वनिता खरात : न्यूड फोटोशूट केल्याचं सांगितल्यावर घरचे म्हणाले...

सोमवार, 18 जानेवारी 2021 (11:01 IST)
-प्राजक्ता पोळ
अभिनेत्री वनिता खरात ही तिने केलेल्या न्यूड फोटोशूटमुळे गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत आहे.
 
नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच वनितानं आपल्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आणि त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या.
 
काहीजणांनी वनिताच्या या धाडसाचं कौतुक केलं, तर काही जणांकडून नकारात्मक प्रतिक्रियाही आल्या. पण वनिताचं हे 'बोल्ड' फोटोशूट केवळ प्रसिद्धीसाठी नव्हतं, तर त्यामागे एक विचार होता... कोणताही न्यूनगंड न बाळगता स्वतःला स्वीकारण्याचा. म्हणूनच तिने या फोटोसोबत कॅप्शन लिहिलं होतं की, मला माझ्या प्रतिभेचा, माझ्या आवडीचा, आत्मविश्वासाचा अभिमान आहे. मला माझ्या शरीराचा अभिमान आहे...कारण मी 'मी' आहे.
 
वनिताचा हाच विचार जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं तिच्याशी संवाद साधला.
 
न्यूड याकडे अश्लीलता म्हणून का पाहता, मला त्यात काहीच अश्लील दिसलं नाही. त्या फोटोकडे एक उत्तम कलाकृती म्हणून पाहावंसं वाटतं, असं वनितानं मुलाखतीच्या सुरूवातीलाच सांगितलं.
 
जे लोक त्याकडे अश्लील म्हणून पाहतात, त्यांना मी एवढंच सांगेन की त्याकडे शरीराच्या पलिकडे जाऊन पाहूया आणि मग खरंच त्यात काही वावगं आहे का? असंही तिनं म्हटलं.
 
या फोटोशूटमागचा विचार काय होता?
 
ही कन्सेप्ट अभिजीत पानसे यांची होती. भरत दाभोळकर यात क्रिएटीव्हली सहभागी आहेत आणि तेजस नेरूरकरनं हा सुंदर फोटो क्लिक केला आहे.
 
आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजात आपल्याला लहानपणापासून सुंदर म्हणजे काय तर गोरं असणं, उंच-सडपातळ बांधा, सरळ नाक असंच सांगितलं गेलंय. ती व्याख्या कुठेतरी ब्रेक होणं गरजेचं होतं म्हणून हे फोटोशूट केलं आहे.
 
ही व्याख्या ब्रेक करणं एक भाग. पण जेव्हा हे फोटोशूट केलं, त्यानंतर खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या असतील. त्याबद्दल काय सांगशील?
 
खूप प्रतिक्रिया आल्या आहेत. खरंतर हे फोटोशूट करताना अशाकाही प्रतिक्रिया येतील हे मी डोक्यात ठेवलं नव्हतं. मला तर वाटलं होतं की खूप निगेटिव्ह प्रतिक्रिया येतील. कारण आपण ज्या समाजात राहतो, तिथे हे मान्य करणंच हे खूप कठीण आहे.
 
पण ज्या दिवशी हा फोटो व्हायरल झाला, तेव्हा सगळीकडून खूप जास्त पॉझिटिव्ह रिप्लाय आले. खूप डोक्यावर घेतला हा फोटो. निगेटिव्ह रिप्लाय पण आले. पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. कारण हे फोटोशूट जे निगेटिव्ह कमेंट करतात त्यांच्यासाठीच केलं होतं. पण पॉझिटिव्ह कमेंट करणारा वर्ग जास्त होता आणि खूप कमालीच्या कॉम्प्लिमेंट आल्या.
 
माझे काही मित्र आहेत, त्यांनीही मला फोन करून सांगितलं की वनिता, तू खूप सुंदर फोटो शूट केलं आहेस. आपल्या समाजाची जी सौंदर्याची व्याख्या आहे, त्याच्या छाताडावर उभं राहून तू हे धाडस केलंस.
 
पण बॉलिवूडमध्ये असं फोटोशूट होणं आणि एखाद्या मराठमोळ्या अभिनेत्रीनं असं शूट करणं...या दोन्हीकडे वेगळ्या दृष्टिनं पाहिलं जातं. त्यामुळे घरच्यांची यावर काय प्रतिक्रिया होती?
 
माझ्या घरच्यांची खूप चांगली प्रतिक्रिया होती, खूप चांगला सपोर्ट केला त्यांनी. मी आधी त्यांना सांगितलं, की मी असं फोटोशूट केलं आहे. ते म्हणाले की काही हरकत नाही, असू दे. तुझ्या कामाचा भाग असेल हा. तरीही मी त्यांना फोटोही दाखवला. पण त्यावरही ती तितक्याच सहजपणे व्यक्त झाले की, फोटो उत्तम आला आहे आणि त्याच्या मागचा विचार खूप चांगला आहे.
 
जेव्हा हे फोटोशूट करायचा दिवस आला, तेव्हा तुझ्या मनात काय विचार येत होते? असं कधी तू याआधी केलं होतंस का किंवा असं काही करायचं तुझ्या डोक्यात होतं का?
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VANITA KHARAT (@vanitakharat19)

अजिबात नाही. मी असं काही फोटोशूट करेन आणि ते इतकं व्हायरलं होईल हा विचारही मी केला नव्हता. किंबहुना याआधी मी अशी ओपनली कोणासमोर गेले नव्हते. खूप भीती वाटत होती, फोटोशूटच्या दिवशी. पण ती भीती अभिजीत सरांनी घालवून टाकली. तू सुंदर आहेस. तू टॉप मॉडेल आहेस, असं समज. म्हणजे तशा रिअक्शन येतील, असं त्यांनी मला सांगितलं.
 
मला त्यांच्यासमोर ऑकवर्ड फील झालंच नाही. मुळात ज्या माणसाच्या डोक्यातून इतकी चांगली कल्पना बाहेर आली, तो माणूस माझ्याकडे त्या नजरेनं बघेलच का? त्यामुळे फोटोशूटच्या दिवशी ऑकवर्डनेस नव्हताच.
 
जसं तू म्हणालीस की शरीराचा न्यूनगंड नव्हताच. पण काही जणींमध्ये खरंच खूप कलागुण असतात. पण तरीही एक न्यूनगंड असतो, कारण त्या इतरांसारख्या दिसत नाहीत. अशा मुलींना तुम्ही काय सांगाल?
 
आधी तुम्ही स्वतःला आरशात पाहा आणि सांगा की मी जगातील सर्वांत सुंदर मुलगी आहे. हे जेव्हा स्वतःला सांगाल, तेव्हा लोकही तुम्हाला स्वीकारतील. लोकांनी स्वीकारण्याचीही गरज नाही. तुम्ही स्वतःला स्वीकारलं तरी खूप आहे. जगणं सोपं होऊन जातं. इतरांसारखं बनण्याची काय गरज आहे? मी जशी आहे, तशी आहे.

Photo: Facebook

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती