केतकी चितळेवर राष्ट्रवादीनं शाई आणि अंडी फेकली, धक्काबुक्कीचा प्रयत्न

शनिवार, 14 मे 2022 (20:25 IST)
अभिनेत्री केतकी चितळेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. केतकी चितळेला पोलीस तिच्या कळंबोलीतील घरातून ताब्यात घेऊन नेत असताना तिच्यावर शाई फेकण्यात आली, तसंच अंडीही फेकण्यात आली. शिवाय, कार्यकर्त्यांनी केतकीला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला.
 
केतकी चितळे तिच्या वादग्रस्त विधानांनी अनेकदा चर्चेत असते. यावेळी केतकीनं आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे.
 
केतकी चितळेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, ठिकठिकाणी केतकीविरोधात गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. केतकी चितळेला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर दिली आहे. त्याचप्रमाणे नवी मुंबई आणि ठाणे पोलिसांचे आभार त्यांनी मानले आहेत.
 
तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी केतकी चितळेचा निषेध व्यक्त केला आहे.
 
पुण्यात महाविकास आघाडीतर्फे केतकी चितळेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र प्रभारी मनाली भिलारे, काँग्रेसच्या नेत्या कमलताई व्यवहारे, शिवसेना युवती प्रमुख मनीषा धारणे उपस्थित होत्या.
 
या प्रकरणात आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पत्रक काढून केतकी चितळेचा निषेध नोंदवलाय.
 
राज ठाकरेंच्या त्यांच्या पत्रकात म्हटलंय की, "कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. आम्ही त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो.
 
"महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्षे कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुद्ध तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो. त्यातली विनोदबुद्धी आपण ओळखतो. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत. आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि राहतील. परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे इथे फार स्पष्टपणे सांगणे गरजेचे आहे. असे लिहिणे ही एक प्रवृत्ती नव्हे, तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे.
 
"चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी, तसेच असंख्य बुद्धिमान विचारवंतांनी आपल्याला शिकवलं. कोणीही या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा."
 
कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा, असं म्हणत राज ठाकरेंनी स्वाक्षरीसह अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पत्रक जारी केलंय. त्यात त्यांनी केतकीवर जोरदार टीका केली आहे.
 
राज ठाकरेंच्या भूमिकेचं राष्ट्रवादीनं स्वागत केलंय. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी म्हटलंय की, "राजकीय मतभेद असले तरी राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत करतो. फडणवीसांना सदबुद्धी येईल ही अपेक्षा ठेवतो."
 
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे नेतेही आक्रमक झाले आहेत. शिरूरचे खासदार आणि राष्ट्रवादीचे नेते डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, "साहेबांबद्दल द्वेषाने गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध. महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या जडणघडणीत कृषी, सहकार, उद्योग, सामाजिक समतोल, महिला धोरण अशा अनेक क्षेत्रांत आदरणीय शरद पवार साहेबांचं मोलाचं योगदान आहे."
 
"विखारी आकसापोटी अशी गरळ ओकण्याआधी साहेबांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा स्वतःला अभिनेत्री म्हणवणाऱ्यांनी अभ्यास करावा," असंही डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती