महिलेने सुरू केलं टिकटॉक, सापडला सोडून गेलेला पती

गेल्या काही दिवसांपासून टिकटॉक या अॅपची सर्वत्र चर्चा असल्याचं पाहायला मिळतं. नेटिझन्स टिकटॉकवर वेगवेगळ्या गाण्यांवर आणि फिल्मी संवादांवर डबस्मॅश व्हीडिओ तयार करून आपल्या मित्रांमध्ये शेअर करतात.
 
कुणी किती चांगल्या प्रकारे अभिनय केला याच्या गप्पा सोशल मीडियावर रंगतात. यातून अनेक टिकटॉक सेलेब्रिटीही निर्माण झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं आहे.
 
आजवर फक्त मनोरंजनासाठीच टिकटॉकचा उपयोग करण्यात आला होता. पण, तामिळनाडूमधल्या एका महिलेला टिकटॉकचा उपयोग वेगळ्याच प्रकारे झाला. त्या महिलेला सोडून गेलेला नवरा तिला तीन वर्षांनंतर टीकटॉकवर सापडला.
 
तामिळनाडूमधल्या विलुप्पूरम जिल्ह्यात राहणारी एक महिला रेखा (बदललेलं नाव) हिचा पती सुरेश तिला 2016 पासून सोडून गेला होता. सुरेश बेपत्ता झाल्यानंतर रेखाने जवळच्या पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो सापडला नाही.
 
काही दिवसांपूर्वी रेखाच्या एका नातेवाईकाने टिकटॉक व्हीडिओमध्ये सुरेशला पाहिलं. या व्हीडिओत तो एका तृतीयपंथीयासोबत होता. रेखाला ही बाब कळताच तिने याबाबत पोलिसांना कळवलं.
 
पोलिसांनी जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या संघटनेशी संपर्क साधून व्हीडिओतील तृतीयपंथीयाची ओळख पटवली. त्या दोघांचा माग काढून शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 
महिला राहत असलेल्या विलुप्पूरमपासून २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या होसूरमध्ये सुरेश राहत होता. व्हीडिओतील तृतीयपंथीयासोबत तो रिलेशनशीपमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांनी बीबीसीला दिली.
 
सुरेश सापडल्यानंतर त्याची आणि महिलेची भेट घडवण्यात आली. दोघांचंही समुपदेशन करण्यात आलं. आता दोघंही पुन्हा एकत्र नांदत असल्याचं पोलिसांनी कळवलं.
 
टिकटॉक अॅपमध्ये यूझर्स व्हीडिओ तयार करून शेअर करू शकतात. भारतात हे अॅप विशेष लोकप्रिय ठरलं आहे.
 
सध्या देशात १२ कोटींहून जास्त टिकटॉक वापरकर्ते आहेत. पण अनेकवेळा त्याच्यातील कंटेंटच्या दर्जाबाबत टिकटॉकवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसते.
 
टिकटॉकवर अश्लील कंटेंट असल्याच्या मुद्द्यावरून एप्रिल महिन्यात तामिळनाडू उच्च न्यायालयाने अप स्टोअरवरून टिकटॉक हटवण्याचे आदेश दिले होते. पण एका आठवड्यानंतर टिकटॉकवरची बंदी हटवण्यात आली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती