महात्मा गांधी : मुन्नाभाईप्रमाणे गुन्हेगारी सोडून गांधीगिरीकडे वळलेल्या लक्ष्मण गोळेंबद्दल तुम्हाला माहितीये?
शनिवार, 30 जानेवारी 2021 (21:33 IST)
प्राजक्ता धुळप
बीबीसी मराठी
मुंबईत राहणारे लक्ष्मण गोळे गांधी विचारांचे प्रचारक म्हणून भारतभर फिरतात. ते सर्वोदय मंडळाचे 'ब्रॅण्ड अॅम्बेसिडर' आहेत.
गेली दहा वर्ष ते भारतभर वेगवेगळ्या तुरुंगातील बंदीसाठी गांधी परीक्षा घेतात. इतकंच नाही तर अनेकांना चांगलं माणूस म्हणून घडवण्यासाठी प्रयत्न करतात. आज त्यांची गांधीवादी समाजसेवक म्हणून ओळख आहे. हिंसा सोडून अहिंसेच्या मार्गाने जाणाऱ्या लक्ष्मण गोळे यांच्या धाडसी प्रवासाची ही कहाणी.
16 वर्षांचा लक्ष्मण पहिल्यांदा जेलमध्ये गेला, तेव्हा कारण वस्तीतल्या भांडणाचं होतं. झालं असं की, वस्तीत भांडण सुरू झालं, जमाव हमरीतुमरीवर आला आणि शिव्यांनी वातावरण अधिक तंग झालं. लक्ष्मणच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्याने जवळच्या सलूनमधून वस्तरा आणला आणि समोरच्याच्या मानेवर आणि गालावर सपासपा चालवला. नेमकं काय झालंय हे कळायच्या आतच त्याने तिथून काढता पाय घेतला होता.
जेव्हा लक्षात आलं की हातून काहीतरी घडलंय तेव्हा त्याचं धाडस वाढलं होतं. घटनेच्या ठिकाणावरुन पळून गेलेल्या लक्ष्मणला नंतर कळलं की वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
वस्तरा चालवू शकतो तर पोलीस स्टेशनला जायला वेगळं डेअरिंग कशाला लागतं, असं म्हणत पहिल्यांदा लक्ष्मण पोलीस स्टेशनची पायरी चढला. ज्याच्यावर वार झाला होता ती व्यक्ती वाचली होती. पण लक्ष्मणवर गुन्हा दाखल झाला.
लक्ष्मण सांगतात- "पोलीस स्टेशनला गेलो तो दिवस मी कसा विसरू? पोलिसांनी धुलाई सुरू केली. कुठल्या गँगमध्ये आहेस?, हत्यारं कुठली आहेत?, कोणाच्या सुपारी घेतोस? प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. हे सगळे शब्द माझ्यासाठी नवीन होते. पोलिसांच्या बेल्ट आणि काठीने मी अधिकच नीडर झालो. माझ्या हाताचे ठसे घेण्यात आले.
पोलीस म्हणाले- हे आता फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडे जातील. जर कुठे काही गुन्हा झाला तर तपासात या ठश्यांची ओळख पटवायला मदत होईल. अशा प्रकारे माझं मुंबई क्राईमच्या दुनियेत अॅडमिशन झालं."
तुरुंगातील दिवस...
पहिल्यांदा लक्ष्मणला वडिलांनी आर्थर रोडमधून जामीन सोडवून आणलं. गोळे कुटुंब कामासाठी मुंबईत स्थलांतरित झालं होतं. त्यांचे आई-वडील दोघंही अशिक्षित. कसंबसं घर चालवायचे. तुरुंगाचा शिक्का लागल्याने घर आणि वस्तीत लक्ष्मणला तिरस्काराला सामोरं जावं लागलं. जवळचे मित्र दूर जायला लागले.
लक्ष्मण गोळेंचा वयाच्या चौदाव्या वर्षी आर्थर रोड जेलमधून सुरू झालेला प्रवास 19 गुन्हे, दोन वेळा तडिपार करत स्थानिक गुन्हेगार म्हणून ओळख होण्यापर्यंत झाला.
