श्रद्धा वालकर हत्या प्रकरण: 'आफताब माझी हत्या करुन तुकडे करेल', श्रद्धाने दिली होती तक्रार
बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (16:54 IST)
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नव्या गोष्टी समोर येत आहेत. पोलिसांच्या हाती नवीन माहिती आली आहे. त्यानुसार श्रद्धा वालकरला तिच्या हत्येबाबत संशय होता असं पत्र समोर आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
श्रद्धा वालकरने 2020 च्या नोव्हेंबरमध्ये पालघर जिल्ह्यात पोलिसांकडे तक्रार दिली होती. तिने त्यात म्हटलं होतं की आफताब म्हणतो तो माझी हत्या करेन आणि माझे तुकडे करून फेकून देईल.
पीटीआय वृत्तसंस्थेनी सांगितले की श्रद्धाने तुळिंज पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. त्यात तिने लिहिलं होतं की आफताब मला मारहाण करतो. आज त्याने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याने म्हटले की तुझा खून करुन तुकडे करून फेकून देईल.
तक्रारीत तिने म्हटले होते की गेल्या सहा महिन्यापासून तो मला मारहाण करत आहे. तिने म्हटले की मला पोलिसांकडे येण्याची हिम्मत होत नव्हती म्हणून मी येत नव्हते पण आता हे असह्य होत आहे त्यामुळे मी ही तक्रार देत आहे.
त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडे जाऊन विचारपूस केली होती पण नंतर तिने आपली तक्रार मागे घेतली.
श्रद्धा वालकर हिने 2020 मध्ये लिहिलेल्या पत्रासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "श्रद्धाचे पत्र मी पाहिले. त्या पत्रावर कारवाई का झाली नाही, याचा तपास केला जाईल. या पत्रावर वेळेत कारवाई झाली असती तर कदाचित आज श्रद्धाचे प्राण वाचू शकले असते."
आफताबने दिली हत्येची कबुली
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आफताब पुनावाला यानं कोर्टासमोर हत्येची कबुली दिलीय. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबनं कोर्टासमोर सांगितलं.
बार अँड बेंचच्या माहितीनुसार, दिल्लीतल्या साकेत कोर्टात मंगळवारी (22 नोव्हेंबर) आफताब पुनावालाला व्हीडिओ लिंकद्वारे हजर करण्यात आलं. कोर्टासमोर गुन्ह्याची कबुली देतानाच आफताबनं म्हटलं की, "जे काही मी केलंय, ते चुकून केलंय. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली."
आफताबनं असंही म्हटलं की, "माझ्याविरोधात जी माहिती पसरवली जातेय, ती बरोबर नाहीय. पोलीस चौकशीत पूर्ण सहकार्य मी करतोय. मृतदेहाचे तुकडे कुठे कुठे फेकले, हे मी पोलिसांना सांगितलं."