नवज्योत सिंग सिद्धू : कसोटीपटू ते पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष व्हाया भाजप, असा आहे प्रवास

शनिवार, 1 एप्रिल 2023 (20:13 IST)
काँग्रेसचे पंजाबचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे अखेर 10 महिन्यांनी पटियाला तुरुंगातून बाहेर आले आहेत.
 
"सध्या लोकशाही वगैरे असं काहीही उरलेलं नाहीय. पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट आणण्याचं कारस्थान आहे. अल्पसंख्यांकांना टार्गेट केलं जातंय. तुम्ही जर पंजाबला अशक्त करू पाहत असाल, तर तुम्हीही अशक्त व्हाल," असं नवज्योत सिंग सिद्धू यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर म्हटलं.
 
सुप्रीम कोर्टाने एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. सिद्धू यांनी 1988 साली एका गुरनाम नामक व्यक्तीला मारहाण केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सिद्धू यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
 
तब्बल 34 वर्षे जुन्या असलेल्या या प्रकरणात अनेक वळणे पाहायला मिळाली. सर्वप्रथम या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने 2018 मध्ये निकाल दिला होता. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात सिद्धू यांच्यावरील सदोष मनुष्यवधाचा आरोप फेटाळून लावताना त्यांची तीन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा बदलून एक हजार रुपयांचा दंड लावला होता.
 
या निकालाविरुद्ध गुरनाम यांच्या कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन सिद्धू यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
 
तत्पूर्वी, सर्वप्रथम कनिष्ठ न्यायालयाने सिद्धू यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त केलं होतं. त्यानंतर पीडित कुटुंबीयांनी 1999 या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात धाव घेतली. पंजाब-हरयाणा हायकोर्टाने सिद्धू यांना या प्रकरणात दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती.
 
पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं होतं. सुप्रीम कोर्टाने 2018 मध्ये यावर निकाल दिला होता.
 
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा दिला होता राजीनामा
पंजाबमधील राजकीय नाट्यादरम्यान गेल्या वर्षी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
 
"पंजाबचं भवितव्य आणि पंजाबच्या नागरिकांचं कल्याण यासाठी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. त्यामुळे मी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. मी यापुढेही काँग्रेससाठी काम करत राहीन", असं सिद्धू यांनी राजीनामा पत्रकात म्हटलं होतं.
 
सिद्धू यांनी केलेल्या बंडामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनामा दिला. त्यानंतर चन्नी यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली.
 
पंजाबचे माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच पंजाब काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती.
 
पंजाब काँग्रेसला अंतर्गत मतभेदांचा सामना करावा लागत होता. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मतभेद निर्माण झाल्याचं चित्र होतं.
 
नवज्योतसिंग सिद्धू पूर्वी भाजपमध्ये होते. महाराष्ट्रात भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं. हेच समीकरण पंजाबमध्येही लागू झालं आहे.
 
भाजप, आप आणि काँग्रेस असा सिद्धू यांचा प्रवास आहे. 2004 मध्ये ते भाजपचे उमेदवार म्हणून अमृतसर मतदारसंघातून निवडून आले.
 
न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यामुळे त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्यांनी पोटनिवडणूक जिंकली.
 
2016 मध्ये सिद्धू यांनी राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेतली. मात्र तीन महिन्यातच त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. काही महिन्यातच त्यांनी आवाज-ए-पंजाब या राजकीय आघाडीची स्थापना केली. 2017मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ते आमदार म्हणून निवडून आले.
 
त्यांच्याकडे पर्यटन खातं सोपवण्यात आलं होतं. नियमभंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने सिद्धू यांना 72 तास प्रचार करण्यापासून रोखलं होतं.
 
14 जुलै 2019 रोजी सिद्धू यांनी राजीनामा सादर केला. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सिद्धू यांचा राजीनामा स्वीकारला. सिद्धू यांनी पंजाब सरकारच्या कार्यपद्धतीवर टीकाही केली होती.
 
पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. 26 मे रोजी कथित शेतकरी आंदोलनात 6 महिने पूर्ण झाल्याबद्दल शेतकरी संघटनांनी एकदिवसीय आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
 
मात्र, राज्यात करोनाची स्थिती गंभीर असल्याने संघटनांनी तसे न करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र, नवज्योतसिंग सिद्धू यांनी पटियाला आणि अमृतसर येथील आपल्या निवासस्थानी काळे झेंडे लावून मुख्यमंत्र्यांच्या विनंतीस केराची टोपली दाखविली होती.
 
सिद्धू यांची क्रिकेट कारकीर्द
सिद्धू यांनी 51 कसोटी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व करताना 3202 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 शतकं आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. 136 वनडे सामन्यात सिद्धू यांनी 37.08च्या सरासरीने 4413 धावा केल्या.
 
वनडेत सिद्धू यांच्या नावावर 6 शतकं आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे.
 
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पंजाबसाठी खेळताना सिद्धू यांच्या नावावर 9571 धावा असून 27 शतकं आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर सिद्धू यांनी समालोचक म्हणूनही काम केलं.
 
कॉमेडी शोचे जज म्हणूनही त्यांनी भूमिका निभावली. कॉमेडियन कपिल शर्माच्या कार्यक्रमातही सिद्धू असतात. बिग बॉस कार्यक्रमातही ते सहभागी झाले होते.
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती