वर्ल्ड कप 2019 : टीम इंडियाचं सेमी फायनल स्थान पक्कं; बांगलादेशवर 28 धावांनी विजय

बांगलादेशला 28 धावांनी नमवत टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली. रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने 314 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशने 286 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने 4 तर हार्दिक पंड्याने 3 विकेट्स घेतल्या.
 
बांगलादेशचा आधारस्तंभ शकीबला हार्दिक पंड्याला बाद केलं. त्याने 74 चेंडूत 66 धावांची खेळी केली. शकीब बाद झाल्यानंतर मोहम्मद सैफुद्दीन आणि सब्बीर रहमान यांनी वेगवान खेळ करत बांगलादेशच्या आशा पल्लवित केल्या मात्र बुमराहने त्यांचं स्वप्न धुळीस मिळवलं.
 
तमीमने 22 तर सौम्याने 33 धावांची खेळी केली. शमीने तमीमला त्रिफळाचीत केलं तर हार्दिकने पहिल्याच चेंडूवर सौम्याला माघारी धाडलं. युझवेंद्र चहलने मुशफकीर रहीमला आऊट केलं. त्याने 24 धावांची खेळी केली. हार्दिक पंड्याने लिट्टन दासला बाद केलं. दिनेश कार्तिकने त्याचा झेल टिपला.
 
हिटमॅन रोहित शर्माने शकीब अल हसनच्या गोलंदाजीवर एकेरी धाव घेत यंदाच्या वर्ल्ड कपमधल्या चौथ्या शतकी खेळीची नोंद केली. या शतकी खेळीसह रोहित यंदाच्या वर्ल्ड कपमधला सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मात्र रोहितच्या शतकानंतरही टीम इंडियाला 314 धावांचीच मजल मारता आली. बांगलादेशतर्फे मुस्ताफिझूर रहमानने 5 विकेट्स घेतल्या.
 
रोहितने दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, इंग्लंड आणि आता बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी साकारली आहे. एकाच वर्ल्डकपमध्ये 4 शतकी खेळी साकारणारा रोहित हा श्रीलंकेच्या कुमार संगकारा नंतरचा केवळ दुसरा खेळाडू आहे. रोहितच्या नावावर वनडेत तीन द्विशतकं आहे.
 
रोहितच्या करिअरमधलं हे 26वं शतक आहे.
 
मात्र शतकानंतर लगेचच रोहित बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर लोकेश राहुल 77 धावांवर बाद झाला. त्याने 6 चौकार आणि एका षटकारासह ही खेळी सजवली.
 
मुस्ताफिझूर रहमानने एका ओव्हरमध्ये विराट कोहली आणि हार्दिक पंड्या या धोकादायक फलंदाजांना बाद केलं. कोहलीने 26 धावा केल्या. हार्दिकला भोपळाही फोडता आला नाही. मुस्ताफिझूरने ही विकेट मेडन टाकत भारतावरचं दडपण वाढवलं.
 
शकीबने ऋषभ पंतला बाद केलं. त्याने 48 धावा केल्या. त्याने 6 चौकार आणि एक षटकार लगावला.
 
धोनीने 33 चेंडूत 35 धावांची खेळी केली. मुस्ताफिझूरने 59 धावांत 5 विकेट्स घेतल्या.
 
भारताने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने या सामन्यासाठी भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिक यांना संधी दिली.
 
रोहित शर्माला नऊवर जीवदान मिळालं. या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवत रोहितने वर्ल्ड कपमधील आणखी एका अर्धशतकाची नोंद केली.
 
वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन मॅचेस झाल्या होत्या. टीम इंडियाचं पारडं 2-1 असं जड होतं. 2007 मध्ये प्राथमिक फेरीत बांगलादेशने भारताला हरवण्याची किमया केली होती. मात्र त्यानंतर 2011 आणि 2015 मध्ये झालेल्या मॅचेसमध्ये भारतीय संघाने विजय मिळवला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती