फँटसी गेम्स म्हणजे काय? हे खेळातल्या सट्टेबाजीचं सॉफ्ट मॉडेल आहेत?

बुधवार, 19 मे 2021 (13:23 IST)
पराग फाटक
"अरे, मला ड्रीम11 वर टीम लावायची आहे. मला पाच मिनिटं दे."
 
"अरे, माय सर्कलवर टीम लावली का भावा? कालच्या मॅचने मला चांगले पैसे मिळवून दिले."
 
"याच्यापेक्षा एमपीएल खेळा रे."
 
हे संवाद आयपीएल सुरू असताना तुम्ही आजूबाजूला ऐकले असतील. मैदानात जाऊन न खेळता घरबसल्या फोनवर ही बोलंदाजी काय चालते असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
 
ड्रीम11, एमपीएल, माय सर्कल अशी नावं सातत्याने तुमच्या कानी पडत असतील. मॅचवर पैसे लावतात म्हणजे सट्टा अशी भीतीही तुमच्या मनात डोकावली असेल आणि असा अधिकृत सट्टा कसा लावतात असंही तुम्हाला वाटून गेलं असेल. या सगळ्या प्रश्नांचा गुंता सोडवण्यासाठीच फँटसी लीगचं कल्पनारम्य जग समजून घेणं आवश्यक आहे.
असंख्य घरांमध्ये तरुण तुर्क क्रिकेट पाहण्यात दंग असतात. मात्र आता फक्त क्रिकेट पाहण्याऐवजी अमुक खेळाडू खेळायला हवा, मी जिंकलो तर एवढे पैसे मिळतील, या कारणांमुळे या खेळाडूला टीममध्ये घेतलं अशा चर्चा प्रत्यक्ष, फोनवर आणि व्हॉट्सअप ग्रुपवर रंगू लागल्या आहेत. 2000च्या दशकात क्रिकेटरुपी बाजारपेठेने चांगलंच बाळसं धरलं आहे.
 
दरवर्षी शाळा-कॉलेजला सुट्टया असतात त्या काळात होणारी आयपीएल स्पर्धा याचं प्रारुप आहे. दीड महिन्यात खेळाडूंना वर्षभराची बेगमी करून देण्याची ताकद या स्पर्धेत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पैसा भारताच्या माध्यमातून उभा राहतो हे वारंवार स्पष्ट झालं आहे. खेळाडू, संघटना, बोर्ड हे मालामाल होत असतील तर चाहत्यांनी मागे का राहावं? यातूनच चाहत्यांना युझर करत फँटसी गेम्सनी जम बसवला आहे.
 
फँटसी गेम खेळण्यासाठी कुठल्याही मैदानात जावं लागत नाही. साहजिकच कुठलेही शारीरिक श्रम करावे लागत नाहीत. सगळं स्मार्टफोनवर चालतं. जेमतेम साक्षर माणूसही खेळू शकेल अशी अॅपची रचना असते. आकर्षक रंगसंगती, टप्प्याटप्यांवर कमाईचे खुले केलेले मार्ग यामुळे चाहते सहजी आकृष्ट होतात. पैसे कमवावे वाटणं ही नैसर्गिक भावना आहे. आपण जो खेळ पाहतो त्यासंदर्भात आडाखे बांधून थोडे पैसे गाठीशी येत असतील तर वावगं काय? असं फँटसी लीगचं जग आहे.
 
2024 पर्यंत देशात फँटसी गेमचा पसारा 3.7 बिलिअन डॉलर्स एवढा होईल, असा फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी स्पोर्ट्स आणि केपीएमजी यांचा अहवाल सांगतो.
 
फँटसी गेम म्हणजे काय?
स्मार्टफोन, टॅब तसंच कॉम्प्युटर या डिव्हाईसच्या माध्यमातून खेळल्या जाणाऱ्या खेळांना 'ऑनलाईन गेमिंग' म्हटलं जातं. याचे तीन मुख्य प्रकार आहेत.
 
रिअल मनी गेम्स म्हणजे ज्याद्वारे युझर पैसा मिळवू शकतात. यामध्ये विविध फँटसी गेम्सचा समावेश होतो. क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, कबड्डी यासह अन्य खेळांचे गेम तसेच स्पर्धांसाठी फँटसी लीग खेळता येते. रमी तसंच पोकरचाही यात समावेश होतो.
 
मोबाईल कॅज्युअल गेमिंग मध्ये स्मार्टफोनवर खेळल्या जाणाऱ्या खेळांचा समावेश असतो. यामध्ये कँडी क्रश, सबवे सर्फर, टेंपलरन अशा गेम्सचा समावेश होतो.
 
इ-स्पोर्ट्समध्ये फिफा, पब्जी, काऊंटरस्ट्राईक यांचा समावेश होतो.
 
फँटसी गेम्स किती आहेत आणि खेळायचे कसं?
फँटसी गेम्सची भारतातली सुरुवात 2001 मध्ये झाली होती. ईएसपीएन-स्टार स्पोर्ट्स या समूहाने सुपर सिलेक्टर फँटसी गेम लाँच केला होता. वीस वर्षांपूर्वी ऑनलाईन साक्षरता, वेगवान इंटरनेटची उपलब्धता, ऑनलाईन बँकिंगच्या संधी सगळंच मर्यादित होतं.
 
सध्याच्या घडीला, भारतात साधारण 70 फँटसी गेम ऑपरेटिंग कंपन्या आहेत.
 
प्रत्येक फँटसी गेमचं स्वरुप थोडं वेगवेगळं असतं पण खेळण्याचा ढाचा साधारण सारखाच असतो. युझरला नाव, इमेल आणि बँक अकाऊंट डिटेल्स द्यावे लागतात. पॅन किंवा आधार कार्ड नंबर द्यावा लागतो. एनरोल करण्यासाठी नाममात्र पैसे भरावे लागतात. फँटसी गेम खेळण्यासाठी वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली असणं बंधनकारक आहे.
एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचसाठी किंवा आयपीएलसारख्या लीगसाठी तुम्ही खेळू शकता. फँटसी लीगचं मर्म हे की तुम्ही त्या संबंधित मॅचपूर्वी टीम तयार करायची. म्हणजे दोन्ही संघांचा अभ्यास करून सर्वोत्तम 11 खेळाडू निवडायचे. तुम्ही तुमच्या मित्रांची, ऑफिसातल्या सहकाऱ्यांची, क्रिकेटवेड्या दोस्तांची मिळून लीग तयार करू शकता. तसंच तुम्ही अनोळखी लोकांबरोबरही खेळू शकता.
यात पब्लिक काँटेस्ट आणि प्रायव्हेट काँटेस्ट असे प्रकार असतात. पब्लिक काँटेस्टमध्ये तुम्ही मोठ्या स्पर्धेचा भाग होता. बाकी स्पर्धकांची संख्या लाखात असू शकते. तुम्हाला अन्य स्पर्धक कोण हे समजणंही अवघड आहे. प्रायव्हेट काँटेस्टमध्ये तुम्ही तुमच्या ठरवलेल्या लोकांबरोबर खेळू शकता.
मॅच होते. तुम्ही निवडलेल्या खेळाडूंना त्यांच्या मॅचमधल्या कामगिरीनुसार गुण मिळतात. शतकासाठी, पाच विकेट घेण्यासाठी, कॅचसाठी अशा प्रत्येक यशासाठी अतिरिक्त गुण युझरला मिळतात. प्रत्येक रन, प्रत्येक विकेटसाठी गुण मिळतातच.
 
त्या गुणांनुसार विजेता घोषित केला जातो. विजेत्याच्या खात्यात पैसे जमा केले जातात. एका फँटसी लीगदरम्यान अनेक फ्री तसंच पेड काँटेस्ट असतात. त्यामुळे विजेत्यांची संख्या बरीच असते.
 
फँटसी गेम खेळण्यासाठी काही अभ्यास/तयारी करावी लागते का?
ज्या खेळाचा फँटसी गेम तुम्ही खेळत आहात तो तुम्हाला आवडणं अपेक्षित आहे. तरच तुम्ही त्यातले बारकावे टिपू शकता. खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी, ठराविक प्रतिस्पर्ध्यांविरुद्धची कामगिरी, खेळपट्टीचा अंदाज, भौगोलिक वातावरण, स्पर्धेचा इतिहास याचा किमान अभ्यास असायला हवा. इंग्रजीत परम्युटेशन-कॉम्बिनेशन अशी संकल्पना आहे.
टीम तयार करण्यासाठी ठराविक विदेशी खेळाडू, अमुक इतके बॅट्समन, इतके बॉलर, एवढे ऑलराऊंडर अशी टीम तयार करायची असते. त्याचं गणित समजून घेणं आवश्यक. फँटसी गेम खेळणाऱ्यांसाठी कंपन्यांनी गेममध्येच मदतीसाठी काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात. इंटरनेटवर मोफतही सल्ले मिळतात.
 
फँटसी लीगमधून होणाऱ्या कमाईवर टॅक्स भरावा लागतो का?
हो. फँटसी गेम खेळून मिळणाऱ्या कमाईवर टॅक्स भरावा लागतो. ही कमाई टॅक्सच्या नियमांमध्ये उत्पनाचे अन्य स्रोत या वर्गात मोडते.
 
इन्कम टॅक्स कायद्यामधील 115BB अंतर्गत टॅक्स लागू होतो. फँटसी लीग, लॉटरी, क्रॉसवर्ड पझल, रेस, कार्ड गेम्स मधून होणारी कमाई टॅक्ससाठी पात्र ठरते.
फँटसी गेम खेळण्यासाठी तुम्ही किती रक्कम नोंदणी शुल्क म्हणून भरली आहे यावरून टॅक्सची रक्कम ठरत नाही. फँटसी लीगच्या माध्यमातून तुम्ही किती रक्कम जिंकलेय त्यानुसार टॅक्स कापला जातो.
 
उदाहरणार्थ- एखाद्या फँटसी गेमचे नोंदणी शुल्क 100 रुपये असेल आणि तुम्ही 10,000 रुपयांची कमाई केली तर टॅक्स 10,000 या रकमेआधारित ठरेल.
 
सट्टेबाजी आणि फँटसी गेम यांच्यात नेमका फरक कसा आहे?
आर्थिक व्यवहार या कळीच्या मुद्यावर दोन गोष्टीत फरक आहे. फँटसी गेमसाठी डिजिटल पद्धतीने व्यवहार होतो. त्याची नोंद दाखवता येऊ शकते. सट्टेबाजीत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांचा हिशोब नसतो. बेकायदेशीर आणि अनियंत्रित पद्धतीने व्यवहार चालतात.
 
फँटसी गेम्समध्ये आर्थिक व्यवहाराची रक्कम लहान तसंच मध्यम स्वरुपाची असते. उदाहरणार्थ-कोणताही फँटसी खेळ खेळण्यासाठी चाहत्याला रक्कम भरून खेळता येतं. सट्टेबाजीत गुंतलेली रक्कम मोठी असते.
फँटसी गेम्सच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांना कॉर्पोरेट टॅक्स, इन्कम टॅक्स, टीडीएस, जीएसटी याचं अधिष्ठान असतं. सट्टेबाजीदरम्यान होणारे आर्थिक व्यवहार नियमबाह्य पद्धतीने होत असल्याने सरकार तसंच कायद्याचं कार्यकक्षेत येत नाहीत.
 
फँटसी गेम्स खेळणाऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी विविध टप्प्यांवर ओटीपी, पासवर्ड, इमेल अशा विविध स्वरुपाच्या ऑनलाईन सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. सट्टेबाजीत पैसे गुंतवलेल्या व्यक्तीच्या पैशाची शाश्वती देता येत नाही.
 
ज्या मॅचसाठी फँटसी गेमचे युझर खेळतात त्यांच्या निर्णयांनी मॅचच्या निकालावर फरक पडत नाही. सोप्या शब्दात सांगायचं तर फँटसी गेम खेळून प्रत्यक्ष मॅचमधल्या घडामोडी बदलता येत नाहीत, काही विशिष्ट गोष्टी घडवून आणता येत नाहीत तसंच नियंत्रितही करता येत नाहीत. सट्टेबाजीत याच्या अगदी उलट असतं. सट्टा लावल्यानुसार काही वेळेला मॅचचा निर्णय बदलल्याचं, खेळाडूच्या कामगिरीत बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
 
फँटसी गेमच्या वैधतेसंदर्भात देशात विविध न्यायालयांनी विविध पद्धतीने निर्णय दिले आहेत. तूर्तास पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने ड्रीम11 फँटसी लीगला वैध ठरवलं आहे. या न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर नंतर सर्वोच्च न्यायायावर शिक्कामोर्तब केलं. दुसरीकडे सट्टेबाजी हा भारतात गुन्हा आहे. त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.
 
भारतात सट्टेबाजीसंदर्भात नियम काय आहे?
ब्रिटिशांच्या काळात म्हणजे 1867 मध्ये पब्लिक गँबलिंग अॅक्ट पारित करण्यात आला. या कायद्यात वेळोवेळी बदल करण्यात आला आहे.
 
यानुसार सार्वजनिक ठिकाणी सट्टा लावणे हा गुन्हा आहे. या कायद्यात 'गेम्स ऑफ स्किल' हा अपवाद ठेवण्यात आला आहे. 'गेम ऑफ स्किल' आणि 'गेम ऑफ चान्स' अशा दोन संकल्पना आहेत.
 
गेम ऑफ स्किलमध्ये, तुमचं बुद्धीकौशल्य वापरून खेळ खेळला जातो, काही आडाखे बांधले जातात. यासाठी खेळाडू, त्याचा खेळ, मैदान, वातावरण, प्रतिस्पर्धी, इतिहास, आकडेवारी याचा अभ्यास करावा लागतो. तिथे स्किल म्हणजे कौशल्य उपयोगात येतं. 'गेम ऑफ चान्स'मध्ये अभ्यासाऐवजी नशिबावर भरवसा ठेऊन आडाखे बांधले जातात. 'गेम ऑफ स्किल' या पद्धतीने खेळला जाणारा खेळ असेल तर त्याला कायद्यान्वये सूट देण्यात आली आहे. मात्र गेम ऑफ चान्स असेल तर त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.
 
गँबलिंग हा राज्यांअंतर्गत येणारा मुद्दा
"गेम ऑफ चान्स आणि गेम ऑफ स्किल यामध्ये अतिशय धूसर रेषा आहे. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालय, राजस्थान, मुंबई उच्च न्यायालय यांनी यासंदर्भात निकाल दिले आहेत.
 
आपल्या संविधानाच्या रचनेनुसार काही विषय केंद्राच्या अखत्यारित, काही राज्यांच्या तर काही संयुक्तपणे अखत्यारीत असतात. गँबलिंग हा राज्यांअंतर्गत येणारा विषय आहे. त्यामुळेच सात राज्यांनी फँटसी गेम्सना मज्जाव केला आहे तर काही राज्यांनी परवानगी दिली आहे. गँबलिंगमध्येही प्रकार आहेत. लॉटरीला अनेक राज्यांमध्ये मान्यता आहे", असं क्रीडाविषयक वकील विदुषपत सिंघानिया यांनी सांगितलं.
 
