केरळच्या लेस्बियन कपलचं फोटोशूट चर्चेत कारण...

सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (15:57 IST)
- मेरिल सेबॅस्टियन
"आज आम्ही स्वतंत्र आहोत आणि आता आम्हाला आमची स्वप्न जगता येतील."
 
यावर्षाच्या सुरुवातीला अदिला नसरीन आणि फातिमा नूरा या तरुणींची नावं बऱ्याच वृत्तपत्रात छापून आली होती. या मुलींच्या पालकांनी त्यांना जबरदस्तीने वेगळं केलं होतं. पण केरळमधील न्यायालयाच्या एका निर्णयाने या दोघी पुन्हा एकत्र आल्या.
 
त्या दोघींना त्रासाला सामोरं जावं लागत होतं, त्यामुळे यातल्या एकीने  न्यायालयात याचिका दाखल केली होती.
 
आता मागच्या महिन्यात या मुली पुन्हा चर्चेत आल्यात. त्याच्या मागचं कारण म्हणजे एका वेडिंग फोटोशूटसाठी या दोघींनी कपल पोज दिली आहे.  
 
एर्नाकुलम जिल्ह्यात असणाऱ्या समुद्रकिनारी हे फोटोशूट पार पडलं. त्यावेळी या दोघी एकमेकींना अंगठ्या घालताना, गुलाबाचे हार एकमेकींच्या गळ्यात घालताना दिसून येतात. या दोघींनीही चांदीचे दागिने, निळ्या तपकिरी रंगाचे लेहेंगे घातलेत. 
 
यातल्या 23 वर्षांच्या नूराने हे फोटो तिच्या फेसबुक पेजवर शेअर केलेत.
 
तिने या फोटोला कॅप्शन देत म्हटलंय की, "अचिव्हमेंट अनलॉक : टूगेदर फॉरेव्हर". तिच्या या फोटोवर लोकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. 
बीबीसीशी बोलताना नसरीन सांगते की, "फोटोशूटची कल्पनाच मुळात छान होती. मग सहज करून बघू म्हणत आम्ही फोटोशूट करून बघितलं."
 
या दोघी एका वेगळ्या पद्धतीच्या फोटोशूटमध्ये सहभागी झालेल्या होत्या.
 
नसरीन सांगते, "आम्ही अजून लग्न केलेलं नाहीये. पण भविष्यात आम्हाला ते करायला आवडेल."
 
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने 2018 साली समलिंगी लैंगिक संबंधांना गुन्हेगारीच्या कक्षेतून बाहेर काढलं. जसा काळ पुढं सरकतो आहे त्याचपद्धतीने समलिंगी लैंगिक संबंधांबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढते आहे. पण असे संबंध असणाऱ्यांना आजही स्वीकारलं जात नाही हे देखील तितकंच खरं आहे.
 
नूरा आणि नसरीन या दोघींनाही याची आता सवय झाली आहे. नूराच्या कुटुंबियांकडून त्यांना आजही वेगळं करण्याच्या धमक्या दिल्या जातात.
 
भारतात समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळालेली नाही. तरीही यासंबंधीच्या याचिका दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहेत.
 
नूरा आणि नसरीन यांना केरळच्या उच्च न्यायालयाने एकत्र राहण्याची परवानगी दिली आहे. परंतु भारतात विवाहित जोडप्याला जे विशेषाधिकार मिळतात ते त्यांना कधीच मिळणार नाहीत.
 
नसरीन सांगते, "आपण कोणताही फॉर्म भरायला गेलो की ते पत्नी, पती किंवा वडिलांचं नाव विचारतात. माझ्या कामाच्या ठिकाणी आणि इतर ठिकाणी, मला अजूनही माझ्या वडिलांचं नाव लावावं लागतं. आम्ही अलीकडेच हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तेव्हा आम्हाला आमच्या वडिलांचं नाव द्यावं लागलं. हे खूप त्रासदायक होतं."
या सगळ्यात त्यांना अडचणी येतात कारण त्यांचे त्यांच्या कुटुंबीयांशी असलेले संबंध चांगले राहिलेले नाहीत.
 
त्यांचं कुटुंब त्यांच्या सोबत नाहीये आणि या दोघीही एकमेकींवर अवलंबून आहेत. सोबतच एलजीबीटीक्यू समूहाला पाठिंबा देणाऱ्या 'वनाजा कलेक्टिव्ह'नेही त्यांना मदत केली. 
 
नूरा आणि नसरीन या हायस्कूलमध्ये असताना एकमेकींच्या जवळ आल्या. शाळा संपल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्या आपल्या पालकांसोबत केरळ राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात राहत होत्या. या तीन वर्षांच्या काळात त्या कॉलवर बोलायच्या.  
 
एलजीबीटीक्यू सपोर्ट ग्रुपकडून त्यांना 'शिक्षण पूर्ण करण्याचा आणि नोकरी मिळवण्याचा सल्ला' मिळाला होता.
 
आज त्या दोघींकडे जे लोक सल्ले मागण्यासाठी येतात त्यांनाही त्या हाच सल्ला देतात.
 
नसरीन सांगते की, आमचे कुटुंबीय पुराणमतवादी असल्याने आमचं एकत्र राहणं त्यांना पटणार नव्हतं.
 
नसरीन पुढं सांगते की, "आमच्या समाजात आजही लोकांची  शैक्षणिक पार्श्वभूमी म्हणावी तितकी चांगली नाही. आम्ही त्यांना नोकरी शोधून द्यायचा प्रयत्न करतो तेव्हा पुरेसं शिक्षण नसल्यामुळे अडचणी येतात."
 
म्हणूनच अशा पद्धतीच्या नात्यांमध्ये असणाऱ्या इतरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा त्या सल्ला देतात. नूरा सांगते, "तुम्हाला हवं तसं आयुष्य जगण्यासाठी हातात नोकरी असणं खूप महत्त्वाचं आहे.आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यावर तुम्हाला कोणाच्या दयेवर अवलंबून राहावं लागणार नाही."
 
या दोघीही सांगतात की, त्यांनी त्यांच्या भूतकाळात काहीही गमावलेलं नाही. त्या सोशल मीडियावर ज्या पोस्ट शेअर करतात त्यातून त्यांना हवं असणारं स्वातंत्र्य दिसून येतं.
 
एकेकाळी त्या हात धरलेले किंवा मागून काढलेले फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करायच्या. पण आता त्यांच्या फोटोमध्ये त्या स्वतःचं विश्व निर्माण करताना दिसतात. मित्रांसोबत फिरताना, कुत्र्याला मोठं करताना असे बरेचसे रिल्स त्यांच्या पेजवर पाहायला मिळतात. 
 
नूरा म्हणते की, "मी आता कोणत्याही गोष्टीसाठी बदलणार नाहीये. मी तो जगण्यातला वाईटपणा सोडून आता पुढे आली आहे."
 
त्या दोघी सांगतात की, त्यांना लोकांनी जो पाठिंबा देऊ केलाय त्यामुळे सतत प्रेरणा मिळते आहे. त्यांनी बरेच इंटरव्ह्यू दिले आहेत, एका लोकप्रिय महिला मासिकात त्यांना स्थान मिळालंय. एका टीव्ही शोमध्ये त्यांची स्टोरी सांगण्यात आली आहे. 
 
नसरीन म्हणते, "आम्ही मास्क आणि चष्मा घातला तरी लोक आम्हाला ओळखतात. आणि लोकांनी आमचं कौतुक केलंय आणि पाठिंबाही दिलाय."
 
त्या दोघींच्या
कुटुंबीयांना वाटतं की, त्यांच्या नात्याची ही पासिंग फेज आहे. आणि अशाच पद्धतीच्या कमेंट त्यांना फेसबुक इंस्टाग्रामच्या पेजवर येत असतात.
 
जसा त्यांना पाठिंबा मिळतो तशीच त्यांची अवहेलना करणारे लोक सुद्धा आहेत. हे लोक त्यांना सांगतात की, त्यांनी समाजासमोर एक वाईट उदाहरण ठेवलंय. त्यांनी पुरुषांशी लग्न करायला हवं.
 
नूरा आणि नसरीन कधीकधी अगदीच गंभीर असणाऱ्या कमेंटवर  व्यक्त होतात. पण या कमेंटना उत्तर देण्याची त्यांची पद्धत पण एकदम मिश्किल असते.
 
मध्यंतरी एका इन्स्टाग्राम युजरने त्यांच्या पोस्टखाली कमेंट केली होती की, सेक्शुआलिटी ही एक फेज असावी कारण त्याने 40 वर्षांच्या पुढच्या लेस्बियन कधीच पाहिल्या नाहीयेत. यावर त्या दोघींनी कमेंट करत म्हटलंय की, "आम्ही चाळीशीच्या होईपर्यंत वाट बघ."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती