रात्री उशिरापर्यंत जागं राहणं आणि पुरेशी झोप न घेणं, यातून डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात. पण इतरही काही गोष्टी यासाठी कारणीभूत ठरतात का?
चेहरा तुलनेने केसरहित असण्याचे काही उघड फायदे आहेत. उदाहरणार्थ, कमी केस म्हणजे परजीवींना लपण्यासाठी कमी जागा उपलब्ध असणं, आणि अधिक त्वचा मोकळी राहिल्याने घाम अधिक कार्यक्षमतेने आपलं शरीर थंड ठेवायचं काम करू शकतो.
तरी, त्वचा मुळात बहुतांशाने मोकळी असते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला स्वतःच्या भावभावना इतरांपर्यंत सहजपणे पोचवणं शक्य होतं, पण त्याचे काही तोटेही आहे: तुम्ही थकलेले असाल की कोणालाही ते चटकन कळू शकतं.
डोळ्यांखाली काळी वर्तुळं येण्यात वैद्यकीयदृष्ट्या चुकीचं काहीच नाही. किमान बहुतांश वेळा त्यात काही गैर नसतं. पण जर्नल ऑफ कॉस्मेटिक डर्मेटॉलॉजीमध्ये 2007 साली ब्राझिलियन संशोधनक फर्नांडा मॅगाग्निन फ्रेइटाग यांनी नमूद केल्यानुसार, काळी वर्तुळं "आपल्या शरीरशास्त्राच्या मर्यादेतच असली," तर अनेक रुग्णांना "त्याने बरीच चिंता वाटत राहते, काहींना तर डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं आपल्या जीवनमानाला बाधा पोचवतात असंही वाटतं." त्वचेशी संबंधित अवस्थांचे मानसिक वा भावनिक क्लेशाच्या रूपात होणारे परिणाम तपासण्यासारखे आहेत. रूढ अर्थाने यातून आरोग्याला धोका उत्पन्न होत नसला तरी असा शोध घेणं रोचक ठरेल.
"काळी वर्तुळं" ही अर्थातच वैद्यकीय संज्ञा नाही आणि अशाच प्रकारचा परिणाम साधणाऱ्या विविध घटकांना ती लागू होऊ शकते. या विशिष्ट परिणामासाठी वापरली जाणारी वैद्यकीय संज्ञा "periorbital hyperpigmentation" किंवा POH ही आहे. पूर्वीपासून त्वचाविज्ञानातील संशोधकांच्या प्राधान्यक्रमावर हा विषय न राहिल्यामुळे त्याबद्दल खूप कमी माहिती आहे.
पण एक गोष्ट आपल्याला नक्की माहिती आहे, ती अशी: आपल्या डोळ्यांखालची त्वचा विशेषत्वाने पातळ असते, त्यामुळे ती तितकीच पारदर्शकही राहते. त्यामुळे तिथल्या रक्तवाहिन्या अधिक ठळक होतात, त्याचा परिणाम म्हणून ती त्वचा अधिक गडद वाटू शकते.
"डोळ्यांखाली काळी वर्तुळं आल्याची तक्रार घेऊन कोणी माझ्याकडे आलं की, मला प्रत्यक्ष ते पाहून तपासणी करावीशी वाटते," असं यूसीएलएमधील त्वचाविज्ञानाच्या निवासी डॉक्टर हेली गोल्डबाख म्हणतात.
पीओएच होण्याच्या अनेक संभाव्य कारणांपैकी एक कारण ही त्वचा पातळ असणं हे आहे. "काळी वर्तुळं आहेत, म्हणजे त्यांच्या डोळ्यांखाली प्रत्यक्षात काळी वर्णक असू शकतात, त्यांच्या डोळ्यांपाशी छाया परिणाम दिसत असू शकतो, किंवा त्या भागातून जाणाऱ्या नसा अधिक ठळक झालेल्या असू शकतात."
यातील कोणती शक्यता रास्त आहे, ते शोधण्यासाठी गोल्डबाख ती त्वचा ताणतात. अशाने तो भाग आणखी काळसर पडला, तर तिथली वाहिनी-रचना सदोष आहे असा अंदाज बांधता येतो. ताणल्याने त्वचा पूर्ववत होण्याच्या जवळपास आली, तर त्वचेच्या ढिलेपणामध्ये समस्या असू शकते.
नाक, डोळे व गाल यांच्यामध्ये असणाऱ्या खाचेला त्वचावैज्ञानिक अश्रू-पन्हळ असं संबोधतात, कारण डोळ्यांमधून बाहेर येणाऱ्या अश्रूंना तिथून बाहेर पडायला जागा मिळते.
"आपलं वय वाढतं, तसं त्वचेच्या पृष्ठभूमीखालची चरबी कमी होते," गोल्डबाख सांगतात, आणि चरबी कमी झाल्याने अश्रू-पन्हळ आणखी खोलगट वाटू लागते. हा दृष्टिभ्रमासारखाच प्रकार असतो. चेहऱ्याच्या कडांच्या पृष्ठभूमीवरून जास्त प्रकाश परावर्तित होतो, त्याचा परिणाम म्हणून हा काळसरपणा दिसतो.
डोळ्यांखालच्या वर्तुळांचं कारण शोधण्यासाठी त्वचावैज्ञानिक रंगाचाही वापर करू शकतात. या वर्तुळांमध्ये निळी, गुलाबी किंवा जांभळी छटा असेल, तर रक्तवाहिन्यांमुळे रंगबदल झाल्याचं सूचित होतं. तिथे तपकिरी छटा असेल, तर त्वचेमध्ये जास्त मेलॅनिन आहे, असा त्याचा अर्थ होतो- काळ्या वर्तुळांचं हे बहुधा सर्वांत दुर्मिळ कारण असावं.
पण गोल्डबाख म्हणतात की, आपल्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं येण्याचं सर्वांत सर्रास दिसणारं कारण संरचनात्मक असतं- आपल्या सर्वांचंच वय वाढू लागल्यावर त्वचेखालील चरबी कमी होते, त्यातून हा परिणाम दिसतो. त्यामुळेच डोळ्यांखाली काळी वर्तुळं असलेले लोक जास्त थकल्यासारखे वाटतात.
पण स्थित्यंतर दर्शवणाऱ्या- म्हणजे पुरेसा आराम मिळाला नसेल तर दिसणाऱ्या अशा वर्तुळांबाबत ही स्पष्टीकरणं पुरेशी ठरत नाहीत.
"सूज येणं, हेदेखील डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांमागचं एक कारण आहे," असं गोल्डबाख सांगतात. काही वेळा जाग आल्यावर थोडा वेळ आपल्या डोळ्याखालची त्वचा नेहमीपेक्षा अधिक सूजलेली असते.
जास्त मीठ असलेलं जेवण खाल्ल्यास डोळे सुजण्याची शक्यता असते. त्यामुळे झोपायच्या आधी तुम्ही फ्रेंच फ्राइजवर ताव मारलेला असेल, तर उठल्यावर डोळ्यांखाली सूज नि काळसर वर्तुळं दिसू शकतात. त्याचा थकव्याशी काही संबंध असेलच असं नाही.
तणाव, मद्य व धूम्रपान यांच्याप्रमाणेच अतिनील किरणांशी संपर्क आल्यास POH परिणाम वाढू शकतो, असंही सुचवलं गेलेलं आहे. पण त्वचावैज्ञानिक रश्मी सरकार यांनी 2016 साली द जर्नल ऑफ क्लिनिकल अँड अस्थेटिक डरमेटॉलॉजीमध्ये लिहिलेल्या लेखात म्हटल्यानुसार, यातील कोणत्याही दाव्याची वैज्ञानिक सिद्धता झालेली नाही. लोकांना डोळे चोळावेसे का वाटतात किंवा रडावंसं का वाटतं, किंवा किमान थोडक्या कालावधीसाठी POH परिणाम का दिसतो, याबाबत अॅलर्जीच्या भूमिकेला आधार देणार कोणताही अनुभवजन्य पुरावा मिळालेला आहे.
ही काळी वर्तुळं तात्पुरती असल्यामुळे आणि त्यामागची कारणं इतकी प्रचंड संख्येने असल्यामुळे, हा मूलतः कॉस्मेटिक किंवा सौंदर्यदृष्टीचा प्रश्न आहे, असं त्वचावैज्ञानिकांना वाटतं. याबाबत कोणते उपचार उपयुक्त ठरतील याबद्दल समाधानकारक माहिती देण्यासाठी पुरेसं वैज्ञानिक संशोधन झालेलं नाही.
काळ्या वर्तुळांवर उपाय म्हणून ब्लिचिंग क्रिम बाजारात विकली जातात, रासायनिक साली व अगदी लेझर उपचारांपर्यंतचेही पर्याय सुचवले जातात. यावरच्या उपचारासाठी बुरशीतून आम्लं काढली जातात आणि पीअर झाडातून अंश काढला जातो. शिवाय, फिलर म्हणून त्वचेमध्ये इंजेक्ट करण्यासाठीचे काही पदार्थ मिळतात, आणि शस्त्रक्रियेच्या पातळीवरचेही काही उपाय आहेत. एका संशोधकाने जवळपास दोन महिने दर आठवड्यातून एकदा कार्बन डायऑक्साइडची इंजेक्शन त्वचेखाली घेण्याचाही प्रयत्न केला, त्याला बऱ्यापैकी यश मिळालं.
काही संशोधकांनी क जीवनसत्वाचं उपयोजन करायचा प्रयत्न केला आहे, तर इतर काहींनी फारशा परिणामकारक नसलेल्या तरीही स्मार्ट ठरणाऱ्या 'सनस्क्रिन' व 'यूव्ही-कोटेड सनग्लासेस' अशा पर्यायांचा वापर केल्याचं दिसतं.
"दिसण्यात सौम्य ते मध्यम पातळीवरची सुधारणा झाली, तरी रुग्णाच्या जीवनमानात सुधारणा होऊ शकते," असं सरकार म्हणतात. परंतु, अधिक पुरावा उपलब्ध होईपर्यंत डोळ्यांखालची काळी वर्तुळं अधिक शहाणीव आलेल्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य मानायला हरकत नाही.