नवीन कायद्याची आवश्यकता
गेम ऑफ स्किल्स हे फँटसीचं स्वरुप पाहिलं की कळतं पण गेम ऑफ चान्सही असतो. दोन्हीत फारसं अंतर नाही आणि हे मुद्दे एकमेकात गुंतलेही आहेत. फँटसी गेमविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली तर ते त्यांच्या पथ्यावर पडतं.
 
न्यायालयाने जर त्यांच्या बाजूने आदेश दिला की त्यांचं कामकाज सुकर होतं. फँटसी गेम्स नवीन आहेत. त्यासंदर्भात सरसकट नवीन कायदा आला तर लीगकर्त्यांना आणि युझर्सना दाद मागण्यासाठी अधिष्ठान असेल. लिगल आहे की नाही असा जो गोंधळ आहे तो यातून सुटू शकेल, असं सायबर क्राईम विषयाचे वकील प्रशांत माळी यांनी सांगितलं.
 
देशातल्या प्रमुख फँटसी लीगबद्दल जाणून घेऊया
ड्रीम11
 
ड्रीम11 फँटसी लीग ही ड्रीम स्पोर्ट्स कंपनीचा भाग आहे. 2008 मध्ये हर्ष जैन आणि भवित शेठ यांनी कंपनीची स्थापना केली. या कंपनीत चीनच्या टेन्सेट या बलाढ्य कंपनीची गुंतवणुकही आहे. फॅनकोड हा उपक्रमही याच कंपनीचा आहे. कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे ड्रीम11 फँटसी लीगचे 10 कोटींहून अधिक युझर्स ग्राहक आहेत.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ड्रीम11 फँटसी लीगचा सदिच्छादूत आहे. भारतीय संघातील सात प्रमुख खेळाडूंना ड्रीम11ने करारबद्ध केलं आहे.
 
ड्रीम11 न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या सुपर स्मॅश ट्वेन्टी-20 स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. गेल्या वर्षी व्हिवो कंपनीने माघार घेतल्यानंतर ड्रीम11 कंपनीने आयपीएलचं मुख्य प्रायोजकत्व पटकावलं होतं. त्यासाठी ड्रीम11ने तब्बल 222 कोटी रुपये खर्चून हे अधिकार मिळवले.
 
मोबाईल प्रीमिअर लीग (एमपीएल)
 
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली एमपीएलचा सदिच्छा दूत आहे. बेंगळुरूस्थित गॅलाक्टस फनवेअर टेक्नॉलॉजी कंपनीतर्फे ही लीग चालवली जाते. साई श्रीनिवास किरण गरिमेला आणि शुभम मल्होत्रा यांनी 2018मध्ये कंपनीची स्थापना केली. विराट कोहलीने या कंपनीत 33 लाख रुपयांची गुंतवणुकही केली आहे.
भारतीय संघाच्या कर्णधाराने ज्या कंपनीत गुंतवणुक केली आहे ती कंपनी भारतीय संघाचे अधिकृत किट स्पॉन्सर आणि मर्चंडायझिंग पार्टनर आहे. यामुळे परस्परविरोधी हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तूर्तास एमपीएलचे युझर्स ग्राहक आहेत. क्रिकेटच्या बरोबरीने 60 विविध खेळ युझर्सना खेळता येतात.
 
माय 11 सर्कल
 
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हे माय 11 सर्कल फँटसी लीगचे सदिच्छा दूत आहेत.
गेम्स 24*7 कंपनीने दोन वर्षांपूर्वी हा फँटसी प्लॅटफॉर्म सुरू केला. भविन पंड्या आणि त्रिविक्रमन यांनी याची सुरुवात केली. माय11सर्कल यांनी श्रीलंका प्रीमिअर लीगशी करार केला आहे.
 
रमी सर्कल
 
तुम्हाला एसएमएसद्वारे रमी सर्कलसंदर्भात मेसेज येत असतील. अल्पावधीत लोकप्रिय झालेला फँटसी गेम. गेम्स 24*7 प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे हा फँटसी गेम चालवला जातो. रमी सर्कलच्या वेबसाईटवर लिगल पोझिशन सदरात म्हटल्याप्रमाणे, रमी सर्कलवरील गेम हे स्किलआधारित आहेत. हे कायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने 1968मध्ये दिलेल्या निकालानुसार, रमी-बुद्धिबळ-ब्रिज-कॅरम हे स्किल अर्थात कौशल्याआधारित खेळ आहेत. सहा राज्यांमध्ये कायद्याने प्रतिबंध केल्याचा अपवाद वगळता बाकी देशात तुम्ही खेळू शकता.
 
पेटीएम फर्स्ट गेम्स
 
नोटबंदीनंतर डिजिटल पेमेंटसाठी प्रसिद्ध पेटीएम कंपनीने स्वत:चा फँटसी गेम लाँच केला आहे. पेटीएम फर्स्ट गेम्स असं याचं नामकरण केलं आहे.
 
हलाप्ले
 
नझारा टेक्नॉलॉजीज कंपनीने हलाप्ले या फँटसी प्लॅटफॉर्मची सुरुवात केली.
 
याव्यतिरिक्त 11विकेट्स, फँटेन, स्टारपिक, वेलप्लेड, लीग11, मायटीम11, याहू फँटसी स्पोर्ट्स, रिअल11, बल्लेबाजी, गेमझी, प्लेवन, हाऊझदॅट, लीगएक्स असे असंख्य फँटसी गेमचे पर्याय स्मार्टफोनवर उपलब्ध आहेत.
 
क्रिकेट आणि फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या प्रामुख्याने असली तरी कबड्डी, बास्केटबॉलपासून रमीपर्यंत असंख्य खेळांचे गेम्स उपलब्ध आहेत.
 
कायदेशीर अडथळे
नीती आयोगाने, सरकारच्या धोरणात्मक निर्णय आखणाऱ्या संस्थेने ऑनलाईन फँटसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म्ससाठी सर्वसमावेशक राष्ट्रीय नियंत्रक धोरण असावं असं त्यांच्या अहवालात म्हटलं आहे.
 
नीती आयोगाने याची आवश्यकता का आहे हे मांडताना केपीएमजीने तयार केलेल्या आकडेवारीचा संदर्भ दिला. 2016 मध्ये 2 मिलिअन युझर्स भारतात होते. 2019पर्यंत हे प्रमाण 90 मिलिअन एवढं झालं. 2019-20 या आर्थिक वर्षापर्यंत फँटसी लीगची आर्थिक उलाढाल 2,470 कोटी एवढी झाली आहे.
 
फँटसी गेम म्हणजे नेमकं काय, यात खरंच गेम ऑफ स्किल आहे का गेम ऑफ चान्स हे सुस्पष्ट करणारा आराखडा असावा.फँटसी लीग्सना प्रत्येक राज्याचे नियम लागू होतात. युझर्सना, फँटसी लीग ऑपरेटर्सना सगळ्यांना एकाच पातळीवर आणण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील आराखडा असावा असं नीती आयोगाने म्हटलं आहे.
 
2017 मध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने फँटसी स्पोर्ट्समध्ये स्कील अर्थात कौशल्यांचा वापर होत असल्याने त्यांनी गॅम्बलिंगमध्ये गणता येणार नाही असा निकाल दिला होता.
 
गेल्या दोन ते तीन वर्षात, ऑनलाईन गॅम्बलिंग आणि फँटसी लीगवर बंदी आणावी अशा याचिका विविध शहरातील उच्च न्यायालयांमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत.
 
आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम, ओदिशा, नागालँड आणि सिक्कीम या राज्यांनी ऑनलाईन फँटसी लीगवर बंदी घातली आहे. या राज्यातील नागरिकांना फँटसी लीगमध्ये सहभागी होता येत नाही.
 
नोव्हेंबर 2020 मध्ये, मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने विराट कोहली आणि सौरव गांगुली यांना फँटसी लीगचं प्रमोशन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली होती.
 
फँटसी गेमचं मॉडेल लोकप्रिय का होतंय?
वित्तीय नियोजनकार आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी यांनी फँटसी गेमचं अर्थकारण उलगडून सांगितलं. ते म्हणाले, "खेळ हे करमणुकीचं साधन नसून त्यातून पैसा कमवायचा असतो ही मानसिकता रुजली आहे. फँटसी लीग लोकप्रिय होण्यामागे स्वस्त इंटरनेट, स्मार्टफोनची उपलब्धता हे घटकही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे निमशहरी, नव्याने उदयास येत असलेली शहरं, ग्रामीण भाग इथे फँटसी लीगचे युझर आहेत."
 
ते पुढे म्हणाले, "शेअर बाजारात प्रवेश करण्यासाठी काही प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. फँटसी लीगचं नोंदणी शुल्क किरकोळ असतं. फँटसी लीगमधून मिळणाऱ्या पैशाला गुंतवणूक म्हणता येणार नाही. पण फँटसी लीगमधून मिळणाऱ्या पैशातून दैनंदिन आयुष्यातले काही खर्च सुटू शकतात.
 
शेअर बाजार, म्युच्य़ुअल फंड हे विश्व सर्वसामान्य माणसासाठी किचकट आहे. पण क्रिकेट बहुतांशजण बघतात. अनेकांना समजतं. आपल्याकडे बेरोजगार वर्गही खूप आहे. फँटसी लीग खेळण्यासाठी स्वतंत्र वेळ काढून अभ्यास वगैरे करावा लागत नाही. क्रिकेट पाहता पाहता थोडेफार पैसे हाती येत असल्यामुळे फँटसी लीग खेळणाऱ्यांचं प्रमाण वाढतं आहे."
क्रीडा अभ्यासक आणि अर्थसल्लागार आदित्य जोशी फँटसी गेम का फोफावलेत आहेत ते समजावून देतात. ते म्हणतात, "वेगवेगळ्या कंपन्यांतर्फे फँटसी लीग चालवल्या जातात. लीग खेळण्यासाठी नोंदणी करावी लागते. नाव, वय, इमेल, क्रेडिट कार्ड नंबर, राहण्याचं ठिकाण असा तपशील कंपनीला उपलब्ध होतो. डेटा इज न्यू ऑईल असं समीकरण आहे. असा प्रतवारी केलेला डेटा मिळणं हे फँटसी गेम चालवणाऱ्या कंपनीसाठी आर्थिक कमाईइतकंच महत्त्वाचं आहे. कारण या डेटानुसार युझर बिहेव्हिअर लक्षात येतं."
 
फँटसी गेम आयपीएल स्पर्धेला कशी फायदेशीर ठरू शकते हे आदित्य सांगतात. आयपीएलच्या एका हंगामात 60 मॅच होतात. सगळ्याच मॅचेसना प्रेक्षकांचा प्रतिसाद नसतो. जेतेपदाच्या शर्यतीत नसणाऱ्या, गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या संघांदरम्यानच्या मॅचला जेमतेम प्रतिसाद मिळतो. पण फँटसी लीग खेळणाऱ्या युझर्सनी त्यांच्या संघात त्या मॅचचे खेळाडू घेतलेले असतात.
 
संबंधित खेळाडू चांगले खेळले तर युझरला गुण मिळतात. चांगल्या गुणातून ते विजेते होऊन पैसे मिळण्याची शक्यता असते. अशावेळी फँटसी लीग युझर मॅच रंजक नसली तरी पूर्ण मॅच पाहण्याची शक्यता असते. त्यामुळे एकप्रकारे फँटसी लीगचा पसारा वाढणं आयपीएल आणि पर्यायाने क्रीडा स्पर्धांसाठी फायदेशीर आहे.
 
'फँटसी हे सेल्फ ग्रॅटिफिकेशन मोड्यूल'
"तुम्ही स्पर्धेत सहभागी होता, बाकीच्यांशी स्पर्धा करता. जो खेळ तुम्हाला आवडतो, त्याचा अभ्यास करून टीम तयार करता. तुमचं ज्ञान तसंच माहिती उपयोगात आणून नशीब आजमवता. तुम्ही निवडलेल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर गुण मिळतात आणि पैसेही मिळतात. त्यामुळे फँटसी हे सेल्फ ग्रॅटिफिकेशन आहे. ओनरशिपची भावना म्हणजेच माझी टीम, माझे खेळाडू अशी तयार होते", असं मुळचे पुण्याचे आणि आता कॅनडात स्पोर्ट्स बिझनेस क्षेत्रात कार्यरत मोहर मोघे यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, "कोणत्याही फँटसी लीगमध्ये अंतर्गत लीग असतात. ओळखीच्या लोकांच्या लीगचं स्वरुप भिशीसारखं असतं. तो गट मिळून किती पैसे गुंतवायचे ते ठरवतो. प्रत्येक मॅचला टॉप थ्री निवडले जातात. त्यांना एका गणितीय सूत्रानुसार (60-20-20) पैसे मिळतात. हे सूत्र बदलता येतं. त्या गेमने लाँच केलेल्या लीगही असतात. बक्षीसाची रक्कम ठरलेली असते. कोणत्या क्रमांकाच्या विजेत्याला किती रक्कम मिळणार हे गणितीय सूत्रात बांधलेलं असतं. अर्थकारणाइतकंच फँटसी गेम्समुळे मॅच बघण्याचं प्रमाण वाढतं हा मुद्दा महत्त्वाचा आहे".
 
"गेम ऑफ चान्सचा भाग असला तरी स्किलचा मुद्दा आहेच. खेळणाऱ्यांसाठी अनेक सुरक्षित व्यासपीठं उपलब्ध आहेत. संशयास्पद किंवा बेकायदेशीर काहीच नाही. कुठलाही फँटसी गेमचं अप डाऊनलोड करताना टर्म्स अँड कंडिशन्स दिलेल्या असतात. गेम खेळताना अनाठायी धोका पत्करू नका असंही बजावलं जातं. भारतात गॅंबलिंगला कायदेशीर मान्यता नाही पण अनेक देशांमध्ये ते वैध मानलं जातं. गँबलिंगचं अर्थकारण जीडीपीला हातभार लावतं. गँबलिंग कंपन्या मोठमोठ्या फुटबॉल क्लब्सच्या प्रायोजक आहेत", याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
 
संदर्भ
केपीएमजी-इंडियन फेडरेशन ऑफ स्पोर्ट्स गेमिंगचा अहवाल
 
https://assets.kpmg/content/dam/kpmg/in/pdf/2019/03/online-gaming-india-fantasy-sports.pdf 
https://indianexpress.com/article/sports/dream-11-fantasy-game-online-sports-betting-cricket-7131631/ 
https://indianexpress.com/article/sports/ipl/ipl-bcci-dream11-online-fantasy-sports-gambling-illgegal-supreme-court-5713958/ 
https://indianexpress.com/article/sports/sport-others/live-sports-lockdown-fantasy-sporting-leagues-mobile-games-ludo-rummy-6419110/ 
https://indianexpress.com/article/opinion/editorials/fantasy-sports-gaming-platforms-online-gambling-betting-7132789/ 
https://www.livemint.com/money/personal-finance/how-winnings-on-fantasy-sports-apps-like-dream11-and-mpl-are-taxed-11619700771867.html 
https://www.livemint.com/industry/media/rummy-poker-esports-platforms-likely-to-benefit-from-ipl-suspension-11620740075618.html

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती