जेपी नड्डा : भाजपचे नवे कार्यकारी अध्यक्ष अमित शाहांचा वारसा चालवणार?

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जेपी नड्डा यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलं आहे. 17 जूनला झालेल्या भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
 
अर्थात, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शाह हेच काम पाहतील. मात्र ते गृहमंत्री झाल्यानं नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
 
जेपी नड्डा यांना मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकालात मंत्रिपद देण्यात आलं होतं. यावेळी त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नाही. त्यावेळी त्यांच्यावर संघटनेची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असा कयास लावला जात होता.
 
"अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं लोकसभा निवडणूक जिंकली आहे. पंतप्रधानांनी त्यांना आता गृहमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे शाह यांनी पक्षाची जबाबदारी दुसऱ्याकडं द्यावी अशी विनंती केली होती. म्हणून संसदीय बोर्डानं हा निर्णय घेतला आहे," असं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी (17जून) माध्यमांशी बोलताना सांगितंल.
 
कार्यकारी अध्यक्ष का?
 
58 वर्षांचे नड्डा हे मोदी-शाह तसंच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मर्जीतले असल्याचं मानलं जातं. नड्डा स्वत:ला 'लो प्रोफाइल' ठेवतात असंही म्हटलं जातं.
 
2014च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी भाजपच्या दिल्लीतल्या मुख्य कार्यालयातून देशभरातल्या प्रचारावर लक्ष ठेवलं होतं. तसंच 2019 मध्ये त्यांच्यावर उत्तर प्रदेशमधल्या लोकसभा प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली होती. उत्तर प्रदेशात सप-बसप यांच्या आघाडीनंतरही भाजपनं 62 जागा जिंकल्या.
 
"राजनाथ सिंह यांच्यानंतर अमित शाह हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. तेव्हाही जेपी नड्डा यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत होतं. निवडणूक प्रचाराच्या मॅनेजमेंटमध्ये अमित शाह यांच्याएवढेच जेपी नड्डा हे तरबेज आहेत. त्यांचं संघटन कौशल्य मजबूत आहे. तसंच ते मोदी-शाह यांच्या अगदी जवळचे नेते आहेत," असं भारतीय निवडणुकांचे अभ्यासक डॉ. राहुल वर्मा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं. ते Center For Policy Research (CPR) इथं फेलो म्हणून कार्यरत आहेत.
 
भाजपमध्ये महत्त्वाच्या पदावर काम करण्यासाठी RSSची पार्श्वभूमी किंवा RSSसोबत चांगले संबंध असणं अत्यंत गरजेचं असतं, असंही वर्मा यांनी सांगितलं.
 
जे.पी. नड्डा यांची कारकीर्द
मूळचे हिमाचल प्रदेशमधल्या बिलासपूर इथल्या जय प्रकाश नड्डा उर्फ जेपी नड्डा यांनी पटन्यातून LLB ची पदवी घेतली आहे.
 
महाविद्यालयापासूनच भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) कार्य करणारे नड्डा 1993 साली हिमाचल प्रदेशमधून आमदार झाले. त्यांनी राज्यात आणि केंद्रात मंत्रीपद भूषवलं आहे. 1994 ते 1998 पासून ते हिमाचल प्रदेश विधानसभेत पक्षाचे नेते म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
 
2007मध्ये ते हिमाचल प्रदेशात प्रेम कुमार धुमल सरकारमध्ये वन-प्रर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री होते. त्यानंतर भाजपनं 2012मध्ये नड्डा यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवल होतं. 2014मध्ये त्यांनी मोदी सरकारमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून काम केलं आहे.
 
मोदी यांची महत्त्वाकांक्षी 'आयुष्मान भारत' योजना यशस्वीरित्या राबविण्यामागे जेपी नड्डा यांनी मेहनत घेतली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती