मेहुली घोष : जत्रेत बंदुकीने फुगे फोडणारी मुलगी बनली आंतरराष्ट्रीय नेमबाज

शनिवार, 30 जानेवारी 2021 (21:12 IST)
पश्चिम बंगालमधल्या नाडिया जिल्ह्यातल्या मेहुलीला लहानपणापाासूनच बंदुकांचं आकर्षण होतं.
जत्रेमध्ये बंदुकीने फुगे फोडायला तिला खूप आवडायचं. सीआयडी ही मालिकाही तिच्या आवडीची होती. त्यात पिस्तुलातून गोळ्या झाडताना बघून तिलाही स्फुरण चढायचं.
 
मात्र, नेमबाजी हा व्यावसायिक क्रीडा प्रकार आहे आणि या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून आपण आपल्या देशाचं नाव उंचावू शकतो, याची त्यावेळी तिला जराही कल्पना नव्हती.
 
2016 साली पुण्यात भरलेल्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत 9 पदकं पटकावून तिने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि या कामगिरीमुळे तिची थेट ज्युनिअर इंडिया टीममध्ये वर्णी लागली.
पुढच्या वर्षी जपानमध्ये झालेल्या एशियन एअरगन चॅम्पियनशीप स्पर्धेत तिने कारकिर्दीतलं पहिलं सुवर्ण पदक पटकावलं.
 
नेमबाजीशी ओळख

अभिनव बिंद्रा मेहुलीचे प्रेरणास्थान आहेत. 2008 साली बिजिंग ऑलिम्पिक्समध्ये अभिनव बिंद्राने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावलं. हा खेळ तिने तिच्या घरातल्या छोट्याशा टीव्हीवर बघितला आणि आपणही याच क्षेत्रात कारकीर्द घडवायची, असा निश्चय तिने केला.
 
मात्र, घरची परिस्थिती बेताचीच होती. वडील रोजंदारीवर काम करायचे तर आई गृहिणी. हातावर पोट असल्याने खेळाडू बनण्याचा खर्च आवाक्याबाहेरचा होता. त्यामुळे आई-वडिलांचं मन वळवणं जिकरीचं होतं. एक पूर्ण वर्ष त्यात गेलं. मात्र, घरच्यांची परवानगी मिळाल्यावर मेहुलीने मागे वळून बघितलं नाही.

त्यांनीही हरतऱ्हेने तिची साथ दिली. त्यावेळी तिला प्रशिक्षणासाठी अद्ययावत शूटिंग रेंज किंवा इलेक्ट्रॉनिक टार्गेट अशा सुविधा मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे रेंजवर टारगेट बदलण्यासाठी तिला हँड पुलीचा वापर करावा लागायचा.
 
मात्र, तिच्या अडचणी इथेच संपलेल्या नव्हत्या. आणखी एक संकट आ वासून उभं होतं.
 
2014 साली तिने चुकून एका व्यक्तीवर गोळी झाडली आणि त्यात ती व्यक्ती जखमी झाली. त्यामुळे तिच्या नेमबाजीवर बंदी घालण्यात आली. या कारवाईमुळे तिला नैराश्य आलं.
 
मात्र, तिचं कुटुंब तिच्या पाठिशी खंबीरपणे उभं होतं. त्यांनी तिला अर्जुन पुरस्कार विजेते नेमबाज जॉयदीप करमरकर यांच्याकडे नेलं आणि हाच मेहुलीच्या आयुष्यातला टर्निंग प्वॉईंट ठरला.
 
सुवर्णवेध

जॉयदीप कर्माकर यांची भेट होण्याआधी मेहुलीला पूर्णवेळ प्रशिक्षक नव्हते. करमरकर यांच्या शूटिंग अकॅडमीमध्ये तिला प्रवेश मिळाला आणि तिचा गमावलेला आत्मविश्वास तिला परत मिळाला.
प्रशिक्षणासाठी अॅकेडमीमध्ये जायचं म्हणजे एकीकडच्या प्रवासासाठी चार तास लागायचे. त्यामुळे तिला पुरेशी झोपही मिळत नव्हती.
 
मात्र, नेमबाजीसाठी मेहुलीने उपसलेल्या कष्टाचं चीज झालं. 2017 साली जपानमध्ये झालेल्या एशियन एअरगन चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने पहिल्या आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानंतर यशाने तिची साथ सोडली नाही.
 
2018 सालच्या युथ ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने रजत पदकांची कमाई केली.
 
ऑलिम्पिक्स आणि वर्ल्ड कपमध्ये सुवर्ण पदकं हे तिचं स्वप्न आहे.
 
भारतात लोकप्रिय खेळांमध्ये खेळाडूंच्या यशाचं बरंच कौतुक होतं. मात्र, कमी लोकप्रिय खेळांमध्ये तेवढ्याच तोडीची कामगिरी करणाऱ्या खेळाडुंकडे दुर्लक्ष होतं, अशी खंत मेहुली व्यक्त करते. हे खेळाडूसुद्धा तेवढीच मेहनत घेतात आणि म्हणूनच लवकरच ही परिस्थितीही बदलेलं, अशी आशा ती व्यक्त करते.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती