दहावी-बारावी परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर, कधी होणार परीक्षा?
गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (14:05 IST)
दहावी-बारावीच्या परीक्षांच्या सुधारित वेळापत्रकानुसार नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या विरोधानंतरही या परीक्षा ऑनलाईन न घेता ऑफलाईन पद्धतीनुसारच घेण्यात येतील, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्याकडून या एका प्रसिद्धीपत्रकामार्फत नव्या तारखांची घोषणा करण्यात आली.
मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत.
साधारपणे बारावीची परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात होत असते. तर दहावीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होते.
पण यंदाच्या वर्षी कोरोनामुळे या परीक्षेच्या वेळापत्रकात सुमारे 2 आठवड्यांचा विलंब होणार आहे.
बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 एप्रिल या कालावधीमध्ये होईल, तर दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होईल.
दहावी-बारावी परीक्षांसंदर्भात ठळक माहिती -
दहावी -
तोंडी परीक्षा - 25 फेब्रुवारी ते 14 मार्च 2022
लेखी परीक्षा - 15 मार्च ते 4 एप्रिल 2022
बारावी -
तोंडी परीक्षा - 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022
लेखी परीक्षा - 4 मार्च 2022 ते 30 मार्च 2022
महत्त्वपूर्ण मुद्दे -
दहावीचे एकूण परिक्षार्थी - 16 लाख 25 हजार 311
बारावीचे एकूण परिक्षार्थी - 14 लाख 72 हजार 562
विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी असल्यामुळे लेखी परीक्षेस जास्त वेळ मिळणार
अभ्यासक्रमात 25 टक्के कपात, लेखी परीक्षेचे आयोजन 75 टक्केअभ्यासक्रमावर
प्रात्यक्षिक परीक्षेचे आयोजन 40 टक्के अभ्यासक्रमावर
70 ते 110 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटे जादा वेळ
40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटांचा जादा वेळ
परीक्षा काळात कोव्हिडमुळे एखादा विद्यार्थी आजारी असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र परीक्षा कक्ष
कोव्हिडमुळे कोणी विद्यार्थी प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, सबमिशन करू न शकल्यास 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात येईल. त्यासाठी वेगळे शुल्क घेतले जाणार नाही.