सुजात प्रकाश आंबेडकर: सोलापूर लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी ज्यांच्या भरवशावर लढवतेय...
गुरूवार, 4 एप्रिल 2019 (14:10 IST)
"वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन होईल आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होईल, असा आरोप करणारे गुजरातमध्ये काँग्रेसविरोधात 26 जागांवर निवडणूक कशी लढवतात?" असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी केला आहे.
सुजात सध्या सोलापुरात प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. राज्यातील तरुण कार्यकर्त्यांचं नेटवर्कही ते हाताळत आहेत.
सोलापुरातच बीबीसी मराठीशी बोलताना सुजात काँग्रेसच्या आणि बिहारमधील महागठबंधनच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. "बेगुसरायमध्ये कन्हैयाकुमार याच्याविरोधात राष्ट्रीय जनता दल किंवा काँग्रेसनं उमेदवार देणं म्हणजे मतविभाजन करणं नव्हे काय? केरळमध्ये जिथं डावे मजबूत आहेत, तिथं राहुल गांधी वायनाडमधून लढताहेत. मग तेही मतविभाजन नव्हे काय?" असं म्हणत सुजात वंचित बहुजन आघाडीच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचं समर्थन करतात.
"गेल्या 70 वर्षामध्ये दलित, मुस्लीम, बहुजनांच्या अधिकारांसाठी, हक्कांसाठी तत्कालीन सरकारांनी योग्य प्रयत्न केले नाहीत. आज वंचित आघाडीला मिळणारा भरघोस पाठिंबा, हे त्याचंच द्योतक" असल्याचं सुजात यांना वाटतं.
सुजात आंबेडकर अवघ्या 24 वर्षांचे. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी राज्यशास्त्रात पदवी घेतल्यानंतर चेन्नईच्या एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझमधून पत्रकारितेचा डिप्लोमा घेतला. गेली दोन वर्षं त्यांनी अनेक राष्ट्रीय दैनिक आणि वेबसाईट्समध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम केलं.
ते उत्तम ड्रमरसुद्धा आहेत, मात्र निवडणुकीच्या धामधुमीत त्यांना ड्रम वाजविण्यासाठी वेळच मिळालेला नाही. आपण शेवटचा लाईव्ह परफॉर्मन्स वर्षभरापूर्वी केला होता, असं ते सांगतात.
भविष्यात संगीताच्या माध्यमातून त्यांना पॉलिटिकल स्टेटमेंट करणारा बँडही तयार करायचाय. अर्थात, या भविष्यातल्या योजना आहेत. सध्या तरी सुजात यांचं लक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या निवडणूक प्रचारावर आहे.
'आमच्या सभांसाठी गर्दी बोलवावी लागत नाही'
"भाजपकडून वंचित बहुजन आघाडीला लाभ मिळत असल्याच्या ज्या चर्चा माध्यमांमध्ये आहेत त्यात तथ्य नाही. आमच्या सभांना उपस्थित राहण्यासाठी लोकांना पैसे द्यावे लागत नाहीत. एका बिर्याणीत 10-15 लोक जेवतात आणि पक्षाचं काम करतात. लहान मुलं, बायका आपलं सेव्हिंगही बाळासाहेबांना देतात," असं सुजात सांगतात.
"त्यामुळे जे लोक आमच्यावर भाजपची 'बी टीम' असल्याचा आरोप करतात किंवा आम्हाला आर्थिक लाभ होत असल्याचा आरोप करतात, ते या लोकांचा अपमान करत आहेत."
वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अवास्तव जागांची मागणी केल्याचा आरोप होतो. त्याचंही उत्तर देताना सुजात म्हणाले, "आम्ही 12 जागा मागितल्या होत्या. त्याही अशा की ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीने सलग तीनवेळा गमावल्या होत्या. बरं त्यापुढे जाऊन आम्ही वंचित बहुजनच्या लोकांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवण्यासाठी तयार होतो. मग अजून आम्ही काय अॅडजेस्टमेंट करायला हवी होती?"
आठवलेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, रामदास आठवले यांनी दलित गटांचं नेतृत्व करण्याची ऑफर प्रकाश आंबेडकरांपुढे ठेवली होती. मग दलित ऐक्यासाठी, कल्याणासाठी तुम्ही ती ऑफर मान्य का केली नाही, हा प्रश्न विचारला असता सुजात यांनी रामदास आठवले यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं केलं.
सुजात यांनी म्हटलं, "उना, फरीदाबाद आणि भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर आठवलेंना दलित समाजानं भाजपनं दिलेलं मंत्रिपद सोडण्यास सांगितलं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांची भूमिका ही दुतोंडी आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी रामदास आठवले यांचा प्रस्ताव मान्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
सोशल मीडियावरूनही प्रचाराचा जोर
सोशल मीडियावरील वंचित बहुजन आघाडीच्या असलेल्या ताकदीवर सुजात म्हणाले की, "जे तरुण शिकलेले आहेत, ज्यांना बहुजन चळवळीसाठी काम करायचं आहे, पण जे पैशांच्या स्वरूपात मदत करू शकत नाहीत, अशा लोकांनी आपली बौद्धिक ताकद प्रकाश आंबेडकरांच्या मागे उभी केली आहे. वंचित आघाडीचा सोशल मीडिया तेच तरुण हाताळत आहेत."
पण त्यांच्यासाठीही प्रकाश आंबेडकरांनी आचारसंहिता दिली असल्याचं सुजात सांगतात. शिवीगाळ किंवा अर्वाच्य भाषेत बोलू नये, असं आवाहन केलं आहे. त्यामुळे हा सजग तरुण सोशल मीडियावर अॅक्टिव आहे. तो अभ्यासू आहे. आंबेडकर, फुलेंच्या कामाबद्दल त्यांना आत्मीयता आहे. त्यामुळे ते आपली भूमिका सोशल मीडियावर जोरकसपणे मांडत असल्याचं सुजात म्हणाले.
जिग्नेश मेवाणी, चंद्रशेखर रावण यांच्याप्रमाणे सुजात आंबेडकरही पुढच्या काळात अॅक्टिव राजकारणात येणार का? या प्रश्नावर सुजात यांनी, "लोकांची मागणी असेल तर सुजात राजकारणात येईल. पण तोवर लोकांना मदत करण्यासाठी, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यासाठी मी कायम लोकांसोबत आणि चळवळीसोबत असेन," असं म्हटलं आहे.
पण सध्या सुजात यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीमध्ये कोणतंही पद नाहीये. आताच्या घडीला सुजात हे बॅकरूममधून सर्व काम पाहतात. पदाधिकाऱ्यांच्या बैठका, सोशल मीडिया सांभाळणं, दलित आणि मुस्लीम तरुणांना एकत्र बांधून ठेवणं, या जबाबदाऱ्या सुजात यांच्याकडे आहेत.
'पुण्यातल्या गुडलकच्या जेवणाची आठवण'
सुजात यांच्या आई डॉ. अंजली मायदेव यादेखील प्रकाश आंबेडकरांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत आहेत. सर्व कुटुंब निवडणुकीच्या रणधुमाळीत गुंतलेलं असताना एकमेकांसाठी वेळ काढता येतो का, या प्रश्नाचं उत्तर सुजात यांनी नकारार्थी दिलं.
वंचित बहुजन आघाडीची मुंबईला सभा झाली, त्यावेळी आम्ही शेवटचं भेटलो होतो, असं सुजात यांनी सांगितलं.
सोलापुरात राहून निवडणुकीचं काम पाहताना सुजात पुण्यातील कोणती गोष्ट सर्वांत जास्त 'मिस' करतात, असं विचारलं. तेव्हा "गुडलकच्या जेवणाची सर्वांत जास्त आठवण येते," असं त्यांनी सांगितलं. पण सध्या तरी सुजात यांच्यापुढे वंचित बहुजन आघाडीला गुडलक आणण्याचं आव्हान आहे.