उद्धव ठाकरे: अनलॉक-2 बद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री?
रविवार, 28 जून 2020 (18:19 IST)
राज्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात काही भागांमध्ये पुन्हा पूर्वीसारखा लॉकडाऊन लागू केला जाऊ शकतो, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.
महाराष्ट्रासह भारतात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन आणि अनलॉकचे टप्पे सुरू आहेत. महाराष्ट्र आता अनलॉक-2च्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी महाराष्ट्राशी एका फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला.
यावेळी त्यांनी कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, शेतकरी, गणेशोत्सवासह इतर काही मुद्द्यांना हात घातला. पाहू या ते काय म्हणाले...
'शेतकऱ्यांचं नुकसान सहन केलं जाणार नाही'
रायगडमध्ये आलेले चक्रीवादळ भीषण होतं. त्याच्या तडाख्यातून लोक नशिबानं वाचले. प्रशासनानं सतर्कता दाखवली. वेळीच लोकांना, मच्छिमार बोटींना सुरक्षित जागी आणलं. फळबागा उद्ध्वस्त झाल्या. विजेचे खांब उन्मळून पडले, घरांचं नुकसान झालंय. नुकसान झालेल्या लोकांच्या आम्ही उभे आहोत.
शेतकऱ्यांनी पेरलेलं बियाणं उगवलं नाही. त्यांचं नुकसान झालं आहे. त्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.
शेतकरी न थांबता राबत आहे, अफाट मेहनत करत आहे. त्यांच्यासोबत आपण आहोत. तसं राहिलं पाहिजे. बोगस बियाणाच्या तक्रारींची आम्ही दखल घेत आहोत. त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट आलं आहे.
कर्जमुक्ती काही प्रमाणात झाली असली तरी त्यांच्यावर वेगवेगळी संकटं आहेत. आता उरलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमुक्त करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. ज्यांनी शेतकऱ्यांना फसवलंय त्यांच्यावर कारवाई करुच. त्यांना शिक्षा होणार, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देणार.सगळं काही ठप्प आहे. या संकटाचा सामना करत आहोत. 30 जून नंतर लॉकडाऊन उठणार का, याचं उत्तर नाही असंच आहे.
'वारीला मुख्यमंत्री म्हणून नाही तर तुमचा प्रतिनिधी म्हणून जाईन'
यावर्षी वारकऱ्यांनी संयम दाखवला. नाईलाज म्हणून यंदा वारीचा सोहळा आटोपशीर करावा लागला.. मी आपल्या सर्वांच्या वतीने मी विठ्ठलाला साकडं घालणार आहे
सर्व जगाला पुन्हा निरोगी दिवस यावेत यासाठी मी साकडं घालणार आहे. वारकरी माझ्या उभे राहिले तर विठुराया माझ्या साकड्याला यश देईल.
'गणपतीची मूर्ती 4 फुटाचीच ठेवावी'
दहीहंडी मंडळाने सामाजिक भान ठेवून स्वतःहून उत्सव रद्द केला, मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यानंतर गणपती उत्सव, ईद, दिवाळी, नवरात्र, माऊंट मेरी यात्रा आहे. यासर्ववेळेस नियम पाळायला हवेत. सर्व गणेश मंडळांनी सरकार घेईल तो निर्णय मान्य असेल अशी भूमिका घेतली. त्यांना मी नमस्कार करतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मूर्तीची उंची चार फुटांपर्यंत सुचवली आहे. त्यावेळेस गर्दी कमी व्हावी हा या मागचा उद्देश आहे.
सर्वांत मोठं प्लाझ्मा थेरपी सेंटर महाराष्ट्रात उभं करण्याचा मानस
सर्व ते उपाय करून आपण कोरोनाशी लढत आहोत. उद्या कदाचित देशातलं सर्वात मोठं प्लाझ्मा थेरपीचा वापर करणारं राज्य महाराष्ट्र ठरेल.
बरं झालेल्या रुग्णांनी पुढे येऊन प्लाझ्मा दान करावं, त्यामुळे आपल्या माध्यमातून आणखी काही लोक वाचतील. लढणं हे आपल्या रक्तात आहे. जेव्हा रक्ताचा तुटवडा झाला तेव्हा रक्तदान करुन आपण हा लढाऊपणा सिद्ध केला. आता ही वेळ पुन्हा आलेली आहे
औषधं मोफत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. औषधाची टंचाई होणार नाही यावर लक्ष दिलं जाईल.
पावसाळ्यावर काय म्हणाले?
पावसाळ्यात काही रोगही येतात, काही संकटंही येतात. सध्या सर्व कर्मचारी कोरोनाविरोधात लढत आहेत. हे दिवस मलेरिया आणि डेंग्युचे दिवस आहेत. डेंग्यूच्या अळ्या कोठेही होऊ शकतात. पाणी साचू देऊ नका. संकटांची मालिका तोडलीच पाहिजे. मी हे प्रेमाने काळजीने , आपुलकीने सांगतोय. लोक गर्दी करत आहेत, मास्क लावत नाहीत हे थांबवा, बाहेर पडताना अंतर ठेवा. स्वतःहून कोव्हिडला बळी पडू नका.
अनलॉकबद्दल काय म्हणाले?
आवश्यकता वाटली तर पहिल्यासारखं लॉकडाऊन होऊ शकतं. जिथं प्रादुर्भाव नाही तिथं गाफील राहून चालणार नाही. गरज नसताना बाहेर पडलात तर पुन्हा येरे माझ्या मागल्या होईल.
आतापर्यंत लढत आलो आहोत. संकट गेलेलं नाही. धोका पत्करुन जे जे शक्य आहे ते हळूवारपणे उघडण्याचा प्रयत्न सुरू आहे.
लॉकडाऊन पुन्हा लावण्याची वेळ येऊ नये अशी आशा व्यक्त करतो.
त्यामध्ये ते अनलॉक 2 च्या दिशेने कशी पावलं टाकायची याबाबत माहिती देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी मुंबईतील कामाच्या वेळा बदलाव्या लागतील असे संकेत दिले होते.
अर्थव्यवस्थेविषयी काय म्हणाले?
संकटकाळातही आपण विविध उद्योजकांना आपला वाटतोय हे चांगलं आहे. 16 हजार कोटींचे करार झाले आहेत. महाराष्ट्राची दारं गुंतवणूकदारांसाठी उघडी आहेत. फक्त कोरोनावर आपण थांबलेलो नाहीत. इतर क्षेत्रात विकासाची कामं सुरू आहेत.
शाळा कशी सुरू होणार यापेक्षा शिक्षण कसं सुरू होणार, याचा विचार केला पाहिजे. सरकारला यापुढेही सहकार्य करा. तुम्हाला न सांगता काहीही करणार नाही. आता शिस्तीची गरज जास्त आहे.