नरसिंह राव राजीव गांधींच्या 'त्या' एका वाक्यामुळे वयाच्या 65 व्या वर्षी कॉम्प्युटर शिकले...

मंगळवार, 29 जून 2021 (20:36 IST)
बाला सतीश
1986 सालची गोष्ट आहे. राजीव गांधी तेव्हा देशाचे पंतप्रधान होते. पी.व्ही. नरसिंह राव तेव्हा संरक्षण मंत्री होते.
 
राजीव गांधींप्रमाणेच नरसिंह राव यांना तंत्रज्ञानाबद्दल आकर्षण होतं. पण राव यांना कॉम्प्युटरची फारशी माहिती नव्हती. दुसरीकडे राजीव गांधींना मात्र त्यातल्या बऱ्याच गोष्टी येत होत्या, माहीत होत्या.
 
एकदा राजीव गांधी त्यांच्या दालनात बसून एका मित्राशी गप्पा मारत होते. नरसिंह राव पण त्यावेळी तिथेच होते.
 
आपण इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटरच्या आयातीला परवानगी देणार असल्याचं राजीव त्यांच्या मित्राला सांगत होते. बोलता बोलता त्यांनी म्हटलं, "पक्षातले जुने सदस्य याकडे कसं पाहतील माहीत नाही. त्या पिढीला तंत्रज्ञानाची जाण थोडी कमीच आहे."
 
नरसिंह रावांनी हा पूर्ण संवाद ऐकला.
 
त्याच संध्याकाळी नरसिंह राव यांनी आपल्या मुलाला, प्रभाकर राव यांना हैदराबादला फोन केला.
 
पंधरा दिवसांपूर्वीच प्रभाकर राव यांनी कॉम्प्युटरच्या वापराबाबत आपली कंपनी एका संशोधनाचा प्रस्ताव मांडण्याच्या तयारीत असल्याचं नरसिंह रावांना सांगितलं होतं.
 
नरसिंह रावांच्या ते लक्षात होतं. त्यांनी फोनवर आपल्या मुलाला विचारलं, "तू कॉम्प्युटर तंत्रज्ञानाबद्दल माझ्याशी बोलला होतास ना? तुझ्याकडे कॉम्प्युटरचं मॉडेल आहे का? असेल तर मला पाठवून दे ना..."
 
प्रभाकर राव यांची हैदराबादमध्ये एक कंपनी होती. ते टीव्ही आणि कॉम्प्युटरशी संबंधित एक युनिट सुरू करण्यासाठी काम करत होते. त्यांनी काही स्पेअर पार्ट्सचा वापर करून तीन प्रोटोटाइप डेस्कटॉप बनवले होते. नंतर त्यांनी टीव्ही व्यवसायात पाऊल ठेवलं.
 
पी.व्ही. नरसिंह राव यांनी फोन केल्यानंतर प्रभाकर राव यांनी तीनमधला एक कॉम्प्युटर दिल्लीला पाठवला. त्यांनी आपल्या वडिलांना कॉम्प्युटर शिकविण्यासाठी एका शिक्षकाचीही व्यवस्था केली.
 
अशाप्रकारे वयाच्या 65 व्या वर्षी नरसिंह रावांनी कॉम्प्युटर शिकायला सुरूवात केली.
 
नरसिंह रावांचे पुत्र प्रभाकर राव यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "त्याकाळी कॉम्प्युटरचे सुटे भाग आयात करून जोडण्याचं काम इथं व्हायचं. माझ्या आठवणीप्रमाणे तो आयबीएमचा क्लोन कॉम्प्युटर होता."
 
मात्र नरसिंह रावांना त्यांचे कॉम्प्युटरचे शिक्षक फारसे आवडले नाहीत. मग त्यांनी आपल्या मुलाला कॉम्प्युटर शिकण्यासाठीचे काही मॅन्युअल आणि पुस्तकं पाठवायला सांगितलं.
 
पी.व्ही. नरसिंह रावांना तंत्रज्ञानांची चांगली समज होती. त्यांनी स्वतःचं पुस्तक वाचून कॉम्प्युटर शिकायला सुरूवात केली.
 
 
सहा महिन्यातच बदललं चित्र
सहा महिने सलग ते सकाळ-संध्याकाळ वेळ देत कॉम्प्युटर शिकले. सहा महिन्यांनंतर त्यांनी आपल्या मुलाला फोन केला आणि सांगितलं की, आता मला कॉम्प्युटर नीट वापरता येतोय.
 
ते केवळ रोजच्या वापरासाठी कॉम्प्युटर शिकले नाहीत, तर कोडिंग आणि प्रोग्रॅमिंगही शिकले. तेव्हा कॉम्प्युटरसाठी कोबोल आणि बेसिकसारख्या प्रोग्रॅमिंगच्या भाषा वापरात होत्या आणि नरसिंह राव त्यासुद्धा शिकले. ते ऑपरेटिंग सिस्टिम युनिक्समध्ये कोडिंगही शिकले होते.
 
प्रभाकर सांगतात, "यानंतर रिकाम्या वेळात राजीव गांधी आणि नरसिंह रावांमध्ये तंत्रज्ञानावरच गप्पा व्हायला लागल्या. कारण दोघांना टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटरमध्ये विशेष रस होता. ते दोघं कॉम्प्युटर आणि त्यातल्या नवीन नवीन ट्रेंडवर बोलायचे."
 
 
मुलीला कॉम्प्युटरवर पेंटिंग करायला सांगितलं
नरसिंह राव यांच्या कन्या सुरभी वाणी तेलंगण विधान परिषदेत आमदार आहेत. आपल्या वडिलांच्या कॉम्प्युटरमध्ये असलेल्या गतीबद्दल सांगतात, "एकदा मी काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते. संसदेमध्ये जाताना त्यांनी मला कॉम्प्युटरवर एक पेंटिंग बनवायला सांगितलं.
 
त्याकाळी कॉम्प्युटरमध्ये पेंटिंग ब्रशसोबत एक बेसिक प्रोग्राम असायचा. (एमएस पेंट असावा कदाचित) त्यांनी मला पेंटिंग बनवायला सांगितलं खरं पण मला कॉम्प्युटरची एबीसीडीही येत नव्हती."
 
सुरभी पुढे सांगतात, "जेव्हा मी ही गोष्ट त्यांना सांगितली, तेव्हा त्यांनी कॉम्प्युटर मॅन्युअलच्या मदतीनं पेंटिंग बनव असं म्हटलं. त्यांनी मला एक फ्लॉपी पण दिली. त्यात मला पेंटिंग सेव्ह करायला सांगितलं. मला काहीच कळलं नाही.
 
केवळ मॅन्युअल वाचून कॉम्प्युटर कसा शिकता येईल, असा प्रश्न मला पडला होता. आजही माझ्याकडे ती फ्लॉपी आहे. त्यादिवशी मी कसंबसं पेंटिंग केलं, मात्र ते फ्लॉपीमध्ये सेव्ह नाही करता आलं. पण त्यांनी मला कॉम्प्युटरला हात लावायला दिला, याचा मला आनंद झाला होता."
 
आपल्या वडिलांच्या लायब्ररीमध्ये कॉम्प्युटरवरची अनेक महागडी पुस्तकं होती, असं नरसिंह राव यांचे पुत्र प्रभाकर राव सांगतात.
 
ते सांगतात, "2002 मध्ये एक दिवस कॉम्प्युटरच्या हार्डवेअरसंबंधी एक समस्या निर्माण झाली आणि ते दुरुस्त करणारा तंत्रज्ञ नव्हता. त्यावेळी त्यांनी मॅन्युअल वाचून स्वतःच कॉम्प्युटर दुरुस्त केला होता."
 
अपडेटची समस्या
प्राध्यापक विनय सीतापति यांनी आपल्या 'हाफ लायन' या पुस्तकात पीव्ही नरसिंह रावांना कॉम्प्युटरबद्दल किती माहिती होती, याबद्दलचा किस्सा सांगितला आहे.
 
आयटी आशिया संमेलनामधील भाषणादरम्यान त्यांना कॉम्प्युटरसंबंधी असलेली माहिती पहायला मिळाली. कॉम्प्युटर आणि स्मार्ट फोनचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला अपडेटच्या समस्येची माहिती आहेच. या संमेलनात त्यांनी याच विषयावर आपली नाराजी व्यक्त केली होती.
 
आयटी आशिया संमेलनामध्ये त्यांचं भाषण हे अतिशय तक्रारवजा होतं.
 
त्यांनी म्हटलं होतं, "मी वर्डचं एक व्हर्जन वापरतो. त्याचे अपडेट वर्षानुवर्षं येत असतात. मात्र मी जेव्हा अपडेट करतो, तेव्हा मला फारसा फरक जाणवत नाही. आपल्याला या अपडेट्सबद्दल सतर्क राहायला हवं. जर आपण चार अपडेट केले नाहीत आणि पाचवा केला, तर तो उपयोगी ठरू शकतो. तेव्हा हा अपडेटप्रमाणे दिसू शकतो. सॉफ्टवेअर कंपन्यांनी हे चुकीच्या अर्थानं घेऊ नये."
 
मात्र नरसिंह राव यांना या समस्येला सामोरं जावं लागलं होतं.
 
प्रणब मुखर्जींच्या आठवणीतून...
 
2012 मध्ये हैदराबाद मीडिया हाऊस या एका खाजगी मीडिया कंपनीच्या बैठकीत भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी एक रंजक किस्सा सांगितला होता.
 
त्यांना कॉम्प्युटरची फारशी माहिती नव्हती आणि त्यावरून पी.व्ही. नरसिंह राव त्यांना सारखं टोकायचे.
 
प्रणब मुखर्जींनी म्हटलं होतं, "नरसिंह राव हे एक उत्तम 'ड्राफ्ट्समन' होते. त्यांनी नजरेखालून घातल्याशिवाय काँग्रेस पक्षाशी संबंधित कोणतंही कागदपत्र बाहेर जायचं नाही. 1991च्या घोषणापत्राचा प्राथमिक मसुदा मी तयार केला होता, ज्याला त्यांनी अंतिम रुप दिलं होतं."
 
मुखर्जी यांनी पुढं सांगितलं, "तंत्रज्ञान त्यांच्यासाठी पॅशन होतं. कॉम्प्युटरची त्यांना पूर्ण माहिती होती. मात्र मी तसा नव्हतो. कधीकधी मी त्यांच्याकडे कागदपत्रं घेऊन जायचो, तेव्हा राव ती कागदपत्रं घ्यायचे नाहीत. ते मला त्या कागदपत्रांची 'सॉफ्ट कॉपी' पाठवायला सांगायचे. मी त्याला फारसा सरावलेला नव्हतो. त्यांच्या त्यावेळेच्या विचारांचा परिणाम आपण आता पाहात आहोत."
 
सुधारणांमध्ये सॉफ्टवेअर उद्योगाला स्थान
विनय सीतापति यांनी 'हाफ लायन' पुस्तकातील काही प्रकरणांमध्ये कॉम्प्युटरबद्दल नरसिंह रावांना जे आकर्षण होतं त्याबद्दल सविस्तर लिहिलं आहे.
 
"राव फार बोलायचे नाहीत, मात्र ते आपले विचार एका डिजिटल डायरीमध्ये नीट नोंदवून ठेवायचे. मे 1991 मध्ये त्यांनी दिल्ली सोडण्याचा निर्णय घेतला होता. आपली बरीचशी पुस्तकं, कॉम्प्युटर, प्रिंटर त्यांनी काळजीपूर्वक एका बॉक्समध्ये पॅक करून पाठवले होते. त्यांच्या लायब्ररीमध्ये ते एका लॅपटॉपवर टाइप करायचे. ते जेव्हा पंतप्रधान होते, तेव्हा त्यांच्या बेडरुमच्या शेजारच्या खोलीत कॉम्प्युटर असायचा. वर्तमानपत्रं येण्याच्या आधीचा जो वेळ असायचा, तो ते कॉम्प्युटरवर काम करत घालवायचे."
 
त्यांना ज्या उद्योगांमध्ये बदल घडवून आणायचा होता, त्यामध्ये सॉफ्टवेअर क्षेत्राचाही समावेश होता.
 
82व्या वर्षी डीटीपी शिकले
नरसिंह राव यांच्या 'द इनसाइडर' या आत्मकथेच्या तेलुगू अनुवादामध्ये बदल करण्यासाठी एका पब्लिशिंग हाऊसनं पुरुषोत्तम कुमार यांना दिल्लीला पाठवलं होतं.
 
नरसिंह रावांनी त्यांच्याकडून वेगवेगळ्या फॉन्टचा उपयोग आणि कॉम्प्युटरमध्ये भारतीय भाषांचा वापर कसा करायचा हे शिकून घेतलं.
 
त्यावेळी 'लीप ऑफिस' वापरलं जायचं. हा प्रोग्रॅम भारत सरकारच्या 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अडव्हान्स्ड कम्प्युटिंग'नं तयार केला होता.
 
पुरूषोत्तम कुमार सांगतात की, नरसिंह राव यांनी बारकाईने या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या होत्या. मला दिल्लीला ज्या कामासाठी पाठवलं होतं, ते पूर्ण झालं होतं. मात्र भारतीय भाषांचा वापर करून डीटीपी कसं करायचं हे नरसिंह रावांना शिकविण्यासाठी मला थांबावं लागलं.
 
"तेलुगूमध्ये फाइल क्रिएट आणि ओपन कशी करायची, डाऊनलोड कशी करायची, फॉन्ट कसा बदलायचा, लेआउट कसा करायचा वगैरे गोष्टी राव यांनी शिकून घेतल्या. त्यानंतर नरसिंह राव जेव्हा अमेरिकेला गेले, तेव्हा त्यांनी आपला रिकामा वेळ आपल्या पुस्तकाच्या डीटीपीवर काम करण्यात घालवला.
 
नंतर जेव्हा केव्हा ते हैदराबादला यायचे, तेव्हा मला राजभवनात आवर्जून बोलवायचे आणि कॉम्प्युटरशी संबंधित तंत्रज्ञानाबद्दल माहिती घ्यायचे."
 
अजून तेलुगू फॉन्ट विकसित करण्याच्या दिशेने काय काय सुरू आहे, हे ते विचारायचे. ते विचारायचे की, जितक्या सहजपणे आपण इंग्रजीमध्ये एडिटिंग करू शकतो, तितक्या सहजपणे इतर भारतीय भाषांमध्ये का करू शकत नाही? तेलुगू आणि इतर भारतीय भाषांमध्ये अधिक फॉन्ट का मिळत नाहीत?
 
पुरुषोत्तम कुमार पुढे सांगतात की, तेव्हा हे शक्य नव्हतं. मात्र सध्या या गोष्टी अस्तित्त्वात आहेत.
 
नरसिंह राव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या व्यक्तीने भारतीय भाषांमधला पहिला मल्टी कलर फॉन्ट प्रसिद्ध केला होता. राव यांच्या नावानेच या फॉन्टचं नाव ठेवण्यात आलं.
 
जुन्या आठवणींना उजाळा
प्रभाकर राव आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना सांगतात, "नरसिंह राव यांना तंत्रज्ञानात विशेष रुची होती. तरुणपणी त्यांच्या गावात वीज नसायची, तेव्हा ऑइल इंजिनची दुरुस्ती ते स्वतः करायचे. अगदी तेव्हापासून कॉम्प्युटर युगापर्यंत तंत्रज्ञानाबद्दलचं त्यांचं आकर्षण कायम होतं.
 
2003 पासून बेंगळुरूचे माझे काही मित्र मला भेटायला दिल्लीला आले होते. ते सगळेजण माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातच कार्यरत होते आणि शिष्टाचार म्हणून त्यांना माझ्या वडिलांना भेटायचं होतं. विचारपूस झाल्यानंतर वडिलांनी माझ्या मित्रांना त्यांच्या कामाबद्दल विचारलं. त्यानंतर त्यांच्यात आयटी क्षेत्रातील बदल, नवीन संशोधन आणि उपयुक्ततेबद्दल दोन तास चर्चा सुरू होती.
 
नरसिंह रावांची मुलगी सुरभी वाणी देवी सांगतात, "ते स्वतःचं सगळं शिकायचे. 'सेल्फ लर्निंग'वर त्यांचा विश्वास होता. आपण कसं प्रोग्रॅम करू यावर कॉम्प्युटर काम कसं करतो, हे अवलंबून असतं, असं ते म्हणायचे. त्यांनी जेवढ्या प्रोग्रॅमिंगच्या भाषा शिकल्या होत्या, त्या सगळ्या स्वयंशिक्षणातूनच शिकल्या होत्या."
 
त्या पुढे सांगतात, "पुस्तकांपाठोपाठ कॉम्प्युटरशी त्यांची सर्वाधिक मैत्री होती. त्यांनी आपलं आत्मचरित्र स्वतःचं लॅपटॉपमध्ये टाइप केलं होतं. आपले लेख आणि भाषणंही ते स्वतःच लॅपटॉपमध्ये टाइप करायचे. अगदी मृत्यूच्या पंधरा दिवस आधीही ते लॅपटॉपवर काम करत होते."
 
म्युझिक की-बोर्ड
2002 साली पीव्ही नरसिंह रावांना बोटांमध्ये त्रास जाणवायला लागला.
 
डॉक्टरांनी त्यांना एक सॉफ्ट बॉल देऊन व्यायाम करायला सांगितलं. त्यांनी दोन दिवस तो व्यायाम केला, पण त्यांना काही तो फार आवडला नाही. त्यामुळे त्यांनी म्युझिक की-बोर्ड शिकायला सुरूवात केली.
 
नरसिंह रावफोटो स्रोत,PVNR FAMILY/GOI
त्यांना संगीत खूप आवडायचं. तरुणपणी ते हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकले होते आणि कधीकधी त्याचा रियाजही करायचे. बोटांमध्ये त्रास जाणवायला लागल्यानंतर त्यांनी पुन्हा याचा अभ्यास करायला सुरूवात केली आणि ते की-बोर्ड वाजवण्यात पारंगतही झाले.
 
प्रभाकर राव सांगतात, "मृत्यूच्या सहा महिने आधी त्यांनी मला म्हटलं होतं की, मी आता एखादा संगीताचा कार्यक्रम करायलाही तयार आहे. त्यांनी इतक्या सखोलपणे संगीताचा अभ्यास केला होता."
 
पी.व्ही. नरसिंह रावांच्या 'द इनसायडर' या आत्मचरित्राचं तेलुगूमध्ये 'लोपाली मनीषी' या नावानं भाषांतर करणारे कल्लुरी भास्करम सांगतात, "कॉम्प्युटरच्या वापरापेक्षाही त्यांचं स्वतःचं डोकंच कॉम्प्युटरप्रमाणे चालायचं. त्यांच्या मेमरीमध्ये सगळ्या गोष्टी साठवल्या जायच्या. हजारो लोकांना ते भेटायचे. मात्र एखाद्या व्यक्तीला जेव्हा ते दुसऱ्यांदा भेटायचे तेव्हा ते आधीच्या भेटीत ज्या मुद्द्यावर संभाषण संपलं असेल, त्याच मुद्द्यावरून पुढं सुरू करायचे. अनेक वर्षांनंतरही त्यांना आपण जे बोललो आहोत, ते लक्षात राहायचं."
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती