कार्यक्रम ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हा 'अॅन्टनी फर्नांडिस' ची गॅंगस्टर रवी पुजारी म्हणून खरी ओळख पटवण्यासाठी मिळालेला पहिला ब्रेक-थ्रू होता.
त्यानंतर पोलिसांना रवी पुजारी क्रिकेट मॅच पहात असतानाचा फोटो मिळाला. सेनेगलचा 'अॅन्टनी फर्नांडिस' हाच गॅंगस्टर रवी पुजारी असल्याची पोलिसांना खात्री पटली.
मार्च 2019 मध्ये भारताकडून सेनेगल सरकारला रवी पुजारीच्या प्रत्यर्पणाबद्दल विनंती करण्यात आली.
कोण आहे रवी पुजारी?
रवी पुजारीचा जन्म कर्नाटकातील उडपी जिल्ह्यातील मालपे गावात झाला. लहानपणीच तो कर्नाटकातून मुंबईला आला.
मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "मुंबईत रवी पुजारी अंधेरी पूर्वेच्या सहारगाव भागात रहात होता. एका कॉन्व्हेंट शाळेत त्याने शिक्षण घेतलं. पण, पुढे शिक्षण अर्धवट सोडलं."
सहारगावात 1990 मध्ये एअरपोर्टवर श्रीकांत देसाई यांची टोळी सक्रीय होती.
"रवी पुजारीने अंधेरीत श्रीकांत मामासोबत काम सुरू केलं. कार्गोत समान पकडलं असेल तर सोडवण्यासाठी रवी मध्यस्थी करायचा," असं पोलीस अधिकारी पुढे सांगतात.
श्रीकांत देसाई छोटा राजनच्या टोळीत होते. पोलीस अधिकारी सांगतात, कार्गोमध्ये सामान चोरी करणारी त्यांची गॅंग होती. रवी पुजारीला त्यांनीच गॅंगच्या कारवाईमध्ये सामील केलं होतं.
मुंबई पोलिसांचे दिवंगत अधिकारी विजय साळस्कर यांनी श्रीकांत मामाचा 1990 मध्ये एन्काउंटर केला. श्रीकांत मामाचा एन्काउंटर झाल्यानंतर रवी पुजारीने त्याची गॅंग सांभाळण्यास सुरूवात केली.
रवी पुजारीचा पहिला गुन्हा
मुंबईतून 1988 मध्ये दुबईला पळालेला दाऊद इब्राहिम, छोटा राजनसारखे अंडरवर्ल्ड डॉन 1990 च्या सुरूवातीला मुंबईवर पकड मिळवण्याच्या प्रयत्नात होते.
त्या काळात कार्गोमध्ये मध्यस्थीचं काम करणारा रवी पुजारी श्रीकांत देसाईंच्या मार्फत स्थानिक गुंडाच्या टोळ्यांमधून गुन्हेगारी जगताकडे वळला.
रवी पुजारी मुंबईत श्रीकांत मामाकडेच रहायचा आणि त्यांचा खास होता, असं पोलीस अधिकारी सांगतात.
रवी पुजारीला ट्रॅक करणारे क्राइम ब्रँचचे अधिकारी म्हणतात, "1994 मध्ये रवी पुजारीने अंधेरीमध्ये प्रदीप झालटेची हत्या केली. यात इतरही आरोपी होते. प्रदीप झालटेने श्रीकांत मामाची खबर पोलिसांना दिल्याचा त्यांना संशय होता. मुंबईत रवी पुजारीवर नोंदवण्यात आलेला खुनाचा हा पहिला गुन्हा होता. या प्रकरणी दोन-तीन महिन्यांनी त्याला जामीन मिळाला."
जामीनावर बाहेर आल्यानंतर रवी पुजारीला अंधेरी पोलिसांनी आणि खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती.
प्रदीप झालटेच्या हत्येनंतर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनने रवी पुजारीला आपल्या गॅंगमध्ये घेतलं. तेव्हापासून रवी पुजारीचा मुंबई अंडरवर्ल्डचा प्रवास सुरू झाला.
मुंबईतून फरार झाला रवी पुजारी
अंडरवर्ल्ड कारवायांमध्ये डोकं वर काढत असलेला रवी पुजारी, कारवाईच्या भीतीने 1997-98 साली भारतातून पळून गेला.
रवी पुजारीच्या मार्गावर असलेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी माहिती देतात, "भारतातून पळून रवी पुजारी नेपाळला गेला. त्यानंतर बनावट पासपोर्टच्या मदतीने बॅंकॉकमार्गे युगांडात पोहोचला."
ऑस्ट्रेलिया, मलेशिया, युगांडामधून मुंबईत अंडरवर्ल्डची सूत्र चालवणारा रवी पुजारी "सेनेगलला येण्यापूर्वी पश्चिम अफ्रिकेतील 'बुर्कीना फासो' या देशात रहात होता," असं निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक कामत बीबीसीशी बोलताना सांगतात.
पोलिसांच्या माहितीनुसार रवी पुजारी 'बुर्कीना फासो' मध्ये तब्बल 12 वर्षं राहिला. रवी पुजारी 'बुर्कीना फासो' आणि सेनेगलमधूनही शार्प शूटर्सना फायरिंगचे आदेश देत होता.
खंडणीखोर रवी पुजारी
मुंबई पोलिसांचे वरिष्ठ IPS अधिकारी सांगतात, "रवी पुजारी इतर अंडरवर्ल्ड डॉनसारखा नाही. तो मोठा स्मार्ट आणि चॅप्टर होता."
दाऊद आणि राजनसारखे डॉन खंडणी वसूलीसाठी आणि धमकी देण्यासाठी मोबाईल फोनचा वापर करत. फोनकॉल ट्रेस करणं शक्य आहे. पण, रवी पुजारीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर खंडणी मागण्यासाठी सुरू केला.
निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक कामत म्हणतात "लोकांना धमकावण्यासाठी रवी पुजारी व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलचा (VOIP) वापर करायचा."
तपास यंत्रणांना VOIP ट्रेस करणं कठीण जातं. त्यामुळे रवी पुजारी कुठून कॉल करतो? तो सद्य स्थितीत कुठे आहे. याची माहिती तपास यंत्रणांना मिळत नसे.
मुंबई पोलीस दलातील अधिकारी सांगतात, "रवी पुजारीला खंडणीची कोणतीही रक्कम छोटी नसायची. पैसे मागण्यासाठी 10 कोटींपासून सुरूवात करून शेवटी 4-5 लाख रूपयांना तो मान्य करायचा."
शूटर्सना फक्त 2-4 हजार रूपयेच द्यायचा, असं पोलीस अधिकारी सांगतात.
छोटा राजनसोबत वाद?
रवी पुजारीच्या अंडरवर्ल्ड कारवाया ट्रॅक करणारे IPS अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "रवी पुजारी छोटा राजनपासून वेगळं होण्याचं कारण त्यांच्यातील वाद होते. ड्रग्जच्या व्यवसायामध्ये झालेलं नुसकान आणि इतर कारणांमुळे रवी पुजारी राजनपासून वेगळा झाला.
"त्याने स्वत:ची गॅंग तयार केली. पैसे कमावण्यासाठी खंडणी आणि वसूली सुरू केली. बिल्डर आणि बॉलीवूडचे कलाकार, निर्माते रवीच्या टार्गेटवर होते.
पुजारीची बॉलीवूडवर दहशत?
बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या खूनाचा कट रचल्याचा आरोप रवी पुजारीवर आहे.
फिल्म फायनान्सर अली मोरानी यांच्या बंगल्याबाहेर करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये रवी पुजारीचं नाव आहे.
'माझ्या कार्यक्रमात गाणं गाशील का?' असा कथित कॉल रवी पुजारीने गायक अरिजित सिंहला केला होता.
2014 मध्ये नस्ली वाडिया यांना रवी पुजारीने धमकावल्याचा आरोप आहे.
रवी पुजारीवर कोणते गुन्हे दाखल आहेत?
रवी पुजारीने काही वर्षांपूर्वी अचानक मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिसांनी त्याच्या शूटर्सना मोक्काअंतर्गत अटक करण्यास सुरूवात केली.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, रवी पुजारीवर खंडणी, खूनाचा प्रयत्न आणि धमकीचे 78 गुन्हे दाखल आहेत. 10 प्रकरणांमध्ये रवी पुजारीवर खटला चालवण्याची परवानगी मिळाली आहे.
क्राइम ब्रांच अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, कोर्टाने रवी पुजारीला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. मुंबईतील आणखी 15 प्रकरणांमध्ये खटला चालवण्याची परवानगी मुंबई पोलीस मागणार आहेत.
वरिष्ठ क्राइम रिपोर्टर सुनील मेहरोत्रा सांगतात, "दिवंगत सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय मुंबई क्राइमब्रांचचे प्रमुख असताना पहिल्यांदा रवी पुजारीला परदेशात ट्रेस करण्यात आलं होतं. मुंबई पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला ही माहिती दिली. पण, कारवाई होण्याआधीच रवी पुजारीने डर्बनमधील राहतं हॉटेल सोडलं."
त्यानंतर आणखी एका वेळेस मुंबई पोलिसांना रवी पुजारीचं लोकेशन मिळालं होतं. एवढंच नाही, महाराष्ट्र पोलिसांच्या एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याने एफबीआयकडे रवी पुजारीला ट्रॅप करण्यासाठी मदत मागितली होती.