खंडणी, धमक्या, बिल्डिंगचं बांधकाम थांबवणं, लहान-सहान गँगमध्ये मदत करणं... क्राईमच्या दुनियेतलं कसब शिकायला सुरुवात झाली होती.
लक्ष्मण जेलमधल्या दिवसांविषयी सांगताना म्हणतात- "जेल हे प्रत्येक गुन्हेगाराचं विद्यापीठ असतं. तिथेच गुन्हे, शिक्षा, त्यातून कसा बचाव करायचा अशी माहिती मिळते. क्राईमच्या दुनियेचं अर्थकारण आणि व्यवस्था समजते. माझंही तसंच झालं. मी बेदरकारपणे वागत होतो. आम्ही तिथे एक गाणं म्हणायचो-
जेल हमारा घर... आना जान जेलमें हमे किसका डर? कोर्ट कचेरी करेंगे छुटेंगे फिर लुटेंगे"
सत्याचे प्रयोग वाचून प्रेरणा
लक्ष्मण यांच्या आयुष्यात 2003 पर्यंत हे असंच सुरू होतं. नाशिकच्या कारागृहात त्यांची ओळख महात्मा गांधी यांच्या विचारांशी झाली. मुंबईचं सर्वोदय मंडळ 2002 पासून कैद्यांसाठी गांधींच्या विचारांवर व्याख्यानं आयोजित करतात. गांधींची पुस्तकं वाचायची इच्छा आहे अशा कैद्यांना ती उपलब्ध करुन दिली जातात.
लक्ष्मण यांच्या हातात असंच 'सत्याचे प्रयोग' हे पुस्तक आलं. तेव्हा त्यांचं वय 30 वर्षं होतं. पुस्तकातल्या एका प्रसंगाने लक्ष्मण यांना विचार करायला भाग पाडलं.
'मला तोपर्यंत सायन्समधले प्रयोग माहीत होते. सत्य आणि प्रयोगाचं काय नातं हे पाहण्यासाठी मी पुस्तक वाचायला घेतलं. त्यात गांधीजींनी एक घटना सांगितली आहे. मांसाहार करण्यासाठी गांधी सोन्याच्या कड्यातला तुकडा विकतात. पण त्याविषयी घरी सांगायची हिंमत होत नसते. अखेर पत्र लिहून ते वडिलांना कळवतात. मला हे भावलं. कारण निर्भय होत चुका स्वीकारणं हे अधिक धाडसाचं असतं. त्यानंतर मी सर्वोद्य मंडळाचे आर.के सौमेय्या आणि लक्ष्मण साळवे यांच्या मदतीने झपाट्याने वाचू लागलो."
वयाच्या तिशीनंतर लक्ष्मण यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला.
'होय, मी गुन्हा केलाय!'
त्यातला पहिला टप्पा होता. गुन्हा कबूल करणं. त्याच दरम्यान त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. "एरव्ही कोर्टात 'मी गुन्हा केलेला नाही' असंच सगळे कैदी सांगतात. पण मी ठरवलं होतं. सत्याची कास धरायची. न्यायाधिशांसमोर मी हिंमत करुन पत्र लिहिलं आणि सांगू शकलो की- हो मी गुन्हा केलाय. त्यात मला सात वर्षांची शिक्षा झाली. पण चांगल्या वागणुकीमुळे ही शिक्षा कमी झाली आणि मी जेलबाहेर येऊन वेगळं आयुष्य जगायला सुरुवात केली."
बाहेर पडल्यावर लक्ष्मण यांनी ज्यांना त्रास दिला होता अशांची माफी मागण्यासाठी भेटी घ्यायला सुरुवात केली. तेव्हा त्यांची अनेकांनी थट्टा केली. "मी खंडणीसाठी एका माणसाला धमकावलं होतं. त्याच्या घरी माफी मागायला गेलो तेव्हा त्याचं कुटुंब तिथे होतं. मी सर्वांची माफी मागितली. त्यांनी मोठ्या मनाने मला माफ केलं. त्या सर्वांना खूप आनंद झाला होता."
2008 मध्ये लक्ष्मण यांनी वर्षभर सर्वोदय मंडळात पूर्णवेळ काम केलं. त्यानंतर फॅक्टरी इंडस्ट्रीजचा कामगारासाठी मॅनेजमेंटचा कोर्स केला. आता स्वतंत्रपणे काम करत ते गांधींच्या विचारांवर शाळा, कॉलेजेसमध्ये आणि भारतभरातील कारागृहांमध्ये व्याख्यानं घेतात.
'कैद्यांना मानसोपचारतज्ज्ञांची मदत गरजेची'
कारागृहातल्या वातावरणाविषयी ते चिंताही व्यक्त करतात. भारतातली कारागृह क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांना ठेवत असल्याने तिथे एक प्रकारचं नकारात्मक वातावरण तयार होतं असं ते म्हणतात.
"खरंतर गुन्हे करणं हा आजार आहे. आपल्याकडे भारतात तुरुंगांमध्ये मानसोपचारतज्ज्ञ नसतात. या आजारावर वेगळ्या पद्धतीने उपचार करायला सुरुवात झाली पाहिजे." असा ते आग्रह धरतात.
"मी स्वतः एका अनुभवातून गेल्यामुळे तुरुंगातल्या कैद्यांशी बोलताना जाणवतं की कैदी हे सामाजिक कलंकाचे बळी आहेत. त्यांना बाहेरचा समाज कायमच गुन्हेगार आणि नकारात्मक नजरेने बघतो . त्याचं ओझं त्यांच्या मनावर असतं. त्यांना चांगलं वागण्यासाठी प्रेरणा कुठून मिळणार? आपल्या हातून चूक कशी झाली याचं चिंतन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गजाआड असलेल्यांचं मनपरिवर्तन कसं होणार?"
आतापर्यंत लक्ष्मण गोळे यांनी सर्वोदय मंडळाच्या मदतीने भारतातल्या अडीच लाख कैद्यांशी संवाद साधलाय. तर तिहारसह अनेक तुरुंगातील 10 हजार कैद्यांसाठी 'गांधी शांती परीक्षा' घेतली आहे. कैद्यांच्या पुनर्वसनासाठी ते गेली बारा वर्षं सातत्याने काम करत आहेत. गुन्हेगारमुक्त समाजासाठी तुरुंगाबाहेर पडलेल्या माणसाला एक नोकरी द्या, असं त्यांचं समाजाकडे मागणं आहे.
हिंसेचा विचार कुठून येतो?
गांधीजींचा सत्य आणि अहिंसेचा विचार पुढे नेण्याचं काम करताना लक्ष्मण यांना देशातल्या वातावरणाविषयीची चिंता सतावते. गांधीजींच्या विचारांचं चिंतन करताना त्यांना समाजातल्या आर्थिक दरीमुळे आणि सामाजिक दुफळीमुळे हिंसा वाढीस लागेल असं वाटतंय.
दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या होणं हे समाजाच्या अधोगतीचं लक्षण आहे असं ते म्हणतात.
"हा वैचारिक लढा पूर्वीपासून चालत आलाय. महात्मा गांधींची हत्याही अशीच झाली. अहिंसा जेव्हा हिंसेवर भारी पडायला लागते तेव्हाच अशा हत्या होतात. अहिंसेचा विचार संपवण्यासाठी या हत्या होतात. पण अहिंसेचा विचार संपवणं अशक्य आहे. अहिंसेचे हेच विरोधक आज जगभर जाण्यासाठी गांधीजींचा लोगो वापरतात, कारण जगभरात गांधी ही भारताची ओळख आहे. राजकीय फायद्यासाठी आज गांधीजींचं नाव वापरलं जातंय. "
आज लक्ष्मण गोळे यांना लोक गांधीवादी समाजसेवक म्हणून ओळखतात. नवं आयुष्य सुरु केल्यावर त्यांनी 2010 मध्ये लग्न केलं. आज पत्नी आणि आपल्या दोन मुलींसह ते शांततेत आयुष्य जगतायत. आतापर्यंत हमीद दलवाई पुरस्कार, सम्राट अशोक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय.