आई ZPच्या शाळेत भात शिजवते, मुलानं मिळवली 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप
सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (20:10 IST)
Author,श्रीकांत बंगाळे
social media
बीड जिल्ह्यातल्या रोहतवाडी गावचे तरुण डॉ. महेश नागरगोजे यांना प्रतिष्ठेची डॉ. मेरी क्यूरी फेलोशिप जाहीर झाली आहे. युरोपियन कमिशनकडून ही फेलोशिप दिली जाते.
महेश यांना एकूण 1 लाख 89 हजार युरो म्हणजेच जवळपास 1 कोटी 70 लाखांची फेलोशिप मिळाली आहे.
या फेलोशिप अंतर्गत महेश पुढची 2 वर्षं ब्रेन स्ट्रोक्स या आजारासंदर्भात संशोधन करणार आहेत.
पण, महेश यांनी ही फेलोशिप कशी मिळवली, त्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.
रोहतवाडी गावात प्रवेश केल्यानंतर महेश यांच्या स्वागताचं मोठं बॅनर लागलेलं दिसून येतं. गावातील पारापासून थोडंसं आत चालत गेलं की महेश यांचं घर येतं.
याच घरापासून महेश यांच्या प्रवासाची सुरुवात होते. महेश 11 महिन्यांचे असताना त्यांच्या शेतकरी वडिलांचं निधन झालं.
त्यानंतर महेश आणि त्यांच्या मोठ्या भावाची जबाबदारी त्यांची आई गयाबाई नागरगोजे यांच्याकडे आली.
गयाबाई यांनी त्यांच्याकडील शेती, प्रसंगी मजुरी करून मुलांना शिकवायचं ठरवलं. गयाबाई गेल्या 15 हून अधिक वर्षांपासून गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत भात शिजवायचं काम करत आहेत.
आम्ही त्यांच्या घरी पोहचलो तेव्हा त्या नुकत्याच शाळेतून घरी परतल्या होत्या.
महेशसुद्धा त्यांच्या आतापर्यंतच्या यशाचे सर्व श्रेय आई गयाबाई यांना देतात.
“मला फेलोशिप मिळाल्यानंतर आईच्या चेहऱ्यावर मी जे हास्य बघितलं, ते पैशात कुठेही विकत घेऊ शकत नाही,” असं ते सांगतात.
महेश यांचं गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झालं. पुढे 11वी आणि 12 वीचं शिक्षण तालुक्याच्या ठिकाणी म्हणजेच पाटोदा इथं झालं.
पुढे त्यांनी शिवाजी विद्यापीठातून इंजिनियरिंग पूर्ण केलं. त्यानंतर आयआयटी गुवाहाटीमधून पीएचडी पूर्ण केली.
त्यावेळी त्यांच्या शोधनिबंधाचा विषय Modelling of blood flow in human body हा होता.
त्रिवेंद्रम इथल्या श्रीचित्रा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इथं न्यूरोसर्जरी विभागात रिसर्च असोसिएट म्हणून त्यांनी एक वर्षं नोकरी केली.
डॉ. मेरी क्युरी ही जगातील प्रतिष्ठित फेलोशिपपैकी एक आहे. महेश यांना पोस्ट डॉक्टरल रिसर्चसाठी ही फेलोशिप जाहीर झाली आहे.
या फेलोशिपविषयी माहिती कुठून मिळाली, याविषयी महेश सांगतात, "आयआयटी गुवाहाटीतील माझ्या एक दोन सीनिरयर्सना ही फेलोशिप मिळाली होती. ही फेलोशिप प्रतिष्ठित असल्यामुळे आपणही मिळवायची हे मी ठरवलं होतं. दुसरं कारण म्हणजे ही फेलोशिप खूप जास्त सॅलरी देते. मला 1 कोटी 70 लाखांचं फंडिंग पुढच्या दोन वर्षांकरता दिलं आहे."
अर्ज कुठे आणि कसा करायचा?
महेश पुढे सांगतात, "माझ्या संशोधनाचा विषय हा स्ट्रोकबद्दल आहे. स्ट्रोक आजकाल खूप कॉमन होत चालला आहे. स्ट्रोकमध्ये तुमच्या ब्रेनच्या आर्टरीमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. यामुळे मेंदूला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही आणि मग अनेक समस्या निर्माण होतात.
"कुणाला पॅरालिसिस होतो, कुणाचा मृत्यूही होतो. जे वाचतात त्यांनाही पूर्ण आयुष्यभर पॅरालिसिस सोबत घेऊन जगावं लागतं. ब्रेन स्ट्रोकच्या उपचारानंतरही लोकांना समस्या जाणवत आहे, हा या उपचाराचा मुख्य ड्रॉबॅक आहे. या समस्या कशा कमी करता येतील, तेच माझं काम असणार आहे."
या फेलोशिपसाठी अर्ज कुठे करायचा, याविषयी महेश सांगतात, "युरोपियन युनियकडून ही फेलोशिप दिली जाते. या फेलोशिपसाठी युरोपियन कमिशनच्या वेबसाईटवर अर्ज करता येतो. MSCA Postdoctoral Fellowship असं सर्च केल्यानंतर तुम्हाला याची माहिती मिळेल.
"या वेबसाईटवर फेलोशिप संदर्भात अनेक बुकलेट दिले जातात. ते तुम्ही वाचू शकता. यूरोपियन कमिशनची जी माणसं ही फेलोशिप देतात, त्यांनी यूट्यूबवरती यासंदर्भात अनेक वेबिनार टाकले आहेत. ते पाहूनही बरीच माहिती मिळते."
निवड प्रक्रियेत काय महत्त्वाचं?
फेलोशिपच्या निवड प्रक्रियेविषयी महेश सांगतात, "या फेलोशिपसाठी मे 2022 मध्ये माझा युरोपियन कमिशनसोबत संवाद सुरू झाला. सप्टेंबर महिन्यात अर्ज करण्याची अंतिम मुदत होती. त्याचवेळी मी अर्ज केला.
"दुसऱ्या पीढीचे शास्त्रज्ञ तयार करणं हाच युरोपियन युनियनचा मुख्य उद्देश आहे. त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण देऊन समाजोपयोगी रिसर्च करिअरसाठी त्यांना पाठवणं हा यामगचा हेतू आहे. त्यामुळे तुमचा रिसर्च टॉपिक हा लोकांच्या कल्याणाशी संबंधित असेल असाच निवडा, हे मी विद्यार्थ्यांना सांगेल."
महेश यांना फेलोशिपच्या निमित्तानं लॉटरी लागली, असंही गावात काही जण म्हणतात.
महेश याविषयी सांगतात, "लकी, लॉटरी या गोष्टी एक्झिस्ट करत नाहीत. लॉटरी वगैरे असं काही नसतं. अपयश येतं, पण त्याला सकारात्मकपणे समोर जायचं असतं. मलाही अपयश आलं, त्यातून मी शिकत शिकत पुढे आलो. माझा हा प्रवास 2008 ला सुरू झाला, आज 2022 आहे. हे थोडंसं नाव कमवायला मला 14 वर्षं लागली. "
'काम चालूच ठेवणार...'
आपल्या मुलाला ही फेलोशिप मिळेपर्यंत गयाबाई नागरगोजे यांना या फेलोशिपबद्दल काहीही माहिती नव्हतं.
पण महेश यांचं माध्यमं आणि गावात कौतुक व्हायला लागल्यावर गयाबाई यांनाही आनंद झाला.
त्यासोबत त्यांना आठवला तो त्यांचा आतापर्यंतचा संघर्ष.
गयाबाई सांगतात, "मालक वारले तेव्हा मुलं लहान होते. ते शाळेतही नव्हते जात तेव्हा. तेव्हापासून मी शेळ्या पाळणं, मजुरी करणं, याशिवाय शाळेत भात शिजवणं ही काम केली. 16 वर्षांपासून मी हे काम करत आहे."
"त्यावेळी मोठं संकट पुढं होतं. पण संकटाला तोंड देत आपण चालायचं. त्यामुळे मला तो प्रवास काहीच वाटला नाही," असंही गयाबाई सांगतात.
गयाबाई यांचा मोठा मुलगा बीड येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक आहे आणि महेश यांना फेलोशिप मिळाली आहे.
तुम्ही आता भात शिजवायचं काम थांबवणार का, असं विचारल्यावर गयाबाई म्हणतात, "काम नाही थांबवणार, ते चालूच ठेवणार. थांबून कसं चालेल?"