मानसिक आरोग्य : वृद्धांमधली 'ही' लक्षणं शारीरिक नाही मानसिक आजाराची आहेत, हे कसं ओळखायचं?
गुरूवार, 28 जानेवारी 2021 (22:28 IST)
'ते' साठी ओलांडलेले आर्थिकदृष्ट्या सुबत्ता असलेल्या घरातले गृहस्थ. सगळं रुटीन कसं एकदम आखीव-रेखीव.
सकाळी उठल्यावर योगा, दहा वाजता मित्रांसोबत गप्पाटप्पांची बैठक, किरकोळ कामं, शनिवार-रविवार शहरापासून जवळच असलेल्या गावातील शेतीची कामं पाहून येणं...हे असंच सुरू राहिलं असतं. पण, कोरोनाचा प्रादूर्भाव वाढायला लागला. तो रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाला. अनेक गोष्टींवर निर्बंध आले.
महिन्याभरात, दोन महिन्यात, सहा महिन्यात कोरोनाचं संकट टळेल, अशीच सगळ्यांप्रमाणे त्यांचीही अपेक्षा होती. पण तसं काही झालं नाही. वयोमानाप्रमाणे येणारे ब्लड प्रेशर, डायबिटीस सारखे आजार त्यांना असल्यामुळे पत्नी, मुला-सुनांकडून जास्त काळजी घेतली जात होती. बाहेर पडणं बंदच झालं.
घरात बसून बसून उलटसुलट विचार सुरू झाले. 'आता मी शारीरिकदृष्ट्या सक्रीय नाही. मग अशात तब्येतीचे त्रास उद्भवले तर? हार्ट अटॅकच आला म्हणजे? मी जात नाहीये तर माझ्या शेतीवाडीचं काय होईल?' एक ना अनेक विचार...ते खोलीतच एकटे बसून राहायला लागले.
कोणत्याही गोष्टी रस वाटेनासा झाला. चिंता किंवा Anxiety सुरू झाली. हळूहळू ते नैराश्याकडे जायला लागले. चिडचिड, अस्वस्थता, छातीतली धडधड अशी लक्षण दिसत असल्यामुळे कुटुंबीयांनी कार्डिओलॉजिस्टना दाखवलं, मात्र सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले. मग डॉक्टरांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जाण्याचा सल्ला दिला.
डिप्रेशनची लक्षणं मध्यम ते तीव्र स्वरुपाच्या सीमारेषेवरची होती, त्यामुळे तातडीनं औषधं सुरू करावी लागली. साधारण सहा महिन्यांचे औषधोपचार आणि समुपदेशनानंतर त्यांना आता बरं वाटू लागलंय.
त्यांनी स्वतःच्या हिमतीवर व्यवसाय उभा केला होता. 62-63 वय झालं असलं तरी नियमित ऑफिसात जायचे. पण कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सगळं विस्कळीत झालं. आर्थिक चणचण नव्हती, पण बाहेर पडणं बंद झालं. स्टाफसोबतच्या, लोकांसोबतच्या गाठीभेटी बंद झाल्या.
पैशांचा प्रश्न नव्हता, पण करायला विशेष काहीच नव्हतं. अचानक आयुष्यात निर्माण झालेल्या या पोकळीमुळे हळूहळू नैराश्य यायला लागलं. जरा वातावरणात बदल होईल म्हणून घरच्यांनी गावी पाठवलं. पण तिथे गेल्यावर त्यांनी चक्क आत्महत्येचा प्रयत्न केला.
कोरोनामुळे आपल्या आयुष्यात अनेक बदल घडले. 'न्यू नॉर्मल' म्हणत आपण कोरोनासोबत जगण्याची सवय करून घ्यायला लागलो. पण हे झालेले बदल स्वीकारणं सर्वांसाठी तितकं सोपं नक्कीच नव्हतं. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाकाळात बाहेर पडण्यावर, फिरण्यावर जे निर्बंध आले, त्याच्याशी जुळवून घेणं फारच अवघड गेलं. त्यामुळेच अनेकांना मानसिक ताणही जाणवायला लागला.
"बऱ्याचजणांना साठीनंतर हाडाचे, हार्ट प्रॉब्लेम, डायबीटिस, थायरॉईड सारखे वेगवेगळे आजार सुरू होतात. दुर्दैवाने, जोडीदारापैकी एकाचं निधन झालं असेल तर एकाकीपण येतं. सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे तुटलेपणाही येतो. शिवाय आर्थिकदृष्ट्या मुलांवर अवलंबून असाल तर त्या चिंताही असतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना इतरांच्या तुलनेत मानसिक तणाव चटकन येऊ शकतो," मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप चांडक सांगत होते.
कोरोनाकाळात काही नव्या चिंतांचीही भर पडली.
"साठी-पासष्ठी ओलांडलेल्या ज्येष्ठांना घरातले लोक काळजीपोटी बाहेर जाऊ देत नव्हते. बातम्यांमधून मृतांचे आकडे यायचे. आजूबाजूलाही अमक्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशाप्रकारच्या चर्चा कानावर यायच्या. अजूनही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही आणि को-मॉर्बिडिटी असलेल्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका आहे.
त्यामुळेच आपल्याला काही झालं तर ही भीती अनेक वृद्धांना सतावायला लागली. त्यातूनच अँक्झायटी, डिप्रेशन आणि पॅनिक अटॅक्सचं प्रमाण ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढलं," असं जेजे हॉस्पिटलच्या सायकिअट्री विभागात असिस्टंट प्रोफेसर असलेल्या डॉ. प्रखर जैन यांनी सांगितलं. डॉ. जैन हे सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या कोव्हिड कौन्सिलिंग सेंटरचे इन चार्ज आहेत.
डॉ. जैन यांनी कोरोना काळात वाढलेल्या मानसिक आरोग्यांच्या समस्यांचं अजून एक कारण सांगितलं. "लॉकडाऊनचे नियम जेव्हा अतिशय कडक होते, त्याकाळात ज्या रुग्णांची आधीच ट्रीटमेंट सुरू होती, ती काही काळासाठी थांबली. प्रत्येकालाच समुपदेशनासाठी, औषधं घेण्यासाठी येणं शक्य झालं नाही. त्यामुळे डिप्रेशन, स्क्रिझोफ्रेनिया किंवा इतर मानसिक आजारांची लक्षणं अधिक तीव्र झाली. सेंट जॉर्जच्या ओपीडीत असे अनेक पेशंट आले, ज्यांना मग आम्हाला सुरूवातीपासून ट्रीटमेंट द्यावी लागली."
ज्येष्ठ नागरिकांमधली तणावाची, मानसिक आजाराची लक्षणं ओळखायची कशी?
वयाच्या एका टप्प्यानंतर काही आजार उद्भवू शकतात. हृदयाशी संबंधित आजार, शुगर, थायरॉईडससारख्या समस्या असतात. या आजारांमध्ये आढळणारी काही लक्षणं आणि मानसिक तणावामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांमधली लक्षणं समान असतात. अशावेळी नेमकी समस्या काय आहे हे ओळखायचं कसं?
डॉ. चांडक यांनी वृद्धांमध्ये मानसिक-शारीरिक समस्यांची काही समान लक्षणं सांगितली-
चिडचिडेपणा वाढतो. छोट्या-छोट्या गोष्टींचा राग येऊ लागतो.
रुटिनमध्ये मन रमत नाही.
अवास्तव गोष्टींवर विचार
झोप वाढते किंवा कमी होते.
भविष्याबाबत अनिश्चितता वाढते.
छातीत धडधड होणे
अचानक घाम येणे.
मग अशी लक्षणं दिसायला लागली की नेमकं काय करायचं? डॉ. प्रीतम चांडक यांनी घरातील ज्येष्ठांमध्ये अशा स्वरुपाची लक्षणं आढळल्यास नेमकं काय करायचं हे सांगताना म्हटलं की, जर असं काही आढळून आलं, तर सर्वांत आधी डॉक्टरांकडे जायला हवं. ते ईसीजी आणि आवश्यक त्या चाचण्या करायला सांगतात. समजा या रिपोर्ट्समध्ये काही आढळलं नाही, तर 'फॉल्स सिग्नल' म्हणून सोडून देऊ नका. मानसोपचार तज्ज्ञांचाही सल्ला घ्या. अनेकदा डॉक्टरही हेच सुचवतात.
कोणती काळजी घ्यायला हवी?
डॉ. प्रखर जैन यांनी एक गोष्ट आवर्जून सांगितली. जर तुमची डिप्रेशन, अल्झायमर, स्क्रिझोफ्रेनिया किंवा इतर कोणत्याही आजाराची ट्रीटमेंट सुरू असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत बंद करता कामा नये.
यासोबतच डॉ. जैन यांनी इतरही काही गोष्टी सांगितल्या ज्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव टाळायला अधिक मदत होऊ शकते.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे वयस्कर लोकांनी संवादाचा धागा तुटू देता कामा नये. त्यांनी बोलत राहायला हवं. आमच्या ग्रुप कौन्सिलिंगमध्येही आम्ही नेहमी संवाद साधण्याचा तसंच एकमेकांना मदत करण्याचा (थेरपेटिक कम्युनिटी) सल्ला देत असतो, असं डॉ. जैन यांनी म्हटलं.
डॉ. जैन यांनी सांगितलं, "जुने छंद पुन्हा जोपासण्याचा, एखादी राहून गेलेली गोष्ट शिकून घेण्याचाही सल्ला ते देतात. त्याचप्रमाणे कोणताही स्ट्रेस किंवा टेन्शन जाणवत असेल तर तज्ज्ञांची मदत तातडीने घ्या. तुमची कोणतीही मेडिकल ट्रीटमेंट किंवा औषधं थांबवू नका."
डॉ. प्रीतम चांडक यांनी म्हटलं, "प्रत्येकाच्या आयुष्याकडून बऱ्याच अपेक्षा असतात. पण अपेक्षा आणि वास्तव यात फार फरक असेल तर मात्र ताण येतो. अनेकदा लोक विचार करतात की, मी दहा वर्षांपूर्वी पंधरा तास करायचो. पण आता मात्र... वयानुरूप तुमच्या क्षमता बदलत जातात, हे स्वीकारायला हवं तुम्ही. जर हे नाही स्वीकारलं तर नकारात्मकता येऊ शकते."
"स्वतःला रिकामं ठेवू नका. छंद, सामाजिक कार्यात गुंतवून घ्या. व्हॉट्स अप, फेसबुक या आपल्या जगण्याचा भाग झालेल्या गोष्टी शिकून घ्या, जेणेकरून लोकांसोबतचा 'कनेक्ट' तुटणार नाही, " असं डॉ. चांडक यांनी म्हटलं.
व्यायाम आणि आहार या दोन गोष्टीही सांभाळायला हव्यात, असं डॉ. चांडक यांनी आवर्जून सांगितलं. "कोणताही छोटासा व्यायाम करत राहा, कारण त्यामुळे अँटी स्ट्रेस हार्मोन रिलीज होतात. वयोमानानुसार पचनशक्ती कमी होते. त्यानुसार पौष्टिक पण तब्येतीला मानवेल असा आहार घ्या."
"सर्वांत महत्त्वाचं म्हणजे 'शेअर करा.' तुम्हाला कोणतीही लक्षणं जाणवत असेल तर बोला," असं डॉ. चांडक यांनी म्हटलं.