महाराष्ट्र सत्तासंघर्ष : शिवसेनेच्या सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर राष्ट्रवादीला आमंत्रण, 24 तासांची मुदत

सोमवार, 11 नोव्हेंबर 2019 (21:24 IST)
दिवसभर चाललेल्या चर्चा, वाटाघाटी आणि बैठकांनंतरही राज्यातलं सत्तास्थापनेचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
 
शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केला असला तरी राज्यपालांनी त्यांना मुदतवाढ नाकारली आहे. त्यानंतर राजभवनावर राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाचारण करण्यात आलं आणि त्यांना राज्यपालांनी मंगळवारी रात्री 8.30 पर्यंतची मुदत दिली आहे.
 
तत्पूर्वी, काँग्रेसने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे, मात्र त्यात शिवसेनेला पाठिंबा दिल्याचा कोणता उल्लेख नाही. राज्यपालांनी दिलेल्या मुदतीमध्ये पाठिंब्याची पत्रं सादर करण्यात शिवसेनेला अपयश आल्यानंतर तिसरा सर्वांत मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला आमंत्रण देण्यात आलं आहे.
 
पाहा या सत्तासंघर्षाचे ताजे अपडेट्स
9.27: सुधीर मुनगंटीवर यांनी पत्रकारांना सांगितलं, "भाजप वेट अँड वॉच करणार, असं आमच्या आज झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत ठरलं."
 
9.15: राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी मंगळवारी रात्री 8.30 पर्यंतची मुदत दिली आहे.
8.59: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजभवनावर दाखल. राज्यपालांशी होणार चर्चा.
 
8.55: सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आम्हाला आज पत्र मिळेल आणि आमचा मित्रपक्ष काँग्रेसशी चर्चा केल्यानंतर आम्ही आमचा अंतिम निर्णय कळवू असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.
8.44: काँग्रेस नेतृत्व महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी सकारात्मक आहे, असं काँग्रेस नेते राजीव सातव यांनी स्पष्ट केलं आहे. "आमची राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा झालेली नाही, काही निरीक्षक उद्या मुंबईला जातील ते राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करतील. महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या सर्व पर्यायांची यावेळी चाचपणी केली जाईल," असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.  
8.38: राज्यपालांनी भेटायला बोलावलं आहे. त्यांना आम्ही भेटण्यासाठी निघालो आहोत. त्यांनी कशा करता बोलावलं आहे हे आम्हाला माहिती नाही, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
 
8.30: शिवसेनेनंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजभवनावर निघाले आहेत.
 
7.55:आज दिवसभर चाललेल्या घडामोडींनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी यापुढील चर्चा मुंबईत होईल असं स्पष्ट केलं आहे.
7.38: आम्हाला मिळालेल्या वेळात आम्ही शिवसेनेच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेलं पत्र देऊन आम्ही सत्तास्थापनेचा दावा केला आहे. 2 दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी आपण केली होती. मात्र ती राज्यपालांनी नाकारली. असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती