बप्पी लाहिरी यांना मराठी सिनेमात गायला 43 वर्षं लागली कारण…
बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (08:44 IST)
गायक - संगीतकार बप्पी लाहिरी यांचं निधन झालंय. ते 69 वर्षांचे होते.
PTI वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. मुंबईतल्या क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते.
आलोकेश लाहिडी असं त्यांचं नाव असून त्यांना सगळे बप्पी लहरी या नावानं ओळखत होते. बप्पीदा नावानं प्रसिद्ध असलेल्या लहरी यांना ते परिधान करत असलेल्या प्रचंड सोन्यामुळंही वेगळी ओळख मिळाली होती.
बॉलिवुड आणि बप्पीदा
वयाच्या चौथ्या वर्षी लता मंगेशकर यांच्या एका गाण्यात तबला वाजवून बप्पीदा प्रसिद्ध झाले होते. 80 च्या दशकात बप्पी लाहिरी यांच्या डिस्कोच्या तालावर संपूर्ण देश थिरकत होता. त्यामुळं त्यांना डिस्को किंग असं म्हटलं जात होतं. बॉलीवूडमध्ये संगीत डिजीटल बनवण्यात बप्पीदा यांचं मोठं योगदान होतं. बप्पी लाहिरी यांनी जवळपास पाच दशकांपेक्षा अधिक काळ संगीत क्षेत्रात काम केलं.
1970 आणि 80च्या दशकातल्या अनेक चित्रपटांना बप्पी लाहिरींनी संगीत दिलं होतं. चलते - चलते, डिस्को डान्सर, शराबी, नमकहलाल या सिनेमांमधली त्यांची गाणी गाजली.
शराबी चित्रपटासाठी बप्पी लहरी यांनी फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. तसंच त्यांना फिल्मफेअरतर्फे जीवनगौरव पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं.
2020 साली आलेल्या बागी 3 सिनेमामधलं 'भंकस' हे त्यांचं शेवटचं गाणं ठरलं.
डिस्को बीट्सवरची उडत्या चालींची गाणी हे बप्पीदांचं वैशिष्ट्य होतं.
डिस्को डान्सर सिनेमातलं 'आय अॅम अ डिस्को डान्सर' थानेदार सिनेमातलं 'तम्मा - तम्मा', द डर्टी पिक्चरमधलं 'ऊलाला ऊलाला', साहेब मधलं 'यार बिना चैन कहाँ रे' ही गाणी गाजली.
मराठी सिनेमाला संगीत
1990मध्ये बप्पी लाहिरींनी 'डोक्याला ताप नाही' नावाच्या मराठी सिनेमाला संगीत दिलं होतं. तर 2018 साली ते एका मराठी सिनेमासाठी गायले.
बॉलिवुड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत बप्पी लाहिरींनी सांगितलं होतं, "बॉलिवुडमधल्या करियरमध्ये मी इतका बिझी झालो की मला मराठी सिनेमात योगदान देण्याची संधी मिळाली नाही. पण आता संजय जाधव यांच्या लकी अँड आय या सिनेमाद्वारे मी मराठीत पार्श्वगायक म्हणून पदार्पण करतोय. आणि यासाठी मी खूप उत्साहात आहे."
"मराठी चित्रपटसृष्टी आणि येथील कलावंत यांच्याशी माझं विशेष नातं आहे. मी 70 च्या दशकात करिअर सुरू केलं. पण मला सुनील दत्त आणि आशा पारेख यांच्या भूमिका असलेल्या राजा ठाकूर यांच्या जख्मी चित्रपटानं नावलौकिक मिळाला. तो राजा ठाकूर यांचा चित्रपट होता आणि ते महाराष्ट्रातील होते. तेव्हापासूनच मला मराठी चित्रपटासाठी काम करण्याची इच्छा होता. पण मला मराठी सिनेमासाठी संगीत द्यायला 1990 उजाडावं लागलं. डोक्याला ताप नाही, या चित्रपटासाठी मी संगीत दिलं होतं," असं बप्पीदांनी चित्रपटाच्या निमित्तानं बोलतानं सांगितलं होतं.
राजकारणात प्रवेश
राजकारणातही बप्पीदांनी नशीब आजमावून पाहिलं होतं. 2014 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं त्यांना उमेदवारीही दिली होती. पश्चिम बंगालच्या श्रीरारमपूर मतदारसंघातून बप्पीदा निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते. पण याठिकाणी त्यांना यश मिळालं नाही. त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.