जिओ मार्टः मुकेश अंबानी यांची कंपनी अॅमेझॉनला टक्कर देणार
शुक्रवार, 3 जानेवारी 2020 (12:14 IST)
ऑनलाईन रिटेल विश्वात दबदबा असणाऱ्या अॅमेझॉनला आता रिलायन्सच्या जिओ मार्टची स्पर्धा असेल. रोजच्या गरजेच्या वस्तू घरपोच देणारी ही सेवा वापरण्यासाठी मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून लोकांना 'इनव्हिटेशन' दिलं जातंय.
या नव्या व्यवसायात आघाडी घेण्यासाठी कंपनी त्यांच्या मोबाईल फोन ग्राहकांची मदत घेण्याच्या प्रयत्नात आहे.
त्यामुळे ही नवी ई-कॉमर्स सेवा सध्याच्या आघाडीच्या कंपन्यांना मोठं आव्हान उभं करू शकते.
मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओने एकत्र येत या जिओमार्ट (JioMart) सेवेची सुरुवात केली आहे.
रोजच्या आयुष्यात लागणाऱ्या वस्तूंची (Grocery Goods) मोफत आणि वेगवान(Express) डिलिव्हरी आपण देत असल्याचं जिओमार्टने म्हटलंय. सध्या या यादीत 50,000 वस्तू आहेत.
पण प्रतिस्पर्धी कंपन्यांप्रमाणे जिओमार्ट स्वतः या वस्तूंची डिलिव्हरी करणार नसून यासाठी स्थानिक दुकानांना अॅपद्वारे जोडण्यात येईल. हीच दुकानं त्यांच्याकडच्या वस्तू ग्राहकांपर्यंत घरपोच करतील.
भारतातील ऑनलाईन ग्रोसरी मार्केट अजूनही सुरुवातीच्या टप्प्यात आहे. सध्या या क्षेत्रात वर्षाला 870 दशलक्ष डॉलर्सची उलाढाल होते आणि एकूण लोकसंख्येच्या फक्त 0.15% जनता ही सेवा वापरते.
पण 2023पर्यंत यामध्ये वाढ होऊन या क्षेत्राची उलाढाल 14.5 अब्ज डॉलर्सवर पोहोचेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
भारतातल्या इ-कॉमर्स मार्केटमध्ये सध्या अॅमेझॉन आणि वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टचा दबदबा आहे.
परदेशी मालकी असणाऱ्या ऑनलाईन रिटेलर्सवर त्यांच्या स्वतःच्या उपकंपन्यांमार्फत वस्तू विकण्याबाबत निर्बंध घालणारे नवीन नियम गेल्या वर्षी भारत सरकारने आणले. त्याचा या दोन्ही कंपन्यांना मोठा फटका बसला होता. याचा फायदा भारतीय कंपन्यांना मिळेल.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष असणाऱ्या मुकेश अंबानींकडे 60 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असल्याचा अंदाज आहे.
या समूहाचा मूळ उद्योग हा ऑईल रिफायनरीचा असला तरी रिटेल आणि टेलिकॉमसह इतर अनेक क्षेत्रांत त्यांची मोठी गुंतवणूक आहे.
रिलायन्स रिटेलच्या मालकीची भारतात किराणा मालाची दुकानंही आहेत. शिवाय ह्युगो बॉस (Hugo Boss) बर्बेरी (Burberry) यासारख्या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डच्या भारतातल्या शोरूम्स त्यांच्या मालकीच्या आहेत.
हॅम्लेज (Hamleys) ही खेळण्यांच्या दुकांनांची कंपनी रिलायन्सने 2019मध्ये विकत घेतली होती. तर रिलायन्स जिओ कंपनी भारतातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर असून त्यांचे 360 दशलक्षांपेक्षा जास्त ग्राहक आहेत.
भारतातल्या उद्योगविश्वामध्ये घरपोच वस्तू देण्याची सेवा ही महत्त्वाची ठरणार हे फार पूर्वीच हेरण्यात आलं होतं.
इंटरनेट आणि स्मार्टफोन्स वापरणाऱ्यांचं प्रचंड मोठं प्रमाण आणि घरपोच वस्तू देणारं क्षेत्र विस्कळीत असणं यामुळे अॅप्सवर आधारीत सेवांना इथे मुबलक संधी आहेत.
वॉलमार्ट आणि अॅमेझॉनसह जगात अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध कंपन्यांना याचा फायदा घ्यायचा आहे.
पण रिलायन्ससाठी ही गोष्ट अगदीच सोपी असेल. कारण त्यांच्या टेलिकॉम नेटवर्कच्या माध्यमातून जोडले गेलेले लाखो ग्राहक त्यांच्या हाताशी आहेत. शिवाय त्यांच्या मालकीची ग्रोसरी - वाणसामानाची दुकानं आहेत आणि रिटेल स्टोअर्स आणि आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसही त्यांच्याकडे आहेत.
शिवाय एक भारतीय कंपनी असल्याचा फायदाही त्यांना मिळले. देशांतर्गत उद्योगाला संरक्षण देण्यासाठी सरकारने केलेल्या नियमांमुळे अॅमेझॉन आणि वॉलमार्टचा विस्तार रोखून धरण्यात आलेला आहेत.
पण असं असलं तरी आधीपासून मार्केटमध्ये असणाऱ्या बिग बास्केट आणि ग्रोफर्ससारख्या भारतीय कंपन्यांची स्पर्धा रिलायन्सच्या जिओमार्टला असेल.
रिलायन्स समूह या क्षेत्रात उद्योगासाठी उतरतो, तिथली समीकरणं बदलून टाकतो. ऊर्जा, तेल निर्मिती, रिटेल आणि टेलिकॉम क्षेत्रात हे यापूर्वी घडलेलं आहे.
त्यामुळेच ई-कॉमर्स क्षेत्रातही असंच काही घडल्यास नवल नाही.