सचिन वाझे प्रकरण : दोषींना पाठीशी घालणार नाही - अजित पवार
मंगळवार, 16 मार्च 2021 (16:41 IST)
दोषींवर कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. सचिन वाझे प्रकरणावर माध्यमांनी अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिलं.
मात्र, यावेळी अजित पवार म्हणाले, चौकशीआधी कुणाला शिक्षा देणं योग्य नाही.
"सचिन वाझे यांना बडतर्फ करण्यात आलंय. जर कुणी अधिकारी चुकीचा वागला, जर तो दोषी आढळला, तर सरकारनं कुणीच पाठीशी घातलं नाही," असं अजित पवार म्हणाले.
तसंच, गृहमंत्र्यांना हटवलं जाणार का, यावर बोलताना अजित पवार म्हणाले, "मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचं हे त्या त्या पक्षाचा प्रमुख ठरवतो. काँग्रेसकडून सोनिया गांधी, राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि शिवसेनेकडून उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेत असतात."
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद नाहीत, असंही यावेळी अजित पवार यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
महाराष्ट्राच्या राजकारणातल्या हालचाली वाढल्या आहेत. सकाळी निवडक मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतल्यानंतर, आता सर्व मंत्र्यांना बैठकीसाठी बोलावलं आहे.मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानीच ही बैठक होणार आहे. या बैठकीत कुठल्या विषयावर चर्चा होणार आहे, हे अद्याप स्पष्ट नाही.
मात्र, या बैठकीत सचिन वाझे यांच्यावर चर्चा होणार का, किंवा सध्या चालू असलेल्या घडामोडींचा विषय चर्चेत असेल का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान आज सकाळीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक झाली. सकाळच्या बैठकीत सचिन वाझे प्रकरणावर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे. मात्र, नेमकी काय चर्चा झाली, हे कळू शकलं नाही.
सकाळच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, अनिल परब हे या बैठकीत उपस्थित होते.
सचिन वाझे कोण आहेत?
महाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत होते.
मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. मुंबईत घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांची गोपनीय माहिती मिळवून, त्या रोखण्याचं काम क्राइम ब्रांचच्या या युनिटकडे आहे.
जून 2020 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंच निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. निलंबन मागे घेतल्याने तब्बल 16 वर्षांनी वाझे यांचा पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत येण्याचा मार्ग खुला झाला.
पोलीस दलात परतल्यानंतर वाझे यांची आयुक्तांनी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुंबई क्राइम ब्रांचमध्ये नियुक्ती केली.
अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामींच्या अटकेमागे वाझेंची महत्त्वपूर्ण भूमिका होती. अर्णब गोस्वामींच्या कथित TRP घोटाळ्याचा तपास सचिन वाझे करत होते. या प्रकरणात बार्कचे माजी प्रमुख पार्थो दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती.
अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांच्या ई-मेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं.
मनसुख यांच्या पत्नीचे सचिन वाझेंवर आरोप
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सरकारने तपास एटीएसला दिला. एटीएसला दिलेल्या जबाबात विमला यांनी सचिन वाझेंवर खळबळजनक आरोप केले.
"सचिव वाझे माझ्या पतीला ओळखत होते. नोव्हेंबर महिन्यात माझ्या पतीने गाडी वाझे यांना वापरण्यासाठी दिली होती. वाझेंनी फेब्रुवारी महिन्यात गाडी परत दिली," असा आरोप विमला यांनी केला.
विमला पुढे म्हणतात, "26 फेब्रुवारीला सचिन वाझेंनी माझ्या पतीला चौकशीसाठी नेलं. संध्याकाळी ते त्यांच्यासोबतच घरी आले. पुढे दोन दिवस माझे पती सचिन वाझेंसोबत जात होते आणि येत होते."'हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर मी चार-साडेचार तासांनी पोहोचलो होतो'- सचिन वाझे
"वाझेंनी माझ्या पतीला या प्रकरणात अटक हो. तुला 2-3 दिवसात जामिनावर बाहेर काढतो," असं माझ्या पतीने मला सांगितल्याचा जबाब एटीएसला दिलाय.
या जबाबात विमला पुढे आरोप करतात, "माझे पती मनसुख यांचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केल्याचा मला संशय आहे."
एटीएसने मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांच्या तक्रारीवर अज्ज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
नेमकं काय घडलं होतं?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत गुरूवारी (25 फेब्रुवारी) स्फोटकं सापडली. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या.
मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो.
स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला.
मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले आहेत.