नरेंद्र मोदी लहान मुलांसोबतचे फोटो शेअर करून काय सांगू पाहताहेत?
शनिवार, 27 जुलै 2019 (09:28 IST)
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका लहान गोंडस बाळासोबतचे दोन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. "माझा एक अत्यंत खास मित्र आज मला भेटायला संसदेत आला होता," असं कॅप्शन मोदींनी फोटोखाली लिहिलं.
मोदींनी हा फोटो शेअर करताक्षणीच त्याच्यावर नेटकऱ्यांच्या उड्या पडल्या. अनेकांनी ते फोटो लाईक आणि शेअर केले. काहींनी ते फोटो डाऊनलोड करून थेट आपल्या स्टेटसवर आणि प्रोफाईल फोटोच्या स्वरूपात ठेवले.
पण सर्वांनाच ते बाळ कुणाचं आणि ते मोदींसोबत कसं, हा प्रश्न पडला होता. नंतर ते बाळ भाजपचे राज्यसभा खासदार सत्यनारायण जतिया यांची नात रुद्राक्षी असल्याचं स्पष्ट झालं.
एखाद्या लहान मुलासोबत फोटो शेअर करण्याची मोदींची ही पहिलीच वेळ नव्हती. त्यांनी यापूर्वीही लहान मुलांसोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये लहान मुलांच्या जवळ जाण्याचा प्रसंग आल्यास मोदी आवर्जून त्यांच्यामध्ये जातात. गप्पा मारतात. संवादाचे हे फोटो हमखास मोदींच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले जातात.
नरेंद्र मोदी अशा प्रकारचे लहान मुलांसोबतचे हे फोटो शेअर करून नेमका कोणता संदेश देऊ पाहताहेत याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न बीबीसीने
तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
इंस्टाग्रामवर मोदींचे अडीच कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. साधारणपणे त्यांच्या प्रत्येक फोटोला पंधरा ते वीस लाखांच्या जवळपास लाईक्स असतात. तर कमेंट्सची संख्या 10 ते 20 हजारांच्या घरात आहे.
मोदी यांच्या मागच्या दहा इंस्टाग्राम पोस्टचा विचार केल्यास त्यांनी मंगळवारी पोस्ट केलेल्या लहान बाळासोबतच्या फोटोला सर्वात जास्त म्हणजेच 31 लाखांहून अधिक लाईक्स आहेत. तसंच तब्बल 32 हजार जणांनी या पोस्टवर कमेंट केली आहे. तसंच व्हॉट्सअप आणि इतर समाजमाध्यमांवर व्हायरल होऊन इतरांच्याही मोबाईलमध्ये हा फोटो जाऊन पोहोचला.
राजकीय अभ्यासक मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "भारतात पस्तिशीच्या आतल्या लोकांची संख्या मोठी आहे. युवावर्ग इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांनी हे माध्यम निवडलं असण्याची शक्यता आहे. त्यातून युथ एंगेजमेंट करण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचं दिसतं."
आपुलकीची भावना
"कोणत्याही लहान बाळाला पाहिल्यानंतर मनात एक आपुलकीची भावना तयार होते, असं डॉ. नितीन अभिवंत यांनी सांगितलं. ते पुण्याच्या ससून रूग्णालयातील मानसिक आरोग्य विभागाचे प्रमुख आहेत.
डॉ. अभिवंत सांगतात, "मानवी मेंदूमध्ये राग, लोभ, मत्सर, प्रेम यांसारख्या भावना व्यक्त करणारी डोपामीन, न्यूरोटोरिन, नॉरइथिनेफ्रिन अशी वेगवेगळी न्युरोट्रांसमीटर प्रकारची रसायनं स्त्रवतात. यांचं प्रमाण मेंदूत किती असतं, त्या प्रमाणात आपल्यात राग किंवा प्रेमाची भावना निर्माण होत असते."
"मेंदूत डोपामीन अधिक तयार झाल्यास आनंदी भावना निर्माण होते. लहान मुलांना पाहिल्यास मानवी मेंदूमध्ये डोपामीन तयार होण्याची प्रक्रिया घडते. त्यामुळेच आपण लहान मुलांना पाहून त्यांचे लाड पुरवतो. त्यांच्यावर प्रेम करतो. लहान बाळांसोबतच्या फोटोमुळे एक सकारात्मक संदेश जाऊ शकतो."
व्हिज्युअल कम्युनिकेशनचा फायदा
फोटो पोस्ट करणं हा संवाद साधण्याचा एक प्रकार असल्याचं डॉ. अभिवंत यांनी सांगितलं. ते म्हणाले, " आपण एखादं पुस्तक वाचतो किंवा आजच्या काळात ते पुस्तक ऑडिओबुकद्वारे ऐकण्याचीही सोय उपलब्ध आहे. या दोन्ही प्रसंगांमध्ये ऐकलेल्या पुस्तकापेक्षाही वाचलेली पुस्तके चांगल्या प्रकारे कळतात आणि तात्पर्याने लक्षात राहतात."
"ऐकीव गोष्टींपेक्षाही पाहिलेले फोटो, व्हीडिओ जास्त लक्षात राहू शकतात. मानवी मेंदू पाहिलेल्या घटना चांगल्या प्रकारे लक्षात ठेवत असतो. राजकीय नेते याच व्हिज्युअल इफेक्टचा चांगला वापर करून घेऊ शकतात. लोकांमध्ये विशिष्ट प्रकारच्या भावना निर्माण करण्यासाठी अशा फोटोंचा उपयोग होतो, असं डॉ. अभिवंत सांगतात.
लहान बाळांचा जाहिरातीतला उपयोग "अपीलिंग"
याबाबत बीबीसी मराठीने अॅड गुरु भरत दाभोळकर यांच्याशीही संवाद साधला. ते सांगतात, "कोणत्याही जाहिरातीत लहान मुलं असतील तर ती जाहिरात अपीलिंग ठरते असं मानलं जातं"
"लहान बाळ, निरागस असे कुत्रे किंवा मांजर या गोष्टी पाहण्यात लोकांना रस असतो. अशा प्रकारच्या गोष्टी लोक आवडीने पाहतात. मुलांना जवळ घेतलेली व्यक्ती पाहिल्यास समोरच्या व्यक्तिला त्याच्याबद्दल आत्मीयता वाटते. तो आपल्यातलाच एक माणूस वाटतो."
"जगातील सर्वच देशातील दिग्गज नेते अशा प्रकारे लहान मुलांना उचलून घेणं, त्यांच्याशी हात मिळवणं, त्यांच्यासोबत फोटो काढणं, यांसारख्या गोष्टी नेहमीच करतात. आपल्या नागरिकांना साद घालण्यासाठी किंवा एखादा संदेश देण्यासाठी ही एक अपिलिंग गोष्ट मानली जाते. यातून एक दयाळू व्यक्ती म्हणून ओळख निर्माण होऊ शकते."
प्रतिमेची पुनर्बांधणी
मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "राजकीय नेत्यांना मतदार आणि त्या निमित्ताने नागरिकांमध्ये स्वतःची प्रतिमा निर्माण करायची असते. त्यासाठीची कोणतीही संधी ते सोडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन युगातल्या सोशल मीडियाचं भान असणारे नेते आहेत."
"पहिल्या टर्ममध्ये त्यांची प्रतिमा काहीशी हार्डलाईनर अशी राहिली. निवडणुकीतील विजयानंतर त्यांच्या लोकप्रियतेचं पर्व अजून संपलेलं नाही. हार्डलाईनर, देशाला महाशक्ती, महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न करणारा नेता तर आहेच, पण सामान्य माणसाच्या आयुष्यातील सुखदुःखाचे क्षणही मला आवडतात, असं या फोटोतून सांगण्याचा मोदींचा प्रयत्न आहे,"
"सत्यनारायण जतिया यांच्यासोबत त्यांची नात संसदेत आल्यानंतर मोदींनी ती संधी सोडली नाही. साधारणपणे गोजिरवाणी दिसणारी लहान बाळं सगळ्यांनाच आवडतात. मानवी जीवनाचं सातत्य, आशा या मुलांमधून प्रतिबिंबित होत असते."
"इतका सर्वशक्तिमान नेता एका लहान बाळाला घेऊ शकतो. त्याला खेळवू शकतो हे देशवासियांना निश्चितच आवडलं."
"मोदींनी कुटुंबकबिला कधी बाळगला नाही. त्यांचं लग्नसुद्धा नावालाच झालं होतं. त्यांची आई वगळता भावाचं किंवा बहिणीचं कुटुंब त्यांच्याजवळ कधीच नसतं. ते नेहमीच 'सिंगल मॅन' म्हणून ओळखलं जातात. पण त्यांनादेखील सुखदुःखाशी देणंघेणं आहे, नवीन पिढीशी देणंघेणं आहे, हे या निमित्ताने अधोरेखित करण्याचा प्रयत्न मोदींनी केला. तसंच आलेली संधी मोदी सोडत नाहीत याचाही हेही त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं."
नेहरूंची जागा घेण्याचा प्रयत्न?
नानिवडेकर सांगतात, "मोदींना इतिहासात नेहरूंची जागा घ्यायची आहे, अशी टीका नेहमी केली जाते. नेहरूंना लहान मुलं आवडायची असं म्हटलं जातं. 'चाचा नेहरू' असं त्यांचं प्रतिमांकन संपूर्ण देशात केलं गेलं होतं."
"नेहरू शाळकरी मुलांमध्ये रमायचे. मोदींनी त्याच्याही पुढे जाऊन लहान बाळासोबत स्वतःची प्रतिमा समोर केली, हे कारण असण्याची शक्यता आहे. त्याच्यातून नवीन पिढीसोबत जोडलेलं राहण्याचा मोदींचा प्रयत्न असू शकतो," असं नानिवडेकर सांगतात.
नानिवाडकर पुढे सांगतात, "मोदी फोटो का काढतात, ते नेहरूंशी स्वतःच तुलना करून घेतात. या चर्चांमध्ये अडकण्याऐवजी मोदींच्या विरोधकांनी मोदी वेगवेगळी माध्यमं इतक्या सक्षमपणे कसे हाताळतात, या माध्यमांचा वापर वापर करून ते कशाप्रकारे स्वतःची प्रतिमा निर्माण करतात, या बाबींचा कोणताही पूर्वग्रह न ठेवता अभ्यास करण्याची आवश्यकता आहे."