निलेश राणे : 'रोहित पवार यांचा 'तो' शब्द मला खटकला, मी माझ्या भाषेत उत्तर दिलं'

मंगळवार, 26 मे 2020 (15:05 IST)
रोहित पवार यांचे काही शब्द खटकले म्हणूनच त्यांना प्रत्युत्तर दिलं, असंनिलेश राणे यांचं म्हणणं आहे.
 
रोहित पवार आणि निलेश राणे यांच्यात सध्या ट्वीटरवर चांगलीच शाब्दिक चकमक सुरू आहे. त्याचवेळी निलेश राणे यांनी ट्विटरवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावरही टीका केली आहे.
 
बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांना दिलेल्या मुलाखतीत निलेश राणे यांनी या आणि इतर मुद्द्यांवर सविस्तर उत्तरं दिली आहेत. त्यांच्या मुलाखतीचा हा संपादित अंश.
 
तुमच्यात आणि रोहित पवार यांच्यात एक शाब्दिक युद्ध रंगलं आहे. रोहित म्हणतात मी कुणाच्या धमकीला घाबरत नाही. तुमचं त्यावर काय म्हणणं आहे?
 
मुळात मी कुणाला घाबरवलं नाही, माझा तो उद्देशही नव्हता. शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं होतं. त्याची महाराष्ट्र टाईम्समधली बातमी मी ट्वीट करून 'साखर उद्योगाचं कधी ऑडिट होणार आहे की नाही? इतकी महाराष्ट्राची संपत्ती आपण एका व्यवसायाला लावतोय त्याचा कधीतरी महाराष्ट्राला हिशेब कळणार आहे की नाही?' असं विचारलं होतं.
 
आता मी फायनान्सचा विद्यार्थी आहे. तो माझा आवडीचा विषय आहे. त्यामुळे एखाद्या व्यावसायात आपण इतके पैसे घातले, त्याचं ऑडिट व्हावं हा माझा विषय होता. त्यात कुठेही मी पवार साहेबांचं नाव घेतलं नव्हतं.
 
त्यावर रोहित पवारला राग आला, त्याने जे शब्द त्याच्या ट्वीटमध्ये वापरले ते मला काही आवडले नाही. ते मला कम्फर्टेबल वाटले नाहीत, मग मी माझ्या भाषेत जे मला कळतं ते त्याला तसं उत्तर दिलं.
विषय साखर कारखान्यांचा होता, त्याच्यात मी कुठेही पवार साहेबांवर काही बोललो नाही आणि मी रोहित पवारांना ओळखतसुद्धा नाही. मी पार्थ पवारांना ओळखतो. मी सुप्रिया ताईंना ओळखतो. ना मी पवार साहोबांना टॅग केलं होतं ,ना मी राष्ट्रवादीच्या नेत्यांना टॅग केलं होतं.
 
आणि त्याच्या उत्तरामधले काही शब्द मला आवडले नाही त्याच शब्दांत मी उत्तर दिलं, कारण का मी तुझ्याकडे येत नाही तू माझ्याकडे काही येण्याची गरज नाही. ही माझी पद्धत आहे.
 
मग ते राज्यमंत्री तनपुरे म्हणतात, टप्प्यात आले तर निलेश राणेंचा कार्यक्रम करू. ही धमकी नाही? मग ही कुठलीही भाषा? फक्त ती सभ्यतेची, त्याला जोड देणार. पण धमकी देणार, खालच्या थराची टीका करणार. राणे साहेबांनी कायम पवार कुटुंबाचा मानसन्मानच केला आहे.
 
पण कसं आहे की मीडियामध्ये हे सभ्य आहेत. मग यांचं चालून जातं. आम्ही काहीही बोलतो, सरळ बोलतो. धमकीला धमकी म्हणतो. पण मी काही पोलिसांमध्ये जाणार नाही.
 
आम्ही स्वतःला सांभाळण्यात समर्थ आहोत. आम्हाला साहेबांनी शिकवलं आहे की स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि समोरून आंगावर कुणी आला तर त्याला उचलून फेकायचं कसं, हेही आम्हाला शिकवलं आहे. सुरुवात त्यांनी केली आहे.
 
तुम्ही लघु उद्योगांच्या संदर्भात पीएचडी केली आहे, साखर उद्योगाच्या चौकशीची मागणी तुम्ही करत आहात. त्यासाठी संदर्भात तुम्ही काही डेटा गोळा केला आहे का? तो मांडून तुम्ही तुमची मागणी आणखी पुढे नेणार आहात की एक ट्वीट पुरेसं आहे?
 
यावर सर्व आकडे बाहेर आले पाहिजेत. काही आकडे मी जाणकारांकडून काढले आहेत. आता मला काही RTI कराव्या लागतील. काही PIL मला कराव्या लागतील. ही सगळी आयुधं लॉकडाऊनच्या नंतरची आहेत.
 
आम्ही काय कुठे गप्प बसणार नाही. मी माझ्या पक्षातल्याही अनेक लोकांशी बोललोय. लॉकडाऊननंतर मी यावर काही हलचाल करणार आहे. त्याच्यावर मी गप्प बसणार नाही. ऑडिटचा विषय मी पुढे नेणार हे 100 टक्के.
तुम्ही पक्षातल्या लोकांशी बोललात, असं तुम्ही म्हणत आहात. तुम्ही नेमकी कुणाकुणाशी चर्चा केली आहे?
 
ते आता सांगणं योग्य नाही, ते तुम्हाला कालांतराने कळेलच. कसं आहे की पक्षातल्या सर्व गोष्टी मी बाहेर सांगू शकत नाही.
 
पक्ष म्हणजे भाजप की स्वाभिमानी पक्ष?
 
स्वाभिमानी पक्ष आहे कुठे आता! स्वाभिमानी पक्ष आम्ही विलीन केला आहे. 2019 मध्ये फडणवीस साहेब नितेश राणेंच्या प्रचाराला आले होते, तेव्हा आम्ही हा पक्ष भाजपमध्ये विलीन केला आहे.
 
तुम्ही एक वर्ष मागे आहात अजून. कोकणात काय चालतं हे तुम्हाला माहिती नाही. स्वाभिमान हा पक्ष आता विषय नाही. माझा भाऊ नितेश राणे भाजपचा आमदार आहे, माझे वडील नारायण राणे हे भाजपचे खासदार आहेत आणि मी 'इन-प्रोसेस' आहे.
 
तुम्ही भाजपमध्ये 'इन-प्रेसेस' आहात असं म्हणता. कोरोनाचा काळ आहे, देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर टीका करत आहेत. सरकारविरोधात आंदोलन करत आहेत, त्याचवेळी नितीन गडकरी यांचं म्हणणं आहे की समोपचारानं घेतलं पाहिजे. तुम्ही नेमकं कुणाशी सहमत आहात?
 
सहमत हा विषय नसतो. राजकारण काय परिस्थिती पाहून त्याचं प्रमाण ठरवायचं असतं. देवेंद्र फडणवीस जे करत आहे ते उत्तम आहे. सरकारला जाब विचारणं हे विरोधीपक्षाचं काम आहे आणि ते विरोधी पक्षनेते आहेत त्यामुळे तेवढं ते करणारच.
 
समोपचारानं सर्व मार्ग निघायला पाहिजेत, हे आम्हाला मान्यच आहे. पण सर्वपक्षीय बैठक बोलवाली कुणी पाहिजे. अधिकार कुणाचा असतो, मुख्यमंत्र्यांचा असतो. एक मीटिंग झाली आहे फक्त अडिच महिन्यांमध्ये. राज्याच्या प्रमुखालाच वाटत नाही की सर्वपक्षिय बैठक बोलवावी आणि त्यातून तोडगा काढावा.
 
तुम्ही म्हणता की शिवसेनेकडून किंवा काही नेते मंडळींकडून तुमच्यावर टीका होत असते म्हणून तुम्ही त्यांच्यावर एकेरी टीका करता. अलीकडच्या काळात राणेंवर अशी कुठली टीका झाली आहे का, म्हणून तुम्ही उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत आहात?
 
कसं असतं, माणूस काही पदांवर गेला की डॉक्टर समजायला लागतो स्वतःला किंवा वयानं डॉक्टर समजायला लागतो. तुमचं कोकणावर लक्ष कमी आहे. 288 पैकी शिवसेनेनं एकमेव कणकवलीची जागा युतीमध्ये असूनही भाजपच्या विरोधात लढवली. याला राग म्हणायचं नाही? म्हणजे तुम्हाला राग आहे, द्वेष आहे त्यांचा. बघा आतून ज्या गोष्टी घडतात ना त्या तुम्हाला वरवर कळत नाहीत.
 
माझा शिवसेनेवर आक्षेप कधीच नाही. बाळासाहेब हे आजही आमचे दैवत आहेत. बाळासाहेबांच्या अत्यंविधीला आम्ही जाऊ शकलो नाही, पण तेव्हा आमचं संपूर्ण घर रडलं. ठाकरेंबद्दल जे आमच्या मनामध्ये आहे, ते आमच्या मनात आहे. पण जर एका कुटुंबाला तुम्ही उद्ध्वस्त करायला निघाला आहात तर हे आमच्याकडून थांबणारं नाही.
 
आता तुम्ही उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री झाल्यानंतरची भाषा पाहात आहात. आता ते मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना ते बोलावं लागतं, कारण तो त्या पदाचा मान आहे.
 
पण मला तेच म्हणायचं आहे, पदाचा मान महत्त्वाचा आहे, ते मुख्यमंत्री आहेत. तुमचे वडिलसुद्धा मुख्यमंत्री होते?
 
अहो एकेरी म्हणजे काय आपण आईला, काकाला एकेरीच म्हणतोच. एकेरी उल्लेख म्हणजे अपमान नाही, भाऊ. पण तुम्ही जर आमचं वाटोळं करायला निघालात तर आम्ही गप्प बसणार नाही. म्हणून आम्हाला काही शब्द बोलावे लागतात. जर त्यांनी थांबवलं तर मी थांबणार.
 
पण तुम्ही शिवेसेनेची एका ट्वीटमध्ये प्रशंसा केली आहे. आता शिवसेनेवरचा थोडा राग कमी झाला आहे का?
 
माझा कुणावरच राग नाही. शिवसेनेवर तर नाहीच नाही. मी माझ्या साहेबांची बाजू घेतो. राजकारणी माणसासारखे माझे विचार नाहीत. ज्या दिवशी आम्हाला वाटलं की शिवेसेनेचा आमच्या वरचा राग संपला, त्या दिवशी मी उलट चागलंच बोलेन.
 
उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, रश्मी वहिनी असतील... आहो आम्ही घरात जेवलोय त्या. आम्ही बाहेर खेळलो आहे मातोश्रीच्या. म्हणून राग हा विषय लांब लांबपर्यंत नाही.
 
पण मला माझ्या कुटुंबाबाबत आस्था आहे, घरात कुणी घुसेपर्यंत आम्ही वाट पाहायची का? आम्हाला पण संरक्षण करायचं आहे आमच्या कुटुंबाचं. पण तुम्ही जे काही चालवलं आहे ते थांबवलं पाहिजे. जर तुम्ही नाही थांबवलं तर आम्हीही नाही थांबवणार हे स्पष्ट आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती