टायफून लिंगलिंग आणि फक्साई: दोन देश, दोन वादळं, शेकडो घरांची नासधूस नि लाखो लोक अंधारात
सोमवार, 9 सप्टेंबर 2019 (16:57 IST)
हरिकेन डोरियनने बहामामध्ये उडवलेला हाहाःकार जगासमोर येत असतानाच आणखी दोन वादळांनी दोन शेजारी देशांमध्ये वाताहत करायला सुरुवात केलीय. सध्या लाखो लोक अंधारात अडकले आहेत.
टायफून लिंगलिंगने (Typhoon Lingling) दक्षिण कोरियात तीन तर उत्तर कोरियात पाच जणांचा जणांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत या वादळामुळे 460 घरांचं नुकसान झालंय. आणि हजारो घरांचा वीज पुरवठा खंडित झालाय. याच वादळामुळे दक्षिण कोरियातली दीड लाखापेक्षा जास्त घरं अंधारात होती.
तर दुसरीकडे शेजारच्या जपानची राजधानी टोकियोजवळ टायफून फक्साई (Typhoon Faxai) हे चक्रीवादळ धडकलं असून यामुळे तब्बल 9 लाख लोक अंधारात आहेत.
या लिंगलिंग वादळामुळे 178 मैलांवरील शेतीमध्ये पाणी भरलंय. यामुळे गेल्या काही काळापासून उत्तर कोरियामध्ये असलेल्या अन्नधान्याचा तुटवडा आता आणखी भीषण होण्याची भीती आहे.
उत्तर कोरियातल्या 1 कोटी लोकांना 'तातडीने अन्नधान्याची मदत' मिळणं गरजेचं आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्राने दिला होता.
लिंगलिंग वादळ येत असल्याचं माहीत असूनही पुरेशी पूर्वतयारी न केल्याबद्दल उत्तर कोरियाचे नेते किम जाँग-उन यांनी तातडीची बैठक घेत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.
शेती आणि पिकं, धरणं आणि तलाव वाचवणं हे आता उत्तर कोरियाचं प्राथमिक उद्दिष्टं आहे.
दक्षिण कोरियातही याच लिंगलिंग वादळामुळे नुकसान झालंय. इथली सुमारे 1.60 लाख घरं अंधारात होती पण आता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला असून विमानसेवाही सुरू झालीय.
जपानला गेल्या दशकभरातल्या सर्वात शक्तिशाली फक्सई वादळाचा तडाखा बसलाय. ताशी 210 किलोमीटर्सच्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे टोकियोमध्ये दाणादाण उडाली.
130 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द करावी लागली तर ट्रेन सेवाही अनेक तास बंद होत्या.
वीज पुरवठा खंडीत करण्यात आल्याने टोकियो परिसरातले 9.1 लाख लोक अंधारात असल्याचं जपानची राष्ट्रीय वाहिनी NHKने सोमवारी सकाळी म्हटलंय.
आख्ख्या कानागावा शहराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना इथे देण्यात आल्या आहेत.
जपानमध्ये 20 सप्टेंबरपासून रग्बी वर्ल्ड कप सुरू होणार आहे आणि त्यासाठी 4 लाखांपेक्षा जास्त पर्यटक देशात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनेही जपानमध्ये पर्यायी उपाययोजना करण्यात येत आहेत.
टायफून फक्सई आता पॅसिफिक समुद्राच्या दिशेने गेलं असलं तरी अजूनही भूस्खलनाचा आणि पुराचा धोका आहे.