काश्मीर कलम 370 : इम्रान खान म्हणतात, 'आता भारताशी चर्चा करण्यात काही अर्थ नाही'
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019 (15:35 IST)
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी म्हटलंय की आता काश्मीरबाबत भारताशी चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही.
अण्वस्त्रधारी असलेल्या या दोन्ही देशांमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावरून लष्करी संघर्षाचा धोका असल्याचंही म्हटलंय. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी म्हटलं की त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला, पण त्यांनी प्रत्येक वेळेस नकार दिला.
इम्रान खान यांनी मुलाखतीत म्हटलं आहे की, "आता चर्चा करण्यात काही अर्थ नाही. मी चर्चेसाठी खूप प्रयत्न केले. दुर्दैवाची बाब म्हणजे जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा असे वाटतं की त्यांनी या प्रयत्नांकडे मनधरणी म्हणून पाहिले. मी यापेक्षा जास्त काही करू शकत नाही."
इम्रान खान भारत प्रशासित काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यावरून भारत सरकारला वारंवार लक्ष्य करत आहेत. काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर भारताने काश्मीर खोऱ्यात मोठ्या संख्येनं सुरक्षा दलं तैनात केली आहेत.
पाकिस्तान हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांकडे घेऊन गेला आहे तर भारतात विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे.
भारताची प्रतिक्रिया
भारत सरकारचं म्हणणं आहे की काश्मीरमध्ये हळूहळू परिस्थिती सुरळीत होत जाईल. इम्रान खान यांच्या न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना संयुक्त राष्ट्रातीला भारताचे राजदूर हर्षवर्धन श्रृंगला यांनी म्हटलंय की हे सर्व आरोप निराधार आहेत.
हर्षवर्धन श्रृंगला म्हणाले, "आमचा अनुभव आहे की जेव्हा केव्हाही आम्ही चर्चेसाठी उतरलो आहोत तेव्हा त्याचे परिणाम खूप वाईट झाले आहेत.
आम्ही पाकिस्तानकडून अपेक्षा करतो की त्यांनी दहशतवादावर ठोस, विश्वासार्ह आणि निर्णायक कारवाई करावी. काश्मीरमधील परिस्थिती हळूहळू सुरळीत होईल पण हे तेथील प्रत्यक्ष परिस्थितीवर अवलंबून आहे."
भारतीय राजदूतांनी म्हटलंय की आवश्यक सेवा-सुविधा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. बँक आणि रुग्णालयांची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.
हर्षवर्धन श्रृंगला यांनी न्यूयॉर्क टाइम्सला माहिती दिली की सुरक्षेच्या कारणावरून दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही.
काश्मीरचे बहुतेक नेते अजूनही नजरकैदेत आहेत. इम्रान खान यांनी मोदी सरकारची तुलना हिटलरच्या नाझी जर्मनीशी केली आहे. इम्रान खान यांनी आरोप केला आहे की, भारत सरकार काश्मीरमध्ये वंशसंहार करू शकते.
इम्रान खान या मुद्द्यावरून भारतातील मुस्लीम समुदायाबाबतही प्रतिक्रिया देत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की मोदी सरकार भारतातील मुस्लिमांबाबत भेदभाव करत आहे.
भारताचं म्हणणं आहे की काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे आणि याबाबत जर चर्चा करायची असेल तर ती केवळ द्विपक्षीय चर्चा असेल. यामध्ये कोणताही तिसरा घटक सहभागी होणार नाही.
भारत, पाकिस्तान आणि अमेरिका
तर पाकिस्तान मात्र हा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही याप्रकरणात मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली आहे.
भारतानं काश्मीरचा विशेष दर्जा काढण्याच्या निर्णयाला आपला अंतर्गत मुद्दा असल्याचं म्हटलं असून काश्मीरमधील सुरक्षा दलांना तैनात करण्यामागे खबरदारीचा हेतू असल्याचं स्पष्ट केलं आहे. या मुद्द्यावरून पाकिस्तानी मीडियात पंतप्रधान मोदींवर फॅसिस्ट असल्याची टीका केली जात आहे.
इम्रान खान यांनी मुलाखतीत म्हटलं की, "सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे 80 लाख लोकांवर धोक्याचं सावट आहे. आम्हाला भीती ही आहे की तिथं वंशसंहार घडवला जाऊ शकतो आणि धर्माच्या आधारावर हत्या होऊ शकतात." नुकतंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी म्हटलं होतं की काश्मीरमधील परिस्थिती स्फोटक आहे.
गेल्या महिन्यात इम्रान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते आणि ट्रंप यांनी म्हटलं होतं की पाकिस्तानच्या सुरक्षेसंबंधी मदतीत कपात केल्यानंतर पाकिस्तानशी संबंध सुरळीत झाले आहेत.
दोन्ही नेत्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रंप म्हणाले होते की ते काश्मीरबाबत मध्यस्थी करायला तयार आहेत.
काश्मीरमध्ये भारत एखादी मोठी लष्करी कारवाई करू शकतो अशी शक्यता इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी म्हटलंय, "भारत असे करून पाकिस्तानमध्येही कारवाई करणे योग्य ठरवू शकतो. अशावेळी आम्हालाही प्रत्युत्तर द्यावे लागेल. तुम्ही याचा अंदाज लावू शकता की दोन आण्विक शक्ती परस्परांच्या समोरात उभ्या ठाकल्या तर काय होऊ शकते. संपूर्ण जगाने याबाबत सतर्क होण्याची गरज आहे."
भारताचे आत्तापर्यंतचे धोरण राहिले आहे की भारत अण्वस्त्रांचा वापर स्वत:हून पहिल्यांदा करणार नाही.
मात्र गेल्या शुक्रवारी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं होतं की "भारताचे धोरण आहे की अण्वस्त्रांचा पहिल्यांदा वापर करणार नाही. पण भविष्यात काय घडू शकतं त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून राहील."