विधानसभा निवडणूक 2019: महाराष्ट्राच्या विधानसभेची पहिली निवडणूक आणि तीन मुख्यमंत्री

मंगळवार, 27 ऑगस्ट 2019 (13:39 IST)
ओंकार करंबळेकर
 
1960 साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि दोनच वर्षांमध्ये विधिमंडळाची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळवलं आणि आजच्या महाराष्ट्र राज्याची राजकीय वाटचाल सुरू झाली.
 
1962 च्या राजकीय परिस्थितीला समजून घेण्यासाठी त्याआधीच्या दोन दशकांची मराठी भाषिक प्रदेशाची वाटचाल जाणून घेणं गरजेचं आहे.
 
1956 साली राज्य पुनर्रचना आयोगाद्वारे मुंबई राज्याचे नवे क्षेत्र ठरवण्यात आले. यामध्ये सौराष्ट्र आणि कच्छ यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच मध्य प्रदेशातील नागपूर विभाग आणि हैदराबादमधील मराठी भाषिक मराठवाडा विभाग जोडण्यात आला.
 
महाराष्ट्र विधानसभेची तेरावी निवडणूक येत्या ऑक्टोबर महिन्यात होत आहे. 1960 सालापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणाने अनेक चढउतार पाहिले. त्यातल्या 10 मुख्य वळणांच्या 10 गोष्टी सांगणारी ही मालिका - किस्से महाराष्ट्राचे.
दक्षिणेचे धारवाड, विजापूर आणि बेळगाव हे जिल्हे तत्कालीन म्हैसूर राज्यात गेले. चंदगड तालुका महाराष्ट्रातच ठेवण्यात आला. या पुनर्रचनेमुळे मुंबई विधानसभेच्या मतदासंघांची संख्या 315 वरून 396 इतकी झाली. त्यामुळेच 1957 साली झालेल्या निवडणुकीमध्ये 396 मतदारसंघांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.
 
महाराष्ट्र राज्याचा मंगलकलश आणि राज्यस्थापना
मुंबई द्विभाषिक राज्यातून आपापली भाषा बोलणारी स्वतंत्र राज्यं असावीत यासाठी गुजराती आणि मराठी लोकांनी प्रयत्न सुरु केले. मराठी भाषिकांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि गुजराती भाषिकांनी महागुजरात चळवळीतून ही मागणी लावून धरली आणि अखेर 1 मे 1960 रोजी या राज्याची विभागणी झाली.
 
गुजराती भाषिकांचे गुजरात व मराठी भाषिकांचे महाराष्ट्र हे राज्य तयार झालं.
 
या महाराष्ट्र राज्यात मध्य आणि बेरार प्रांतातील आठ जिल्हे आणि हैदराबादचे 5 जिल्हे समाविष्ट केले गेले. 1946 ते 1952 या कालावधीत मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब खेर निवडले गेले होते. त्यानंतर मोरारजी देसाई यांनी चार वर्षांसाठी हे पद सांभाळले.
 
1956 ते 1960 या चार वर्षांमध्ये यशवंतराव चव्हाण मुंबईचे मुख्यमंत्री होते आणि 1960 साली नव्या आणि आज अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री झाले.
1956 साली मुंबई राज्याच्या राज्यपालपदी श्रीप्रकाश यांची नियुक्ती झाली होती. श्रीप्रकाश या पदावरती 1962 पर्यंत असल्यामुळे आजच्या महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होण्याचा मान त्यांच्याकडे जातो.
 
50 टक्के मतं काँग्रेसला
1962 साली महाराष्ट्र विधानसभेच्या 264 मतदारसंघांसाठी निवडणुका झाल्या. स्वातंत्र्यचळवळीपासून काँग्रेसचा असलेला प्रभाव नव्या राज्याच्या निवडणुकांमध्येही दिसून येऊ लागला. या निवडणुकीत काँग्रेसने सर्व 264 जागा लढवल्या आणि त्यातल्या 215 जागा जिंकून विधानसभेत एकतर्फी बहुमत मिळवलं.
 
काँग्रेसनंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाकडे केवळ 15 जागा होत्या. म्हणजेच पहिल्या क्रमांकाचा काँग्रेस आणि दुसऱ्या क्रमाकांचा शेकाप यांच्यामध्ये चक्क 200 सदस्यांचं अंतर होतं.
 
त्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाला 9, कम्युनिस्ट पक्षाला 6, रिपब्लिकन पार्टीला 3 आणि समाजवादी पक्षाला 1 जागा मिळाली. या विधानसभेत 15 अपक्षही होते. काँग्रेसचा मतांमध्ये 51.22 टक्के वाटा काँग्रेसला मिळाला होता तर शेकापला केवळ साडेसात टक्के मतांवर समाधान मानावं लागलं होतं.
 
या विधानसभेची स्थापना झाल्यावर सभापतीपदी बाळासाहेब भारदे यांची निवड झाली. बाळासाहेब भारदे हे सलग दोन विधानसभांसाठी सभापती होते. 1962 ते 1972 असा प्रदीर्घ काळ ते विधानसभेचे सभापती होते.
 
विदर्भ-कोकणाचे मुख्यमंत्री
1962 साली संरक्षणमंत्रिपदी निवड झाल्यामुळे यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्र सोडून केंद्रात जावं लागलं. त्यानंतर मारोतराव कन्नमवार यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली मतदारसंघातून ते निवडून आले होते.
 
तत्पूर्वी त्यांनी मुंबई राज्यातील विधानसभेसाठीही याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी बसणारे ते विदर्भाचे ते पहिले नेते म्हणता येईल. मात्र वर्षभरातच मुख्यमंत्रिपदावर असतानाच त्यांचे निधन झाले.
 
24 नोव्हेंबर 1963 रोजी कन्नमवार यांचं निधन झाल्यावर पी. के. सावंत यांची काळजीवाहू मुख्यमंत्री जबाबदारी स्वीकारली. पी. के. सावंत यांनी 4 डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाले.
वसंतराव नाईक
कन्नमवार यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदी बसणारे वसंतराव नाईक हे दुसरे वैदर्भिय नेते. 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 असा अकरा वर्षांहून अधिक मोठा कार्यकाळ त्यांना मिळाला. 1952 ते 1957 या कालावधीत ते मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य होते.
 
त्यानंतर तीन वर्षे मुंबई द्वैभाषिक राज्याचे आणि नंतर महाराष्ट्र विधानसभेचे ते सदस्य झाले. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात विजयालक्ष्मी पंडीत, पी. व्ही. चेरियन आणि अली यावर जंग असे तीन राज्यपालही बदलून गेले. प्रदीर्घ कालावधीमुळे महाराष्ट्राच्या पायाभरणीच्या काळात आणि एकूणच प्रशासनव्यवस्थेवर त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला होता.
 
अंतुले-नाईक-धुळप-अत्रे
महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर झालेल्या निवडणुकीनंतरच्या विधानसभेत बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले, शंकरराव चव्हाण सदस्य होते. हे दोन्ही सदस्य कालांतराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्याप्रमाणे अनेक दिग्गज नेते या विधानसभेचे सदस्य होते.
 
ख्यातनाम लेखक, नाटककार आणि'मराठा'कार आचार्य अत्रे या विधानसभेत दादर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. लेखिका सरोजिनी बाबर यासुद्धा या विधानसभेच्या सदस्या होत्या.
 
गणपतराव देशमुख सर्वात पहिल्यांदा या विधानसभेमध्ये सदस्य निवडून गेले. त्यानंतर 1972 आणि 1995 या अपवाद वगळता ते प्रत्येक निवडणूक जिंकून विधानसभेत गेले आहेत. आजही 2014 साली स्थापन झालेल्या विधानसभेचे ते सदस्य आहेत. 50 वर्षे विधानसभेच्या सदस्यपदी असणारे देशमुख हे राज्यातले एकमेव नेते असावेत.
 
देशमुख यांच्याप्रमाणे शेकापच्या तिकिटावर कृष्णराव धुळपसुद्धा या विधानसभेत निवडून गेले होते. धुळप यांनी दहा वर्षे विरोधी पक्षनेतेपद सांभाळलं.
 
याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात मोठं योगदान देणारे रत्नाप्पाणा कुंभार, विदर्भाचे सिंह म्हणून ओळखले जाणारे जांबुवंतराव धोटे, सहकारमहर्षी केशवराव सोनवणे, मुंबईचं वानखेडे स्टेडियम ज्यांच्या नावे आहे ते शेषराव वानखेडे (ते नंतर विधानसभेचे सभापतीही झाले) असे अनेक विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारे सदस्य या विधानसभेत होते.
 
शिवसेनेचा जन्म
1960 साली महाराष्ट्र नावाचं स्वतंत्र भाषावार प्रांतरचनेनुसार राज्य स्थापन झालं असलं तरी काही मुलुख कर्नाटकात गेला होताच. तसेच मुंबईच्या व्यापारावर दाक्षिणात्य आणि गुजराती लोकांचा प्रभाव होताच. त्यामुळे मुंबईत आणि महाराष्ट्रात आपलीच म्हणजे मराठी लोकांचीच पीछेहाट होतेय असा समज त्यावेळेस रूढ होत होता.
 
याच भावनेला ओळखून आणि त्याला वाट निर्माण करून देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर तीन महिन्यांमध्येच त्यांनी मार्मिक या साप्ताहिकाची सथापना केली. या साप्ताहिकाच्या पहिल्या अंकाचं प्रकाशन थेट मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीच केलं होतं.
 
हळूहळू मुंबईतलं यंडूगुंडूंचं राज्य गेलं पाहिजे. 80 टक्के नोकऱ्या मराठी मुलांना मिळाल्या पाहिजेत अशी भूमिका बाळासाहेब ठाकरे आपल्या साप्ताहिकातून मांडत राहिले. अखेर 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. त्याआधी काही दिवस आधीच मार्मिक मधून शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या नोंदणीसाठी जाहिरात प्रसिद्ध होत होती.
 
शिवसेनेच्या रुपाने नव्या महाराष्ट्रात एका नव्या प्रादेशिक पक्षाने जन्म घेतला होता. त्यानंतर पुढील दोन वर्षांमध्ये शिवसेनेनं वेगानं शाखाविस्तार केला आणि मुंबईभर शिवसेना पसरू लागली. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामधील स्नेहपूर्ण संबंधांनी या विस्ताराला अधिकच वेग आला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती