सांगली जुगाड जीप : 'आनंद महिंद्रा साहेब, आम्ही आभारी आहोत, पण ही जीप हीच माझी लक्ष्मी आहे...'

शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (17:38 IST)
सरफराज मुसा सनदी
दत्तात्रय लोहार यांची जीप किक मारली की सुरू होते. त्यांनी काही महिन्यांपूर्वी ही जीप तयार केली, तेव्हा त्यांना वाटलंही नव्हतं की. याची चर्चा गावभरच नव्हे, तर अख्ख्या देशात होईल.
 
'जुगाड जीप'ला किक मारतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर अनेकांनी पाहिला.
 
तसा नेहमीच अशा जुगाड तंत्रज्ञानावर लक्ष असणाऱ्या महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांच्या पाहण्यात आला. त्यांनी 21 डिसेंबरला आपल्या ट्विटर हँडलवरुन हा व्हीडिओ शेअरही केला. आणि दुसऱ्या दिवशी नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर दत्तात्रय यांना एक नवी कोरी बोलेरो जीप ऑफर केली आहे.
 
तेव्हापासून दत्तात्रय यांची ही 'जुगाड जीप' पाहायला देवराष्ट्रे गावात अनेकजण भेट देतायत. बीबीसी मराठीने प्रत्यक्ष गावात जाऊन या 'जुगाड मॅन'ची भेट घेतली.
 
'ही जुगाड जीप प्रेरणा देईल'
आनंद महिंद्रा आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये म्हणतात- "स्पष्टपणे हे कोणत्याच नियमात बसत नाही. पण जिद्द, कल्पकता आणि 'स्वस्तात जास्त' देण्याची क्षमता असणाऱ्या व्यक्तीचं कौतुक करणं मी कधीच थांबवणार नाही. फ्रंट ग्रीलविषयी बोलायला नको."
 
व्हीडिओत दिसत असणारं फ्रंट ग्रील महिंद्रा अँण्ड महिंद्राच्या जीप मॉडेलसारखं आहे.
 
त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 डिसेंबरला आनंद यांनी दत्तात्रय यांना उद्देशून आणखी एक ट्वीट केलं. "नियमांचा भंग होतो म्हणून स्थानिक यंत्रणा त्यांना या गाडीचा वापर थांबवायला सांगतील. त्या बदल्यात मी स्वतः त्यांना बोलेरो जीप ऑफर करतोय.
 
'रिसोर्सफूलनेस' म्हणजेच कमी साधनांमध्ये अधिक निर्मिती करणं. आणि म्हणूनच आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची निर्मिती असलेली गाडी 'महिंद्रा रिसर्च व्हॅली'मध्ये ठेवण्यात येईल."
 
भारत हा 'जुगाड चॅम्पियन'चा देश असल्याचा आनंद महिंद्रा यांना अभिमान आहे. ते अनेकदा अशा जुगाड प्रयोगांना जाहीरपणे प्रोत्साहन देत असतात.
 
घरातल्या लक्ष्मीला कसं देऊ?
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात देवराष्ट्रे हे गाव आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं हे गाव. यशवंतरावांच्या गावचे रहिवासी असल्याचा दत्तात्रय यांना अभिमान आहे.
 
आम्ही त्यांना आनंद महिंद्रांच्या बोलेरोच्या ऑफरविषयी विचारलं.
 
पण महिंद्रा यांची ऑफर स्वीकारायची की नाही या संभ्रमात दत्तात्रय आणि त्यांचं कुटुंब आहे.
 
दत्तात्रय म्हणतात, "त्यांना माझी गाडी आवडली याचा मला आनंद आहे. पण ती नवी गाडी वापरण्याची माझी परिस्थिती नाही. कारण त्यासाठीचा कर, इंधन भरण्याची माझी ऐपत नाहीये."
 
दत्तात्रय यांच्या पत्नी राणी यांचाही या गाडीवर खूप जीव आहे. त्यांनी तर स्पष्टच म्हटलं की, ही आमच्या घरातली पहिली लक्ष्मी असल्याने ती द्यावीशी वाटत नाही. ती आल्यापासून आमचं आयुष्य नीट सुरू आहे. हवंतर त्यांच्यासाठी आम्ही दुसरी बनवून देऊ. तरीही त्यांनी नवी गाडी खुशीने दिली तर देऊ. पण या गाडीच्या बदल्यात नाही."
 
दुचाकीचं इंजिन आणि रिक्षाचे टायर्स
या जुगाड जीपची गोष्ट खूप रंजक आहे.
 
दत्तात्रय यांचा जन्म लोहार कुटुंबात झाला. घरात परंपरागत कौशल्य होतं आणि जोडीला भन्नाट आयडिया होत्या,.दत्तात्रय यांनी फॅब्रिकेशनचं वर्कशॉप टाकलं. याआधी याच छोटेखानी वर्कशॉपमध्ये त्यांनी शेतातल्या मशागतीसाठी भांगलण तसंच पवनचक्की ही यंत्रं बनवली आहेत.
 
वर्कशॉपमध्ये भंगारातल्या दुचाकीचं इंजिन घेतलं, त्याला रिक्षाची चाकं आणि जीपचं बोनेट लावलं. अशाच आणखी साठवलेल्या स्पेअरपार्टमधून त्यांनी तीन वर्षांमध्ये स्वतःची अशी खास चारचाकी गाडी बनवली.
 
ही जुगाड जीप जेव्हा रस्त्यावरुन जाते तेव्हा आतमध्ये ऐटीत कोण बसलंय हे सगळेचजण पाहतात. सर्वांनाच आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही असं गावकरी सांगतात.
 
जीपला 50 ते 60 हजार रुपये खर्च आला असं ते सांगतात. "मी जी काही कमाई करायचो त्यातून बचत करून मी ही जीप बनवत होतो. माझं गावात एक छोटसं दुकान आहे. खुरपी लावणं, धार काढणं, वेल्डिंग अशी काम करतो. जर 500 रुपये कमवत असेन तर त्यातले 300 रुपये घरखर्चाला द्यायचो. आणि उरलेल्या पैशात जीपसाठी साहित्य आणायचो. घरातले म्हणायचे की यावर कशाला इतका खर्च करता "
 
दत्तात्रय यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी तीन मुली आणि एक मुलगा आहे. "मुली मोठ्या व्हायला लागल्या तशी त्यांनी वडिलांकडे आपल्याला सगळ्यांना बसायला फोर व्हिलर गाडी हवी अशी इच्छा व्यक्त केली. मला माहित होतं गाडी काही मला घेता येणार नाही. म्हणून म्हटलं आपण तयारच करू". आपल्या छोट्याशा कुटुंबाला सामावून घेईल अशी नॅनो जीपला सुरूवात केली.
 
मुलांचा हा बालहट्ट असला तरी दत्तात्र्य यांनी तो मनावर घेतला. आणि ध्येयाने पूर्णही केला.
 
जुगाड जीपचे फिचर्स
गाडीला स्टार्टर नाही, त्यामुळे पायाने किक मारून ही चारचाकी सुरू करावी लागते. विशेष म्हणजे या गाडीचं स्टेअरिंग त्यांनी स्वतःच्या फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये बसवलं आहे.
 
भारतात गाड्यांमध्ये स्टेअरिंग उजव्या बाजूला असतं पण दत्तात्रय यांनी बनवलेल्या गाडीचं स्टेअरिंग डाव्या बाजूला आहे. कारण दत्तात्रय यांचा डावा हात कमजोर आहे. स्वतःला चालवणं सोपं जाईल या दृष्टीने त्यांनी गाडीची रचना केली आहे.
 
या जुगाड जीपचा आकार महिंद्रा जीपपेक्षा लहान आहे. म्हणजे साधारण रिक्षाएवढा. एका वेळी पाच माणसं त्यात बसू शकतात. ही जुगाड जीप असली तरी तिचा वेग पाहिला तर आपण अवाक होऊ. पेट्रोलसाठी 5 लीटरची टाकी बसवण्यात आली आहे. एक लीटर पेट्रोलवर साधारण 40 ते 50 किलोमीटर मायलेज देते. जुगाडू जीप ताशी 40 किलोमीटर वेगाने धावते.
 
जुगाड जीपला रंगरंगोटी करणं बाकी असल्याचं दत्तात्रय सांगतात. पण गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या कुटुंबाच्या आणि लहान-सहान कामांसाठी ते ही गाडी वापरतायत. या गाडीतून त्यांनी पंढरपूर, सांगोला आणि सातारा इथे प्रवास केलाय.
 
दत्तात्रय लोहार यांची ही फेमस जुगाड गाडी पाहाण्यासाठी त्यांना दिवसभरात शेकडो लोकांचे फोन येतायत. गावात येऊन गाडी पाहाण्याची इच्छा व्यक्त करतात. आता दत्तात्रय लोहार आणि राणी लोहार यांना नव्या गाडीपेक्षा आपलं भविष्य सुरक्षित करण्याची गरज वाटतेय. त्यासाठी मदत करावी अशी इच्छा ते व्यक्त करतायत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती