उदयनराजे भोसले – शरद पवारांनी मराठा आरक्षणात लक्ष घालावं नाहीतर उद्रेक होईल

गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (18:50 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी आज (11 नोव्हेंबर) नवी दिल्लीत भेट घेतली.
 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
 
"शरद पवार मराठा समाजाचे सर्वांत मोठे नेते आहेत. तसंच त्यांच्या पक्षाचं सध्या महाराष्ट्रात सत्तेत आहे. त्यामुळे त्यांनीच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढावा असं मलाच नाही सर्वांना वाटतं," असं उदयनराजेंनी भेटीनंतर म्हटलंय.
 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आतापर्यंत नेमकं काय काय झालं आहे याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी उदयनराजे यांनी केली आहे.
 
मराठा आरक्षण मिळालं नाही तर उद्रेक होईल. मराठा आरक्षणामध्ये शरद पवारांनी लक्ष घालावं. तसंच सरकारच्या वकिलांकडून योग्य बाजू मांडली जात नाही. मराठा आरक्षणात राजकारण नको, असंही त्यांनी म्हटलंय.
 
"सरकारच्या वतीने जे वकील नेमले आहेत, त्यांच्य़ाकडून जी मांडणी व्हायला हवी होती ती झालेली दिसत नाही. जे MPSC चे 2150 उमेदवार आहेत, त्यांना खरंतर सामावून घेतलं पाहिजे. या प्रमुख मुद्द्यांची श्वेतपत्रिका सरकारने सादर करावी. इतर समाजातल्या लोकांना जसा न्याय दिला गेला, त्यांना आरक्षण दिलं गेलं, त्याचप्रमाणे आम्हाला सुद्धा कोणाच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण मिळालं पाहिजे," अशी भूमिका उदयनराजे यांनी मांडली आहे.
 
सातारा पोटनिवडणुकीनंतर पहिलीच भेट
साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर वर्षभराच्या आतच उदयनराजे यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली होती.
 
त्यानंतरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत काय झालं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. या पोटनिवडणुकीनंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची जाहीर भेट झाली.
 
या पोटनिवडणुकी आधी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांचे विचार संकुचित असल्याचं म्हटलं होतं.
 
त्यानंतरही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
 
सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असून हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्यात आलंय.
 
साताऱ्यात उदनराजे यांनी १८ सप्टेंबरला माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ते का वंचित राहतील, असा सवाल करत त्यांनी मराठा आरक्षण मुद्यावर राजीनामा देण्याचंही वक्तव्य केलं होतं. पण त्यानंतर मात्र त्यांनी कोणतीही भूमिका मांडलेली नाही.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती