नितीन देशमुख एकनाथ शिंदेंच्या कँपातून असे पळून आले

बुधवार, 22 जून 2022 (16:42 IST)
एकनाथ शिंदे सध्या गुवाहाटीत आहेत 40 आमदारांचा पाठिंबा आहे असं ते सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून सांगत आहेत. हे सगळं होत असताना त्यांच्या गोटातून एक आमदार नागपूर विमानतळावर अवतरला, नितीन देशमुख. एकनाथ शिंदेंचं बंड सुरू झाल्यापासून नितीन देशमुख चर्चेत आले आहेत.
 
त्यांना मारहाण केल्याचा आरोप शिंदेंवर झाला. त्यातच ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने नोंदवली आणि आता ते खुद्द नागपूर विमानतळावर आले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंना पाठिंबा जाहीर केला आणि आपलं अपहरण केल्याचा आरोप त्यांनी केला.
 
"हे सगळं नाट्य चालू असताना मी एका माणसाकडून लिफ्ट घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शंभरेक पोलिसांनी मला उचललं आणि एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मला हार्टअटॅक आल्याचं भासवलं आणि माझ्या शरीरावर काही प्रकिया करण्याचा प्रयत्न केला. मला काहीही झालेलं नव्हतं," असं ते म्हणाले.
 
नितीन देशमुख यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांच्या पत्नीने पोलिसात ते बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती.
 
देशमुखांनी सांगितला घटनाक्रम
नागपुरात दाखल झाल्यावर नितीन देशमुखांनी सगळा घटनाक्रम सांगितला.
 
ते म्हणाले, "मला हार्टअॅटॅक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला रुग्णालयात नेल्यानंतर 20 ते 25 जणांनी मला पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले गेले. ते इंजेक्शन काय होतं माहिती नाही. माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचे षडयंत्र रचले होते. मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी मंत्र्यांसोबत गेलो होतो, पण मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आता मी माझ्या घरी जात आहे."
 
"मी रात्री 12 वाजता हॉटेलमधून निघालो. रस्त्यावर तीन वाजता उभा होता. पण माझ्यापाठी 200 पोलीस होते. कोणतेही वाहन मला लिफ्ट देत नव्हते. त्यानंतर पोलीस मला रुग्णालयात घेऊन गेले आणि मला हार्टअॅटक असल्याचा बनाव रचला," असे नितीन देशमुख यांनी सांगितलं.
 
"एकनाथ शिंदे आमचे मंत्री होते, पण मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. अटॅकचं कारण सांगून मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं असल्याचं नितीन देशमुख म्हणाले.
 
नितीन देशमुख यांच्या अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना गंभीर अवस्थेत सूरत येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मंगळवारी दुपारी आली होती.
 
मात्र, नितीन देशमुखांना सूरतच्या हॉटेलमधून निघत असताना बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला होता.
 
"मुंबईतून त्यांचं अपहरण केलं गेलं. सोमवारी रात्री त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गुजरात पोलिसांनी आणि गुंडांनी बेदम मारहाण केली. मुंबईतील गुंड देखील तेथे आहेत," असं सांगत गुजरातच्या भूमीवर हिंसा कशी? असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
 
देशमुख हे सोमवारी रात्रीपासून नॉट रिचेबल होते, ते एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. देशमुख यांचे भाजपच्याही काही नेत्यांशी चांगले संबंध आहेत.
 
मागील विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना विधान परिषदेत पराभूत करण्यासाठी आमदार देशमुख यांनी भाजपला मदत केली, असा आरोप शिवसेनेच्याच पदाधिकाऱ्यांनी केला होता.
 
बाळापूर मतदारसंघ
नितीन देशमुख हे बाळापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या हरिभाऊ पुंडकर यांचा पराभव केला होता.
 
नितीन देशमुख यांचं मुळ गाव चिन्नी आहे. तिथून त्यांचा सरपंच म्हणून राजकीय प्रवास सुरू झाला. ते पांतुर पंचायत समितीचे उपसभापती झाले. त्यानंतर तीन वेळा ते जिल्हा परिषदेचे सदस्यही होते. शिवसेनेने तिकीट न दिल्यामुळे अपक्ष म्हणून ते निवडून आले. जिल्हा परिषदेत कृषी सभापती झाले.
 
2009 मध्ये त्यांनी जन सुराज्य पक्षातर्फे विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांना 22 ते 23 हजार मतं पडली.
 
2017 मध्ये ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले. 2019 मध्ये त्यांना शिवसेनेतर्फे निवडून आले आणि आमदार झाले.
 
स्थानिक पत्रकारांच्या मते ते अरविंद सावंतांचे समर्थक समजले जातात. गेल्या चार पाच महिन्यांपासून त्यांनी एकनाथ शिंदेची साथ देण्यास सुरुवात केली.
 
2016 मध्ये जिल्हाप्रमुख झाल्यावर त्यांची ताकद वाढली. तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेत अनेक माणसं निवडून आणली. पक्षाची ताकद तिथे वाढवली त्यामुळे जिल्ह्यावर त्यांची पकड आहे.
 
तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बाचाबाची
नितीन देशमुख यांचं प्रशासकीय अधिकाऱ्यांशी फारसं जमत नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी प्रभारी तहसीलदार योगेश कौटकर यांना शिवीगाळ केली होती.
 
योगेश कौटकर यांनी 15 जानेवारीला गोपाल वडतकर यांच्या वाळूच्या गाडीवर कारवाई केल्यावर नितीन देशमुखांनी फोन करून ही कारवाई चुकीची असल्याचं सांगितलं. तुमच्या कामावर मी नाराज आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. अशी फाल्तू कामं करत जाऊ नका, अशी धमकी त्यांनी दिली.
 
स्थानिक पत्रकारांच्या मते अनेकदा ते भाजपची साथ देतात म्हणून त्यांच्याविरोधात शिवसेना पक्ष प्रमुखांकडे तक्रारी झाल्या आहेत.
 
आज घडलेल्या नाट्याबद्दल मात्र तिथल्या लोकांनी बोलणं टाळलं. नितीन देशमुख लवकरच अकोल्यात पत्रकार परिषद घेणार आहेत. तेव्हा या दोन दिवसात नक्की काय झालं याचं चित्र स्पष्ट होईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती