राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेगागळती : दिग्गज नेते सोडून चालल्यामुळे शरद पवार अस्वस्थ?
"इतर नेते पक्ष सोडतच आहेत, पण तुमचे नातेवाईकही तुम्हाला सोडून चालले आहेत त्याबद्दल काय सांगाल?"
अहमदनगरमधल्या संगमनेर इथं शुक्रवारी (30 ऑगस्ट) झालेल्या पत्रकार परिषदेत न्यूज 18 लोकमतचे पत्रकार हरिष दिमोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना हा प्रश्न विचारला.
या पत्रकाराचा रोख राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे जवळचे नातेवाईक असलेल्या पद्मसिंह पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे होता. हा प्रश्न विचारल्यावर एरवी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देणारे शरद पवार संतापले.
पत्रकार परिषदेतून उठून जाण्यासाठी निघालेल्या शरद पवारांना उपस्थितांनी समजावलं खरं, पण संबंधित पत्रकारानं माफी मागावी असा आग्रह त्यांनी धरला. असे प्रश्न विचारणं हे सभ्यतेला धरून नाही असंही त्यांनी या पत्रकाराला सुनावलं.
पवारांच्या या त्राग्यानंतर अनेक चर्चा सुरू झाल्या. असा प्रश्न विचारणं योग्य होतं का? एवढं संतापण्याएवढं या प्रश्नात काय होतं? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. पण सर्वांत कळीचा प्रश्न होता, की पवार आता हतबल झाले आहेत? भाजपच्या आक्रमक रेट्यापुढे शरद पवार एकाकी पडू लागले आहेत का?
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये सध्या मेगाभरती सुरू आहे. भाजपच्या या आयातीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला तुलनेनं अधिक बसला आहे.
भाजपची मेगाभरती, राष्ट्रवादीमध्ये मेगागळती
माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले, रणजितसिंह मोहिते-पाटील, धनंजय महाडिक, राणा जगजितसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून भाजपत गेलेल्या नेत्यांची यादी वाढतच आहे. विजयसिंह मोहिते पाटील आणि पद्मसिंह पाटील यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला नसला तरी राष्ट्रवादीकडे त्यांनी पाठ फिरवली आहे.
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये वेटिंग लिस्टवर असलेल्यांची संख्याही इतकी मोठी आहे, की भाजपने आपली दारे पूर्णपणे उघडली तर शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुणीच शिल्लक राहणार नाही, असा टोला भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी लगावला.
यातील अनेक जण पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत होते. आघाडी सरकारमध्ये यातील अनेक जणांनी मंत्रिपदं किंवा महत्त्वाची पदं उपभोगली होती. मात्र भाजप लाटेत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधक धडपडत असताना पडत्या काळात या नेत्यांनी भाजपमध्ये जाणं पसंत केल्यानं शरद पवारांची चिडचीड होतीये का?
सगळा दोष पवारांचा कसा?
महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे यांनी शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील संतापाबद्दल एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. पवारांच्या कृतीचे समर्थन करता येणार नाही. पण सगळा दोष पवारांच्या माथी मारून पत्रकारांना नामानिराळे राहता येणार नाही, असं चोरमारे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पवार पत्रकारांवर चिडल्याची उदाहरणं यापूर्वीही पहायला मिळाल्याचं सांगून त्यांनी यासंबंधीचे काही प्रसंगही लिहिले आहेत. त्यातील एका प्रसंगाबद्दल त्यांनी लिहिलं आहे, की 2004 च्या निवडणुकीवेळी कोल्हापुरात त्यांची पत्रकारपरिषद होती.
एक ज्येष्ठ पत्रकार त्यांना तालुका पातळीवरील दोन नेत्यांच्या मुलांच्या राजकीय हालचालींच्या संदर्भाने विचारत होते. पवारांनी त्याबाबत एक, दोन, तीन प्रश्नांची उत्तरे शांतपणे दिली. संबंधित पत्रकार तोच प्रश्न पुढे चालवू लागला तेव्हा पवार भडकले, "तुम्हाला काही कॉमन सेन्स आहे का? तुम्ही तेच तेच काय विचारता? चाळीस वर्षे संसदीय कारकीर्द असलेल्या नेत्याला गावपातळीवरचे किती विचारता? ते ठाकरेंच्या पोरांना विचारता ते मला विचारता का? असं खूप काही बोलले." आमच्या पत्रकार मित्रानं आगळीक केली होती त्यामुळं पवारांचं ऐकून घेण्यावाचून पर्याय नव्हता. हा एक माझ्या समक्ष घडलेला प्रकार.
"श्रीरामपूरमध्ये नातेवाईकांचा संदर्भ आल्यामुळे ते भडकले. पवारांना शांतपणे त्या प्रश्नाचे उत्तर देता आले असते. आणि पवार रागावल्यानंतर तिथं शांतता असायला हवी होती. परंतु त्यानंतरही संबंधित पत्रकार 'नातेवाईक' हा शब्द उच्चारून काही बोलण्याचा प्रयत्न करीत होता, हे उद्धटपणाचे होते. पवारांसारख्या नेत्याच्या सभ्यपणाचा गैरफायदा घेण्यासारखे होते," असं चोरमारे यांनी म्हटलं आहे.
चोरमारे यांनी लिहिलंय, की शरद पवार पत्रकारांना सहज उपलब्ध असतात. नातवाच्या वयाच्या पोरसवदा पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचेही उत्तर देत असतात. त्यांच्या आवडीच्या विषयांनी खुलवत नेले की पुढे कितीही अवघड, नाजूक प्रश्नांचीही मोकळेपणाने उत्तरे देत असतात. परंतु कुणी सुरुवातच वाकड्यात जाऊन केली तर त्यांचे बिनसते आणि मग ते खुलत नाहीत.
एरवी शरद पवार सगळ्या प्रश्नांची नीट तपशीलवार उत्तरे देतात. कुणी आगाऊपणा केला तर मात्र सटकतात. अर्थात अलीकडे आजारपणानंतर झालेला हा बदल आहे, हेही लक्षात घ्यायला पाहिजे असल्याचंही चोरमारे यांनी नमूद केलं आहे.
पवारांना प्रश्न विचारण्यात गैर काय?
शरद पवारांना विचारण्यात आलेला प्रश्न आणि त्यावरील त्यांची प्रतिक्रिया याची दुसरी बाजू टीव्ही 9 वृत्तवाहिनीत कार्यकारी संपादक असलेले माणिक मुंढे यांनी मांडली आहे.
त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे, की पवारांचा कालचा व्हिडीओ पूर्ण बघितला. मला ना हरिषचा प्रश्न चुकीचा वाटला ना त्यांची पद्धत. खरं तर एवढ्या सामान्य प्रश्नावर पवार ज्या पद्धतीनं रिअॅक्ट झाले ते पाहून आश्चर्य वाटलं. नातेवाईकावर प्रश्न विचारणं एवढंच चूक असेल तर मग राजकारणातले नातेवाईक करता कशाला किंवा नातेवाईकांनाच सगळी पदं देता कशाला?
शरद पवार, पवारांची मुलगी सुप्रिया, सुप्रियाचे चुलतभाऊ अजित पवार, अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार, त्याचा चुलतभाऊ रोहित पवार, त्याची चुलती सुनेत्रा पवार, अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, सुनेत्रांचे भाऊ पद्मसिंह पाटील, त्यांचा मुलगा राणा जगजितसिंह पाटील असा गोतावळा राजकारणात आणि एकमेकांच्या नात्यागोत्यात आहे.
एक एक धागा शोधत गेलं तर अख्ख्या महाराष्ट्रावर यातल्याच काही मोजक्या टोळक्याची आलटून पालटून सत्ता असल्याचं वास्तव दिसून येईल. म्हणजे सत्तेचे सगळे सवते सुभे तुम्ही उभे करणार आणि त्यावर कुणी सवाल केला तर थयथयाटही करणार? असा प्रश्न माणिक यांनी उपस्थित केला आहे.
पवारांचा आदर ठेवायला हवा. ते एक सुसंस्कृत नेते आहेत. पण म्हणजे पवारांना प्रश्नच विचारायचा नाही किंवा मग त्यांना हवं तसे प्रश्न विचारणं असा त्याचा अर्थ होत नाही, असं माणिक मुंढे यांनी म्हटलं आहे.
माणिक मुंढे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये पवारांनी केलेल्या काही वक्तव्यांचाही दाखला दिला.
पवारांनी ज्यावेळेस राजू शेट्टींची भरसभेत जात काढली त्यावेळेस त्यांचा सुसंस्कृतपणा कुठे गेला होता? एवढे सगळे लोक त्या भाजपात गेले तर पवार कुणावरही एका शब्दानं नाही बोलले पण त्यांना नेमकं चित्रा वाघांवरच कसं बोलावं वाटलं? तेही त्यांच्या टिपिकल बारीक पण कान कापणाऱ्या स्टाईलनं? पवार हे अतिशय धूर्त आणि चाणाक्ष राजकारणी आहेत असं त्यांच्याबद्दल लिहिलं सांगितलं जातं. खरं तर पवार जे काही करतात तसं इतर कुणी केलं की त्याला कपटीच म्हटलं जातं पण इथं पवारांच्या सोयीचं बोलण्याची पद्धत आहे म्हणून ते धूर्त, चाणाक्ष एवढंच, असाही टोला माणिक मुंढे यांनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे.
शरद पवारांची अस्वस्थता नेमकी काय?
सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे आलेली अस्वस्थता पवारांच्या रागाचं कारण आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी म्हटलं, की आपले जवळचे सहकारी सोडून जात असताना अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे. पण चिडणं हा पवारांचा स्वभाव नाहीये. पत्रकारांनी यापूर्वीही अनेकदा त्यांना अवघड प्रश्न विचारले आहेत. पण ते असे चिडले नव्हते. तीन तीन वेळा नातेवाईकांचा उल्लेख करत प्रश्न विचारल्यानं ते संतापले असतील.
पवार खरंतर नेहमीच संयमानं माध्यमांना सामोरे जातात. नातेवाईकांवर विचारलेल्या प्रश्नावर शरद पवारांना संताप आला हे खरं आहे. पण पत्रकारानंही त्यांना प्रश्न विचारताना काही मर्यादा पाळायला हव्या होत्या. सतत नातेवाईकांचा उल्लेख केल्यानं पवार चिडले. त्यांचं वय, सोडून चालेले सहकारी कुठेतरी याचाही हा परिणाम असू शकतो, असं मत ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी व्यक्त केलं.
जो vulnerable आहे, सध्याच्या परिस्थितीत कमकुवत आहे, त्याला तुम्ही आक्रमकपणे प्रश्न विचारता. पण अशाच पद्धतीनं सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले जातात का किंवा विचारल्यावर कशा प्रकारची उत्तरं त्यांना मिळतात, याचा विचार पत्रकारांनीही करायला हवा, असंही सुनील चावके यांनी म्हटलं.
चावके यांनी सांगितलं, की सध्याच्या राजकीय परिस्थितीत शरद पवारांनी डॉ. मनमोहन सिंह यांचा कित्ता गिरवावा. त्यांनी कमी बोलावं आणि नेमक्या वेळी बोलावं जेणेकरून त्याची दखल अधिक गांभीर्यानं घेतली जाईल. निवडणुकीचं राजकारण, स्ट्रॅटेजी हे करत राहिलंच पाहिजे. पण त्यांच्या या राजकीय रणनीतीची प्रचिती येत नाही, तोपर्यंत मीडिया पवारांना लक्ष्य करणार हे वास्तव त्यांनी स्वीकारणं गरजेचं आहे.