मला बॉलिवुडमध्ये काळी मांजर, डस्की म्हणून हिणवलं गेलं : प्रियंका चोप्रा
गुरूवार, 8 डिसेंबर 2022 (15:40 IST)
- योगिता लिमये
अभिनेत्री प्रियंका चोप्रा जोनासने बीबीसी 100 Women ला सांगितलं की तिला 22 वर्षांत पहिल्यांदा तिच्याबरोबर असलेल्या पुरुष सहकलाकारांइतकं मानधन मिळालं आहे. अमेरिकन सिरीज सीटाडेल या सीरिजमध्ये तिला हे मानधन मिळाल्याचं सांगितलं.
प्रियंका अतिशय यशस्वी अभिनेत्री आहे. तिने 60 पेक्षा अधिक बॉलिवूड चित्रपटात काम केलं आहे. दहा वर्षांपूर्वी तिने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि तिथे ठसा उमटवणाऱ्या तुरळक अभिनेंत्रींपैकी ती एक आहे.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रियंका चोप्राने बॉलिवुडमध्ये वर्ण-रंगाहून मिळणारी वागणूक, स्त्री-पुरुष कलाकारांच्या मानधनातील तफावत अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
“मला बॉलिवूडमध्ये कधीच समान मानधन मिळालं नाही. माझ्या पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत 10 टक्के मानधन मिळालं आहे.” असं ती म्हणाली.
“ही तफावत जास्त आहे. खूपच जास्त. अनेक बायकांना या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. मीसुद्धा त्याला अपवाद नाही.” ती पुढे म्हणाली.
" माझ्या पिढीच्या अभिनेत्रींनी समान मानधनाची मागणी केली होती. पण आम्हाला मिळालेलं नाही.”
प्रियंका चोप्राचं नाव BBC 100 Women च्या यादीत आलं आहे. या निमित्ताने मुलाखत देताना एक तरुण अभिनेत्री म्हणून पुरुषप्रधान वृत्ती सामान्य असल्याचं तिने कसं स्वीकारलं याबद्दल बोलली.
“सेटवर तासनंतास बसून राहण्यात काहीच गैर नाही असं मला वाटायचं. मात्र माझे पुरुष सहकारी त्यांच्या सोयीने यायचे. त्यानंतर आम्ही शूटिंग करायचो.”
जेव्हा तिने बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा तिच्या वर्णावरून तिची अवहेलना करण्यात आल्याचंही ती म्हणाली.
“मला काळी मांजर, डस्की अशी विशेषणं लावली जायची. ज्या देशात अशाच रंगाची बहुतांश लोक आहेत त्या देशात या शब्दाचा वेगळा काय अर्थ होतो हेच मला कळायचं नाही.”
“मला असं वाटायचं की फारशी सुंदर नाही. मला फार कष्ट घ्यावे लागतील असंही मला वाटायचं. माझ्या क्षेत्रातल्या उजळ लोकांपेक्षा माझ्यात जास्त प्रतिभा होती असं मला सतत वाटायचं. पण उजळ वर्णाचा उदोउदो करणं नेहमीचंच आहे म्हणून मी फारसा विचार केला नाही.”
“हा सगळा परकीय राजवटीचा परिणाम आहे. ब्रिटिशांनी भारत सोडून आता 100 वर्षं होत आली आहेत. तरी आपण तेच धरून आहोत. पण पुढच्या पिढीला वर्णभेदाचा सामना करावा लागू नये याची जबाबदारी आपली आहे.”
हॉलिवूडमध्ये मानधनाची काय स्थिती आहे याबद्दल बोलताना ती म्हणाली, “माझ्याबरोबर हे पहिल्यांदाच असं झालं आहे. तेही हॉलिवूडमध्ये. त्यामुळे पुढे काय होईल हे माहिती नाही. कारण पुरुष सहकाऱ्याबरोबर लीड अभिनेत्री म्हणून माझी ही पहिलीच भूमिका आहे.” सीटाडेल या सीरीजबद्दल बोलताना ती म्हणाली.
दक्षिण आशिया भागात इतकं कौतुकही होऊनही हवा तसा मार्ग सापडण्यासाठी तिला दहा वर्षं संघर्ष करावा लागला.
“मी मीटिंग्स ना स्वत:च जायचे. माझं काम स्वत:च दाखवायचे. मी अभिनय शिकवणाऱ्या लोकांकडून आणि भाषेचा लहेजा शिकवणाऱ्या लोकांकडून प्रशिक्षण घेतलं. मी अनेकदा ऑडिशन दिल्या, माझी निवड झाली नाही तेव्हा धाय मोकलून रडले. पुन्हा पहिल्यापासून सुरुवात केली. या इंडस्ट्रीत माझं स्थान निर्माण करण्यासाठी मी संघर्ष केला. हा अतिशय वेगळा अनुभव होता.” ती म्हणाली.
2015 मध्ये प्रियंका चोप्रा जोनास अमेरिकेतल्या टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी पहिलीच आशियाई अभिनेत्री आहे. विविध फॅशन मॅगझीनच्या कव्हर पेजवर येणारी सुद्धा ती पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे.
मात्र तिच्या भारतीय असण्याने तिला कामं मिळण्यात अडचणी येत असल्याचं ती सांगते. सर्व प्रकारची विविधता जपण्याचं आवाहन होत असतानासुद्धा अशी परिस्थिती आहे असं ती सांगते.
“मी माझं विश्वासार्ह स्थान निर्माण केलं आहे असं मला वाटतं. त्यामुळेच मला चांगली कामं मिळत आहेत. लोक ते स्वीकारतात की नाही हे बघावं लागेल. हॉलिवूडमध्ये भारतीय लोकांनी स्थान निर्माण करणं फार कठीण हे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे.” ती म्हणाली.
प्रियंका चोप्रा आता जागतिक दर्जाची अभिनेत्री आहे. ती विविध जागतिक मुद्यांवर मत व्यक्त करत असते. मात्र भारतातल्या गोष्टींवर मत व्यक्त करत नाही म्हणून तिच्यावर टीका होते.
या प्रश्नाचं उत्तर देण्याआधीच तिच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी तिला थांबवलं.
मग सोशल मीडियावर असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक वातावरणाबद्दल बोलताना ती म्हणाली, “तुम्ही अमूक तमूक विषयावर का बोलल्या नाही असं सांगणारे लोक कायमच तुमच्या आसपास असतील. पण तुम्ही सगळ्यांना प्रत्येकवेळी आनंदी ठेवू शकत नाही.”
प्रियंका चोप्रा जोनास लखनौमध्ये आमच्याशी बोलत होती. तिथे ती युनिसेफ तर्फ Goodwill Ambassador म्हणून काम करत आहे. ती तिथल्या वेगवेळ्या शाळांमध्ये, आरोग्य केंद्रांना भेट देत आहेत, तसंच तरुण विद्यार्थिनींना भेट देत आहे.
ती युनिसेफ बरोबर गेल्या 15 वर्षांपासून काम करत आहे. ती झिम्बाब्वे, इथिओपिया, जॉर्डन, बांग्लादेश या देशांमध्ये प्रवास केला आहे. या देशातील मुलं सुद्धा नैसर्गिक आपत्तींनी ग्रस्त आहेत.
“तुम्ही जेव्हा सार्वजनिक आयुष्यात असता तेव्हा मी कुठे आहे, कुठे जाता हे पाहण्यात लोकांना रस असतो. अशा ठिकाणी तुम्हाला तुमच्या आयुष्याचा उद्देश सापडला आहे असं वाटतं. मी तिथे काय करते हे लोकांना कळतं, लहान मुलांच्या काय अडचणी आहेत हे मला कळतं आणि त्या अडचणी कशा सोडवायच्या याची जाणीव होते.”
“त्यामुळे जिथे लोकांचा आवाज पोहोचत नाही, विशेषत: लहान मुलांचा, तो मी पोहोचवण्याचं काम करते. हे माझ्या आयुष्यातलं सर्वात आवडतं काम आहे.”