इम्तियाज जलील मुलाखत: MIM हिंदुत्वाचं राजकारण करणार का यावर जलील काय म्हणाले?

मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (15:05 IST)
लॉकडाऊनचे नियम शिथील होत असताना धार्मिक स्थळंही खुली करण्यासंबंधी राजकारण सुरू झालं आहे. खासदार इम्तियाज जलील यांनीही धार्मिक स्थळं सुरू करण्याबाबत अनुकूलता व्यक्त केली. त्यावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात शाब्दिक वादही रंगला. याच सगळ्या मुद्दयांवर आमचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी इम्तियाज जलील यांच्याशी संवाद साधला.
 
प्रश्न: औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अशी टीका केली आहे की, तुमचा हिंदूशी काय संबध आहे, तुम्ही मंदिराबाबत बोलू नका. याविषयावर औरंगाबादमध्येसुद्धा चर्चा सुरु आहे. तुमच्या पक्षाबद्दलसुद्धा बोललं जातंय. MIM हा असा पक्ष आहे की, ज्याचा झेंडा हिरवा आहे. MIM च्या सभांमध्ये 'नारा-ए-तकदीर' अशा घोषणा दिल्या जातात. आतापर्यंत ज्या पक्षाची प्रतिमा मुसलमानांसाठी काम करणारा पक्ष अशी आहे ते हा प्रश्न उपस्थित का करत आहेत, असं विचारलं जातंय?
 
उत्तर : मला सांगा शिवसेनेचा जन्म कोणत्या मुद्यावर झाला होता? शिवसेने कोणत्या मुद्यावर सत्तेत आली आहे? तो फक्त हिंदुत्वाचा मुद्दा होता. शिवसेनेचा आजपर्यंतचा प्रवास पाहिला, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला शिव्या द्यायचे. आता परिस्थिती बदलली आहे. आता तीच शिवसेना जर कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्तेत बसू शकते, तर इम्तियाज जलीलसारखा खासदार ज्याला हिंदू लोकांनीही मत दिली, त्यांना मी तुमचा मुद्दा उचलणार नाही असं सांगू का?
 
मी मुसलमान आहे आणि मी फक्त मुसलमानांच्याच बाबतीत बोलणार, असं म्हणू का? तसं मी करणार नाही. कुणाला पटेल किंवा नाही पटेल, माझ्या पक्षातील लोकांना पटेल किंवा नाही पटेल, मला जे मला चांगलं वाटतं मी तेच करणार. मी खासदार असल्याने मला काय करायचं आहे ते मी कुणा खैरेला विचारणार नाही किंवा शिवसेना सांगते म्हणून त्याच्या आधारावर काही करणार नाही.
 
तुम्ही माझा विरोध करा पण मला हा प्रश्न विचारायचा आहे की, हिंदुत्वाच्या नावाने तुम्ही सत्तेत आलात. पण इतकी लाचारी कशामुळे आहे की, मंदिरासाठी माझ्यासारख्या खासदाराला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आणि तुम्ही माझा विरोध करण्यासाठी रस्त्यावर येता.
 
प्रश्न : MIM आता हिंदुत्वाचं राजकारण करणार आहे का? MIM च्या सभांमध्ये आता 'जय श्रीराम'च्या घोषणा ऐकायला मिळणार का?
 
उत्तर : आता शिवसेना सेक्युलर पार्टीसोबत गेलेली आहे, तर ते मुसलमानांच्या सभेमध्ये जाऊन 'नारा-ए-तकदीर'चा नारा लावणार आहेत का? हे प्रश्न आपण त्यांना विचारू शकतो का? माझ्या सभेमध्ये मुस्लीम समाजाचे लोक जास्त असतात आणि ते काय घोषणा देतील ते माझ्या हातात नाही. घोषणा काय देतात हा मुद्दा नाही. मी लोकांच्या पोटाचा विषय बोलत आहे. तो मुद्दा आहे.
 
प्रश्न : तुम्ही राजकारणाची सुरुवातच मुळात धार्मिक मुद्द्यावरून केली ना... लोकांना अँब्युलन्स मिळत नाहीये, बेड उपलब्ध होत नाहीयेत. औरंबादमध्ये केस किती वाढत आहेत हे तुम्हाला माहीतच आहे. महाराष्ट्रातले आकडे सातत्याने वाढत आहेत. पण MIMबेड, अँब्युलन्स यासारख्या मुद्द्यांवर का बोलत नाहीये?
 
उत्तर : मी काय केलयं ते सर्व सोशल मीडिया आणि युट्युबवर आहे.
 
प्रश्न : औरंगाबाद महापालिकेची निवडणूक काही दिवसांवर आहे आणि त्याचमुळे तुम्ही हे मुद्दे उपस्थित करत आहात का? तुम्हाला हिंदूचीसुद्धा मत मिळाली होती आणि तोच वोटबेस पक्का करण्यासाठी तुम्ही या मुद्द्याला हात घालत आहात अशी चर्चा आहे.
 
उत्तर: औरंगाबादची दुर्दशा कुणामुळे झाली असेल तर ती महापालिकेमुळे झाली आहे. मी सरकारला विनंती करतो की, औरंगाबादची निवडणूक दोन वर्षासाठी पुढं ढकला. नाही पाहिजे आम्हाला औरंगाबादची निवडणूक.
 
प्रश्न : मंदिरात गेलेल्या माणसांना कोरोना झाला तर त्याची जबाबदारी MIM घेणार आहे का? किंवा इम्तियाज जलील घेतील का?
 
उत्तर: माझा हाच प्रश्न सरकारला आहे की, लग्न समारंभासाठी 50 लोक थाटामाटात जातात. कंपन्यात 30% लोकांना काम करण्याची परवानगी आहे. मग या लोकांना काही झाल्यास याची जबाबदारी सरकार घेणार का?
 
मी सरकारला विनंती केली की, 10 लोकांना परवानगी द्या. मंदिरात गेल्यावर तुम्ही 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबत नाही. मी मशिदीत गेलो तर नमाज पढायला 7 किंवा 8 मिनिटापेक्षा जास्त काळ लागतच नाही.
 
प्रश्न : 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही हे खरं, पण तुम्ही म्हणत आहात की, 100 लोकांनी मंदिर, मशीद किंवा चर्चमध्ये जावं मग बाकी लोकांनी काय करावं? कारखाने हा वेगळा मुद्दा आहे, पण प्रार्थनास्थळाच्या बाबतीत असं केल तर लोक कसं ऐकून घेतील? काही अनुचित झालं तर जबाबदार कोण?
 
उत्तर : मंदिराच्या ट्रस्टींशी चर्चा करुन मंदिर उघडण्याच्या वेळेनुसार किंवा मशिदीच्या उघडण्याच्या वेळेनुसार 10 ते 15 लोक सोडण्याच्या बाबतीत विचार करता येईल. मी जर मंदिर बंद करण्यासाठी गेलो असतो तर शिवसेनेने माझा विरोध करावा.
 
पण मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी माझी अपेक्षा होती की सर्व येतील आणि माझ्यासोबत चर्चा करुन काही नियम बनवून हे काम मिळून केलं असतं. पण नाही....आमच्या मंदिरामध्ये हस्तक्षेप करणारा तू मुसलमान कोण? असं का? देवाचं घर सगळ्यांचं आहे, कुणाची मक्तेदारी आहे का?
 
मी तर खैरेसाहेबांना विनंती करेन की, तुम्ही माझ्यासोबत मशिदीत या, मी तुमच्या सोबत मंदिरात येतो.
 
प्रश्न : मक्तेदारी म्हणजे नेमकी कशाची?
 
उत्तर : मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा हे कुणाच्या मालकीचे नसते.
 
प्रश्न: MIM हिंदुंचं राजकारण करणार का?
 
उत्तर: नाही...ना हिंदुंचं राजकारण करणार, ना मुसलमानांचं राजकारण करणार. आता खूप झालयं. हिंदू-मुस्लिम करुन या लोकांनी औरंगाबाद जिल्ह्याची वाट लावलीये. आता हिरवा, भगवा, पांढरा सर्व माझे आहेत. मी सर्वांचा लोकप्रतिनिधी आहे. हिंदू-मुस्लिम मी करणार नाही. मुद्दा असेल तर मी बोलणार.
 
प्रश्न: चंद्रकांत खैरेंनी मशिदी उघडण्यासाठी आंदोलन केल तर तुमचं मत काय असेल?
 
उत्तर : मी त्यांना समर्थन देणार.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती